कॉंग्रेसच्या तोंडी विघटनवाद्यांची भाषा

0
132

डॉ. जितेंद्रसिंह यांचा आरोप
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी
स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवणारा कॉंग्रेस पक्ष सवंग लोकप्रियतेसाठी विघटनवाद्यांची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी केला आहे.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या विधानावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेस पक्षाला सणसणीत चपराक लगावतांना भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. जितेंदसिंह म्हणाले की, सुरक्षा दलांच्या विशेषत: लष्कराच्या मनोबलावर परिणाम होईल, असे राजकारण विरोधी पक्षांनी विशेषत: कॉंग्रेसने करू नये, अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे.
खोर्‍यातील जनतेबद्दल लष्करप्रमुखांनी काहीही म्हटले नाही, जनतेला त्यांनी इशाराही दिला नाही, तर तेथील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली, याकडे लक्ष वेधत डॉ. जितेंद्रसिंह म्हणाले की, निराशेच्या भरात कॉंग्रेस अशी वागत आहे, ज्याचा आतापर्यंत कोणीही विचारही केला नाही. राजकीय फायद्यासाठी लष्करावर आरोप करू नये, तसेच त्यांचा वापरही करून घेऊ नये, असे ते म्हणाले. लष्करप्रमुखांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. अतिरेक्यांविरुद्धच्या लष्कराच्या कारवाईत अडथळा आणणार्‍यांना अतिरेक्यांचे साथीदार समजून त्यांच्यावरही कठोर कारवाईचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी दिला होता. लष्करप्रमुखांचा इशारा लष्करावर दगडफेक करणार्‍यांवर होता. या विधानावर काश्मीर खोर्‍यात प्रतिक्रिया उमटल्यावर तसेच विविध राजकीय पक्षांनी त्यावर टीका केल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू तसेच डॉ. जितेंद्रसिंह यांनी लष्करप्रमुखांची बाजू घेत त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
स्थानिक पातळीवर लष्कर करीत असलेल्या कारवाईत अडथळा आणणार्‍यांवर कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक लष्कराच्या स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांना असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. दहशतवाद्यांना शह देणारेही दहशतवाद्यांएवढेच जबाबदार असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे.
जनरल रावत यांच्या विधानावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी टीका केली होती. मागील वर्षी लष्कराने केलेल्या स्पिलंटरच्या वापरात हजारावर युवक जखमी झाले, त्यातील दोनशे जणांना आपले डोळे गमवावे लागले होते, अशा स्थितीत खोर्‍यातील तरुणांना अटक करण्याचा इशारा योग्य नाही, देशातील जनता तो खपवून घेणार नाही, असा इशारा आझाद यांनी दिला होता.