बंगालमधील मालदा येथे दोन हजाराच्या नकली नोटा जप्त

0
120

वृत्तसंस्था
कोलकाता, १७ फेब्रुवारी
सीमा सुरक्षा दलाने दोन हजार रुपयांच्या शंभर बनावट नोटा बंगालमधील मालडा जिल्ह्यात जप्त केल्या आहेत. भारत-बांगलादेश सीमेवर नोटबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, चुरियांतपूर भागात सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी भारताच्या बाजूने काही तस्कर बांगलादेशच्या सीमेपलीकडून संशयास्पद वस्तूंची देवाणघेवाण करताना दिसून आले. जवानांनी त्यांना रोखले असता, ते एक पाकीट तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
जवानांना घटनास्थळी सापडलेल्या पाकिटात दोन हजार रुपयांच्या शंभर बनावट नोटा आढळल्या. सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर, आता दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.
दरम्यान, सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्थेने नुकत्याच केलेल्या एका संयुक्त कारवाईत मालदा येथील गोपालगंज परिसरात उमर फारुक ऊर्फ फिरोज याला अटक करून त्याच्याकडूनही दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.