संजय उवाच!

0
183

पत्रकारितेत ज्येष्ठतेच्या क्रमवारीत अगदी वरच्या श्रेणीत विराजमान असलेले, राज्याच्या कानाकोपर्‍यातील सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हृदयात बाळासाहेबांच्या तोडीचे स्थान लाभलेले, शिवसेनेचे परमआदरणीय राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी परवा केलेल्या आकाशवाणीमुळे राज्यातील भाजपा सरकार लवकरच खालसा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे! इतकी वर्षे कायम मागच्या दाराने संसदेत स्थान ‘मिळविण्यात’ यशस्वी ठरलेल्या त्यांच्यासारख्या एका नेत्याने केलेले विधान, अनाठायी असले तरी खोटे कसे ठरेल बरे! ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे लवकरच माजी मुख्यमंत्री होणार… आता लवकरच म्हणजे सरकारचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर की पुढच्या कार्यकाळातली आणखी पाच वर्षे संपल्यावर हे काही त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे लवकरच म्हणजे नेमके कधी हे विचारून त्यांना उगाच अडचणीत आणण्याचा अनाठायी प्रयत्न कुण्या बापड्याने करू नये. ज्या मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलताहेत, त्यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे निदान डझनभर तरी मंत्री सत्तारूढ आहेत. तरीही सरकार खालसा होणार असे ते सांगतात, याचा अर्थ शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार. काय विरोधाभास आहे बघा! केंद्रात शिवसेनेचा केवळ एक मंत्री आहे. त्यांनाही पक्षनेत्यांच्या मनासारखे अवजड खाते मिळालेले नाही. तरीही सुरुवातीची आदळआपट मागे पडून ते आता इमाने इतबारे काम करताना दिसताहेत. मनासारखे जराही घडलेले नसताना केंद्रातील मोजून एका मंत्रिपदाचा मोहही ज्यांना गेल्या तीन वर्षात आवरता आला नाही, तो पक्ष राज्यातली डझनभर मंत्रिपदं अशी सहजासहजी सोडून देणार म्हणतोय्… खात्री तर जराशीही वाटत नाही. पण बघूया! तसेही संजय राऊत यांची विधाने या राज्यातली जनता किती गांभीर्याने घेते हा प्रश्‍न आहेच. हा! एक मात्र खरे की असली वक्तव्ये करताना त्यांचा उत्साह मात्र दांडगा असतो. अवसान उसने असले, तरी लय् भारी असते. मग लेखणीला कशी तलवारीची धार येते त्यांच्या अन् वाणीला म्हणाल तर लगामही राहात नाही! आता सामनावरील बंदीच्या मागणीचे कुणी समर्थन करण्याचे कारण नाही. पण अशा मागणीमुळे एकूणच माध्यम जगताच्या मुस्कटदाबीचा जो मुद्दा राऊत साहेबांना ऐनवेळी सुचला आहे तो, काही वर्षांपूर्वी मुंबईत एका वृत्तवाहिनीवर शिवसैनिकांनी हल्ला केला, त्यांच्या कार्यालयाची बेमुर्वतखोरपणे तोडफोड करण्यात आली, त्यावेळी कुठे गेला होता? ती तोडफोड करणार्‍यांच्या यादीतील नावांवर एक नजर फिरवली तर मग राऊत साहेबांना प्रसार माध्यमांच्या मुस्कटदाबीवर चकार शब्द काढण्याचा अधिकार तरी उरतो का, असा प्रश्‍न निर्माण होईल. असो. राजकारणात वावरणार्‍यांनी प्रत्येकच गोेष्ट त्यांच्या सोयीने, संधी साधून ‘वापरायची’ असते. मग ते राजीनाम्याचे अस्त्र असो की नको असलेल्या मुद्यांवरचे चर्चेचे गुर्‍हाळ.
शिवसेनेचे मंत्री राजीनामा देत सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या वावड्या माध्यमातूनच उठवल्या जात असल्याचा आरोप परवा दस्तुरखुद्द उद्धव साहेबांनी केलेला असताना, राऊत साहेबांनी नेमक्या त्याच वावड्या अधिकृरीत्या अधोरेखित केल्या आहेत. बहुधा, साहेब बोलले तर ते बरे दिसणार नाही, अशा सार्‍या गोष्टी ‘बोलून मोकळे होण्याची’ अलिखित जबाबदारी असल्यानेही राऊत साहेब बोलले असतील तसे काही! त्यामुळेच ते आपल्याच सरकारवर तुटून पडले. मुख्यमंत्र्यांवर उखडले. त्यांच्या कारभारावर चवताळून उठले. म्हणाले, मराठीचा मुद्दा जेव्हा बाळासाहेबांनी हाती घेतला, तेव्हा फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता. ते असेलही खरे कदाचित! पण राऊत साहेब, शिवसेना मराठीवरून हिंदुत्वाच्या मुद्यावर कशी आली आणि आता मुंबईतील गुजराती मते मिळवण्यासाठी तिला गुजरातेतल्या पटेलांचे ‘हार्दिक’ स्वागत कसे करावे लागले, याचा तर सारा महाराष्ट्र साक्षीदार आहे ना! मग आता कुठे गेला परप्रांतीयांचा मुद्दा? की निवडणुकीच्या काळापुरता खुंटीवर टांगून ठेवलाय् तुम्ही तो?
एवढी मोठमोठी वक्तव्ये करतात म्हणजे राऊत साहेबांकडे पक्षाची भली मोठी जबाबदारी असणार हा लोकांच्या मनातला गैरसमज मात्र कायम राहायला हवा. नेहमीच! हा, आता भाजपासोबत होणार्‍या जागा वाटपाच्या बोलणीदरम्यान अगदी आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित राहातात, पण संजय साहेब कधीच दिसत नाहीत कुठे? असा प्रश्‍न सामान्यजनांच्या मनात उपस्थित झालाच कधी, तर असली छोटी छोटी कामे पक्षाने अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत आदी नेत्यांकडे सोपविली असल्याने, त्यात ते लक्ष घालत नाहीत, अशी समजूत काढावी स्वत:ची! भाजपासहित झाडून सार्‍या शिवसेनेतर पक्षांवर ऊठसूट आरोप करणे, त्यांना धारेवर धरणे, अशी ‘महत्त्वपूर्ण जबाबदारी’ पक्षाने त्यांच्यावर सोपविली असल्याची बाब ध्यानात घेऊन त्यांच्या बोलण्याचे, त्यांच्या संतप्त विधानांचे, त्यांच्या लेखी आक्रमक ठरतील अशा त्यांच्या सार्‍या वक्तव्यांचे आपापल्या परीने अर्थ काढावेत सर्वांनी! शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील असे म्हणाले असतील, तर मग त्या मंत्र्यांवर राऊत साहेबांचा खरोखरीच वचक किती, हा प्रश्‍न इथे गौण ठरतो! सामनावरील बंदीची मागणी म्हणजे लोकशाहीला काळिमा आहे, असे ते म्हणाले असतील, तर मग ‘त्या’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयात शिवसैनिकांनी त्यावेळी केलेल्या तोडफोडीचे काय, असा अडचणीचा प्रश्‍न भलत्यावेळी विचारू नये! मतांसाठी गुजरातच्या हार्दिक पटेलला मुंबईत फिरवताना मराठीचा मुद्दा कुठे गेला होता, हा प्रश्‍न लाखमोलाचा असला तरी, तो न विचारण्याचे कौशल्य पणाला लावावे अशावेळी!
खरं म्हणजे हा निवडणुकीचा मोसम आहे हे सर्वप्रथम ध्यानात घ्यावे जनतेने. अशावेळी कुठल्याही राजकीय पक्षात, पोपटपंची करणार्‍यांना मोठाच भाव असतो. शिवसेेनेबाबत काय बोलावे! जीव मुंबई मनपाच्या सत्तेच्या पिंजर्‍यात अडकलेला पोपट तो! ती सत्ता हातून जाऊ नये म्हणूनच जिवाचा आटापिटा चालला आहे सध्या. कधीकाळी ‘करून दाखवलं’ हे ब्रीद होतं त्यांचं. आता, गेल्या पंचेवीस वर्षांत त्यांनी काहीच केलं नाही म्हणून ओरडताहेत लोक. १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले, तेव्हा संख्याबळ शिवसेनेकडे अधिक होते. म्हणूनच मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले. मात्र, नंतरच्या काळात विरोधी पक्षनेतेपदही ताब्यात राहिले नाही या पक्षाच्या. हा बदल काल परवा नव्हे, अगदी आदरणीय बाळासाहेबांच्या हयातीत घडला. १९९५मधली परिस्थिती बदलून भाजपा कितीतरी पुढे निघून गेली अन् निवडणुकीत लढविण्यासाठी कायम भाजपापेक्षा अधिक जागांवर दावा सांगणार्‍या शिवसेनेचे संख्याबळ मात्र आता भाजपाच्या तुलनेत निम्म्यावर आले. या वास्तवाचे चिंतन करायचे सोडून मुजोरी का चालली आहे शिवसेनेची? अन् कशाच्या भरवशावर? कशाच्या जोरावर सरकार खालसा करण्याची भाषा बोलताहेत संजय राऊत आणि त्यांचे बोलविते धनी?
महाभारतातल्या संजयला दिव्यदृष्टी होती म्हणतात. इथे तर दूरदृष्टी असल्याचेही जाणवत नाही कुठे! आरडा-ओरडा केला, बोलताना शिवराळ भाषा वापरली की आक्रमकता अन् बाळासाहेबांच्या त्या करारी बाण्याचे प्रदर्शन आपणही सहजपणे करू शकू अशा आविर्भावात रमलेली काही मंडळी, ‘मिळून’ सरकार चालवण्यापेक्षा, सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यातच धन्यता मानताहेत. कालपर्यंतचा विरोधी पक्षात बसण्याचा अनुभव गाठीशी असतानाही, प्रयत्नांती सत्तेत आलेले आपलेच सरकार खाली खेचण्याची त्यांची भाषा, या राज्यातील जनता तर सोडाच, पण शिवसैनिकही गांभीर्याने घेणार नाहीत, असा ठाम विश्‍वास वाटतो! स
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३