मी चिंधीचोर नसल्याने पोलिस जीपमध्ये बसणार नाही : शशिकला

0
163

वृत्तसंस्था
बंगळुरू, १७ फेबु्रवारी
बंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात मिळणारी वागणूक स्वीकारण्यास शशिकला तयार नाही. बुधवारी शशिकला कारागृहात पोहोचल्या तेव्हा पोलिसांच्या जीपमध्ये बसायला नकार देत, ‘आपण चिंधीचोर नाही, त्यामुळे पोलिस जीपमध्ये बसणार नाही’, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.
शशिकला यांनी जीपमध्ये बसण्यास नकार दिल्याने पोलिस त्यांना चालत घेऊन गेले होते. पोलिस आपल्याला एखाद्या चोराप्रमाणे जीपमध्ये बसवून नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर शशिकला चांगल्याच संतापल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस त्यांना जीपमध्ये घेऊन जाणार होते. मात्र शशिकला यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला.
शशिकला यांनी कारागृह परिसरापर्यंत चालत जाणे पसंद केले होते. शशिकला यांनी पोलिसांना स्पष्टच सांगितले की, कारागृह कितीही लांब असले, तरी मी चालत येण्यासाठी तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
जयललिता यांना कारागृहात ज्या सुविधा मिळायच्या, त्या सर्व आपल्यालाही मिळतील, असे शशिकला यांना वाटत होते. याआधी जेव्हा जयललिता व शशिकला यांना दोषी ठरविण्यात आले होते, तेव्हा जयललिता मुख्यमंत्री होत्या आणि त्यांची तब्येत खराब होती. त्यामुळे त्यांना ‘अ’ दर्जाची सुविधा दिली जात आहे. त्यांच्यामुळे शशिकला यांनाही त्या सर्व सुविधा मिळत होत्या.
मात्र यावेळी प्रकरण वेगळे आहे. शशिकला मुख्यमंत्री नसल्याने न्यायालयाने त्यांना कोणतीही विशेष वागणूक देण्यास नकार दिला आहे. तुम्ही मुख्यमंत्री नसल्याने तुम्हाला काहीच सुविधा मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.