जीडीपीमध्ये वाढ होईल : ऊर्जित पटेल

0
120

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी
नोटबंदीमुळे झालेली जीडीपी घसरण थांबून आता लवकरच जीडीपीत जोमाने वाढ होईल, असा विश्‍वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, विमुद्रीकरणामुळे झालेली जीडीपी घसरण केवळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. यापुढील काळात जीडीपीची वाढ अतिशय जोमाने होणार आहे.
५०० आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे भारतातील आर्थिक वृद्धीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. चलनातून जुन्या नोटा बाद झाल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम तात्काळ लक्षात येणार नाहीत, मात्र भारताच्या आर्थिक फायद्यासाठीच हे आहे. अस्थिर महागाई ही आर्थिक वृद्धीसाठी अडथळा ठरते, त्यामुळे उच्च वृद्धीदर मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु तो टिकाऊ स्वरूपाचा प्रयत्न हवा, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निश्‍चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेत आगामी काळात चढउतार बघायला मिळणार आहेत. नोटबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेबरोबरच संपूर्ण बँकिंग व्यवस्थेनेचे खूप मोठी कामगिरी पार पडली आहे. पटेल म्हणाले, नोटबंदीनंतर विविध पातळीवर देशातील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी रिझर्व बँकेने वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. पहिल्या दिवसापासूनच पूर्ण क्षमतेने नोटांची छपाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.