पवनीचे बसस्थानक पडले ओस

0
128

तभा वृत्तसेवा
पवनी, १८ फेब्रुवारी
पवनीपासून सुमारे १ किमी अंतरावर असलेले पवनी बसस्थानक प्रवाशांची वर्दळ नसलेले विदर्भातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव बसस्थानक असावे. बस डेपोचे ३० कर्मचारी मात्र येथे आहेत. या बसस्थानकाची अतिशय दुर्दशा झाली आहे. इतर बसस्थानकांवर प्रवाशांनी तोडलेले बेंच आढळतील. परंतु या ठिकाणी प्रवाशी नसतानाही बेंच तुटलेल्या स्थितीत आहेत.
प्रवाशांची वर्दळ नसल्यामुळे कचरा होण्याचा प्रश्‍नच नसल्यामुळे बसस्थानक नेहमीच स्वच्छ असते. बसस्थानकाच्या उद्घाटनानंतर काही दिवस येथे एक उपहारगृह सुरू झाले होते. मात्र उपहार गृहातील खाद्यपदार्थ प्रवाशांच्या चणचणीमुळे न खपल्याने हे उपहार गृह देखील बंद झाले. पुस्तके व फळ विक्रेत्यांकरिता येथे एक खोली बांधण्यात आली होती. मात्र बसस्थानकाच्या उद्घाटनापासून कधीही त्या दुकानाचे शटर उघडले गेले नाही. एसटीच्या कर्मचार्‍यांना देखील या बसस्थानकावरील स्मशान शांतता सहन होत नसल्याने, ते आपल्या एसटी बसेस घेऊन शहरातील जवाहरगेट समोरील चौकात लावतात. पवनीच्या या ओसाड बसस्थानकाचा वापर काही फिरस्तीवाले दुपारी विश्रांती घेण्यासाठी करतात. एवढीच या बसस्थानकाकडून नागरिकांची सेवा होते.
पवनीतील जवाहरगेट समोरून एसटी बसेस सुटत असल्याने प्रवाशांची मात्र सोय झाली आहे. याच परिसरातून भंडारा, लाखांदूर व नागपूूरला जाणार्‍या खाजगी प्रवासी गाड्याही सुटतात. त्यामुळे जी गाडी आधी सुटेल, त्या गाडीने प्रवासी प्रवास करतात. यात नेमक्या खाजगी प्रवासी गाड्याच बाजी मारतात. सर्व प्रवासी घेऊन या खाजगी गाड्या सुटल्यानंतर एसटी बसेस रिकाम्या किंवा मोजक्या प्रवाशांना घेऊन जातात. आधी खाजगी गाड्या सुटतात व नंतरच एसटी बसेस का सुटतात, हे एक न उलगडणारे कोडे आहे. पवनीवरून नागपूरला जाणार्‍या जवळपास सर्वच एसटी बसेसच्या पाच ते दहा मिनिटे अगोदर खाजगी बसेस धावतात. उरलेसुरले प्रवासी घेऊन एसटी निघते. काहीही असो, एसटीच्या प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत नाही, हे भाग्यच.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना एसटीमध्ये सवलत मिळत असल्याने ते एसटीने आवर्जून प्रवास करतात. वेळेचे बंधन पाळल्यास तोट्यात चालणारी एसटी नफ्यात यायला वेळ लागणार नाही.