हृदयरोग्यांना स्वस्त दरात स्टेंट न पुरविल्यास कारवाई

केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांचा इशारा

0
124

वृत्तसंस्था
मुंबई, १७ फेब्रुवारी
रुग्णालयांनी हृदयविकारी रुग्णांना स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून न दिल्यास सरकार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करीत परवानाही रद्द करेल, असा इशारा केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी आज दिला. देशातील लाखो हृदयरुग्णांवरील उपचारासाठी स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनंतकुमार मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
रुग्णांना परवडणार्‍या दरात उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारने मागील अडीच वर्षात १४५० औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या आहेत. याशिवाय हृदयावरील उपचारासाठी गरजेच्या स्टेंट्‌सच्या किमतीही आटोक्यात आणल्या असून पंचेचाळीस हजार ते साठ हजार किंमतीचा स्टेंट आता साडेसात हजारांत उपलब्ध होणार आहे. तसेच, दोन लाखांचा वेगळ्या प्रकारचा स्टेंट तीस हजारांत मिळेल. त्यामुळे रुग्णालयांनी स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, असेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुण्या रुग्णालयाने स्टेंटची जादा किंमत आकारल्यास वाढीव रक्कम वसूल करणे, फौैजदारी कारवाई, रुग्णालयाचा परवाना रद्द करणे अशा कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागणार आहे.
अनंतकुमार यांनी सांगितले की, स्टेंट्‌सबाबत आयात वा निर्मिती कंपन्यांनी मागील तीन वर्षांच्या प्रमाणातील आयात अथवा निर्मिती पुढील एक वर्ष चालू ठेवणे गरजेचे असून किंमत कमी झाल्याच्या सबबीवरून आयात-निर्मिती थांबविल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
राज्यात जनतेसाठी स्वस्त जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीसाठी राज्यात प्लॅस्टिक व रसायनशास्त्राच्या प्रगत शिक्षण संस्था सुरू करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनता भाजपाला स्पष्ट बहुमताने विजयी करेल. त्याबाबतची लाट सध्या दिसून येत आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.