अबब! १४ पोत्यांच्या भाकरी, ८०० किलोचा झुणका!

0
208

प्रगटदिनाचा ‘महा’प्रसाद
तभा वृत्तसेवा
भंडारा, १८ फेब्रुवारी
कोणत्याही धार्मिक सोहळ्यानंतर महाप्रसादाची प्रथा ओघाने आलीच. महाप्रसाद ठिकठिकाणी आणि वेगवेगळ्या निमित्ताने होतात. मात्र काही खास महाप्रसादाच्या कार्यक्रमांची भाविक आतुरतेने वाट पाहतात. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त रिद्धीसिद्धी गजानन मंदिरातील झुणका, भाकर अन् शिर्‍याचा महाप्रसाद चांगल्या चांगल्यांना रांगेत उभा करतो. यावेळी तर चक्क १४ पोते पिठाच्या भाकरी, ८०० किलोचा झुणका अन् ५०० किलोचा शिर्‍याच्या ‘महा’प्रसादाने गजानन भक्तांची प्रसादाची भूक भागविली. नागरिकांचा धार्मिकतेकडे कल वाढत असल्याने धार्मिक सोहळे आणि महाप्रसादाचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. येथील खांबतलाव मार्गावर असलेल्या रिद्धीसिद्धी गजानन मंदिरातही गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र येथील आयोजनाने आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले. येथील व्यवस्थापनाला कधीही कुणाकडे मागायला जावे लागत नाही. वर्षानुवर्षे दानदाते वाढतच आहेत. दरवेळी या महाप्रसादाचे स्वरूप वाढत आहे. शेवटच्या भाविकाला झुनका, भाकर, शिरा असा पूर्ण महाप्रसाद मिळेपर्यंत सांगता होत नाही, हे विशेष. यावेळीही या प्रसादाचे स्वरूप वाढले. चक्क १४ पोते ज्वारी अन् गव्हाच्या पिठाच्या भाकरी, ८०० किलो कांदे अन् इतर साहित्याचा झुनका व ५०० किलोचा शिरा असे अवाढव्य स्वरूप महाप्रसादाचे होते. महाप्रसाद तयार करण्यासाठी एक दिवस आधीपासून तयारी सुरू होते. जवळपास १०० हून अधिक महिला या कामात गुंतलेल्या असतात. प्रत्येक भक्ताला हा प्रसाद मिळावा असा मानस मंदिर व्यवस्थापनाचा असल्याने शेवटच्या भक्तापर्यंत श्रद्धेने प्रसादाचे वाटप करण्यात येते.
दरवर्षी प्रसाद घेणार्‍यांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढत आहे अन् दात्यांचे प्रमाणही. त्यामुळे शहरातील प्रगटदिनाचा हा महाप्रसाद वेगळी ओळख निर्माण करणारा ठरला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे कार्यकर्ते नि:स्वार्थ भावनेने सेवा देतात, हे विशेष.