प्रत्यक्ष राष्ट्रपतींना लाच; सॅमसंगच्या प्रमुखास अटक

जगभरात खळबळ तुरुंगात रवानगी

0
166

वृत्तसंस्था
सेऊल, १७ फेब्रुवारी
जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी कार्ड निर्माता कंपनी सॅमसंगच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्वेन यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली सॅमसंगचे प्रमुख जे वाय ली यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयात १० तास सुनावणी सुरू होती. ली यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
ली यांना एका छोट्याशा कोठडीमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना इतर कैद्यांसोबत भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ली यांना ठेवण्यात आले आहे, ती कोठडी राजकारण्यांना आणि उद्योगपतींना नजरकैदेत ठेवण्यासाठी वापरण्यात येते. या लाचखोरी प्रकरणातील अन्य आरोपींना याच तुरूंगात ठेवण्यात आले आहे. ली यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना लाच देऊ करुन ली यांनी कंपनीच्या फायद्यासाठी सरकारवर दबाव टाकला असल्याचा आरोप आहे. दक्षिण कोरियात भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. त्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली.
ली यांना तुरुंगात एका सामान्य कैद्यासारखी वागणूक देण्यात येत असून, त्यांना याप्रकरणातील अन्य आरोपींपासून दूर ठेवण्यात आले आहे. ली यांनी ३६ दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्यासाठी समर्थन मिळावे म्हणून त्यांनी ही लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपात म्हटले आहे. ली यांच्या अटकेचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे.