रविवारची पत्रे

0
170

शाही इमामाची राजकीय फतवेेशाही
दिल्लीच्या जामा मशिदीला वेगळे वैशिष्ट्य आहे. कारण ती ऐतिहासिक मशीद आहे. इथल्या इमामाच्या मागे शाही ही पदवी लावली जाते. बुखारी हेच कुटुंब मागील आठ दशकांपासून या पदावर आहे. सध्या या जामा मशिदीचे प्रमुख शाही इमाम मौलाना अहमद बुखारी आहेत. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी या इमामाला राजकारणाकरिता जसे वळवले तसे ते वळले. या इमामाच्या तोंडात राज्यकर्त्यांनी जी वाक्ये टाकली तीच ते सभेत बोलतात.
राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा यांना फोन करून निवडणुकीच्या वेळी मुस्लिम वस्त्यांमध्ये ज्या सभा होतात, त्यात वक्ते म्हणून त्यांना बोलावतात. राज्यकर्त्यांच्या सोयीचे बोलून सभा काबीज करतात. कॉंग्रेसने सातत्याने दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामाचा उपयोग मतांकरिताच करून घेतला. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना रावसाहेब शेखावत जेव्हा आमदार झाले तेव्हा पठाण चौकात हेच शाही इमाम दिल्लीच्या फोनवरून अमरावतीमध्ये आले. त्याचा फायदाही झाला, पण प्रत्येकच वेळी इमामाचे ऐकावे असा काही नियम नाही.
आता या शाही इमामाने कॉंग्रेसची साथ सोडलेली आहे. त्यांनी आता पाढा वाचायला सुरुवात केलेली आहे, मुस्लिमांचे शोषण कसे झाले? त्यांना डावलण्यात कसे आले? दंगली किती झाल्या? खरं म्हणजे हे उशिरा सुचलेले शहाणपणच आहे. सध्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. आता शाही इमाम यांनी मायावतींच्या बसपाला समर्थन द्या, असा फतवाच काढला. खरं म्हणजे स्वत:ला धर्मगुरू म्हणवून घेणार्‍यांनी राजकारणात पडूच नये आणि पडलेच तर जनतेवर जबरदस्ती करू नये. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर राज्यकर्त्यांनी धर्मगुरूचा वापर टाळावा. धर्मगुरूंनी याच पक्षाला मत द्या, अशी फतवेशाही टाळावी. कितीही मोठा शाही इमाम आला तरी जनतेने आपल्या एका अमूल्य मताचे महत्त्व जाणावे. पैशाची खुराक शाही इमामाला मिळते. जनता उपाशीच राहते. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून राजकारण करणार्‍यांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे.
रजिया सुलताना
पुणे
अखेर शशिकला ‘चतुर्भुज!’
अब्जावधी रुपयांची बेहिशेबी संपत्ती साठविणार्‍या अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला दिलेल्या अंतिम निकालात ४ वर्षांचा कारावास, रु. १० कोटींचा दंड आणि कारावास समाप्तीनंतर पुढील ६ वर्षे निवडणूक लढण्यास बंदी अशी भक्कम शिक्षा सुनावली आहे. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा असलेल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर अम्माच्या वारसदार म्हणून मिरवणार्‍या शशिकलाबाईंचा अशा प्रकारे स्वप्नभंग झाला. शिक्षेचे स्वरूप पाहता अजून १० वर्षे तरी त्या राजकारणातून बहिष्कृत राहाणार आहेत. योगायोग असा की, २०१४ मध्ये चेन्नई येथील कारागृहात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांना ज्या खोलीत ठेवले होते त्याच कोठडीत त्यांची प्रिय सखी शशिकाला (कैदी क्र. ९४३५) यांनाही कोंडले आहे. जयललिता यांची राजकीय वारसदार बनून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास उतावीळ झालेल्या शशिकलेचे मनोगत किमान अजून १० वर्षे तरी प्रत्यक्षात येेणे अशक्य आहे (४ वर्षे तुरंगवास+पुढील ६ वर्षे निवडणूक लढण्यावर कायद्याने बंदी) कैदखान्याची ४ वर्षे त्यांना अन्य, अकुशल, सामान्य कैद्याप्रमाणे हलकी कामे करायची आहेत. नियमानुसार या सेवेचे शशिकलेला रु. ५० रोज याप्रमाणे मजुरीही मिळणार आहे. शशिकलेच्या अफाट द्रव्यलालसेचे तात्त्विक मनोहारी भूमिकेतून वर्णन करताना सुप्रीम कोर्ट अचानक भावुक होऊन माणसाचे मनोवैज्ञानिक विश्‍लेषण करू लागले. न्यायमूर्ती म्हणतात, ‘शशिकला प्रकरण हे माणसाच्या कधीही तृप्त न होणार्‍या वखवखलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. माणसाची द्रव्यतृष्णा पूर्ण होणे अशक्य आहे. (पुर्विता नैव पूर्यंते) हा एक प्रकारचा दुर्धर आजारच आहे.’ (किती सूक्ष्म अभ्यासपूर्ण चिंतन, विश्‍लेषण कोर्टाचे!)
अशा प्रकारे नियतीने (की स्व कर्माने?) शशिकलेचा डाव उधळून लावला आहे. त्या खूपच आशावादी असतील, तर दहा वर्षांनंतरही पुन्हा राजकारणाचा सारिपाट मांडतील. पण तेव्हा त्यांना हुकमी दान पडेलच याची काय शाश्‍वती? तेव्हा स्टॅलिन बाजी मारून सत्ता सुंदरीचे हरण करू शकतो किंवा कृतकर्माचा पश्‍चात्ताप होऊन बाईंना या राजनीतीचा उबग आलेला असेल, तर त्या देवाधिदेव पद्मनाभ यांच्या चरणी लीन झालेल्या असतील.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७
तुम्ही दोघी एकट्याच!
या प्रश्‍नातच किती विरोधाभास आहे ना? पण हा प्रश्‍न विचारावा असे आपल्याला का वाटते? उत्तर आपल्याकडेच आहे. जरा विचार करा-
परवा मी वहिनीच्या घरी गेले होते. आमच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात तिच्या भावाच्या दोन मुली हसत-खिदळत आत आल्या. ‘‘अगं, हे काय? तुम्ही दोघीच? आणि दादा-वहिनी कोठे आहेत?’’ वहिनीने विचारले. ‘‘अगं, ते दोघे मागाहून येत आहेत’’- दोघींनी एकदम उत्तर दिले.
‘‘म्हणजे! तुम्ही दोघी एकट्याच आलात! आणि दादाने तरी कसे पाठवले? त्याला सांगून तरी आल्या आहात ना!’’ वहिनीचा राग वाढतच चालला होता. ‘‘अगं आत्या, रागावतेस कशाला? नागपूर-वर्धा एक तासाचाच तर प्रवास आहे आणि तुझ्या घरापासून बस स्टॅण्ड पण जवळ आहे; म्हणून आम्ही पुढे आलो. आणि आम्ही काय आता लहान आहोत का? मी आताच दहावीची परीक्षा दिली आहे आणि ही पण आता आठवीत गेली आहे’’- मोठीने स्पष्टीकरण दिले.
‘‘अगं तुम्ही अडनिड्या वयाच्या आहात म्हणून तर काळजी वाटते ना! बरं, बसमध्ये तरी कोणी ओळखीचे होते का? तसा विचार केला तर बसमध्ये कितीही प्रवासी असले तरी ते तुम्हाला मदत करतील अशी खात्री पण देता येत नाही. कारण आजकाल जो-तो आपल्याच विचारात आणि काळजीत असतो. इतरांकडे लक्ष द्यायला कोणाला तरी वेळ असतो का?’’ वहिनी वैतागून बोलत होती.
मी मात्र विचार करू लागले. खरंच आपण इतके स्वार्थी, आत्मकेंद्रित झालो आहोत का? एकेकाळी निर्भयपणे वावरणार्‍या मुली आता निर्भया का झाल्या आहेत? एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी हे विचार असे सहजपणे झटकता येतात का? ‘हे विश्‍वची माझे घर’ अशी संस्कृती असलेले आपण एकमेकांशी परकेपणाने का वागतो? आपण एका गाडीतून प्रवास करणारे सहप्रवासी असतो, एका भागात राहणारे सख्खे शेजारी असतो, एका कार्यालयात काम करणारे सहकारी असतो. मग ही त्रयस्थपणाची भावना कशी आणि केव्हा निर्माण झाली?
त्या दोघी बहिणी एकमेकींबरोबर असूनही त्यांना दुबळे, असहाय का समजले जाते?
बर्‍याच वेळा मला असेही वाटते की, स्त्रिया स्वत:वरची जबाबदारी टाळण्यासाठी दुय्यम स्थान मुद्दामच घेतात. म्हणूनच मुलांनी चुकीची गोष्ट केली की, ‘‘थांब तू माझे ऐकत नाहीस. आता तुझ्या बाबांना तुझे नाव सांगते. मग त्यांनी कोणतीही शिक्षा केली तरी मी काहीच बोलणार नाही,’’ असा कमीपणा घेतात. तसेच एखादी महाग वस्तू घ्यावयाची असेल किंवा मोठी गुंतवणूक करावयाची असेल तर स्त्रिया कचरतात आणि पुरुषांचे मत मागून मगच निर्णय घेतात.
म्हणूनच मला वाटते की, आपले स्थान मागून किंवा बळकावून मिळत नसते तर ते स्वत:च्या बळावर, सामर्थ्याने, सक्षमतेने वागून मिळवून सिद्ध करावयाचे असते.
प्रभा बल्लाळ
नागपूर
रेनकोट व कॉंग्रेस
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे तडाखेबंद उत्तर दिले त्यामुळे पूर्ण कॉंग्रेस पक्ष जायबंदी झाला आहे. यूपीए सरकारच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे अनेक मोठमोठे घोटाळे झाले त्या सर्व घोटाळ्यांचा एक शिंतोडासुद्धा मनमोहन सिंग यांच्यावर उडाला नाही. कॉंग्रेसवालेही ही बाब नेहमी अभिमानाने सांगतात. राज्यसभेत ज्या वेळी पंतप्रधान मोदींनी हाच धागा पकडून बाथरूममध्ये मनमोहन सिंग कोणता रेनकोट घालून आंघोळ करतात, हे समजत नाही. या वाक्याचा अर्थ कॉंग्रेस सदस्यांना थोडा वेळ कळलाच नाही. ज्या वेळी अर्थ कळला त्या वेळी त्यांनी विनाकारण गोंधळ घालून सभात्याग केला. एका अर्थाने मोदींनी मनमोहन सिंग यांची तारीफच केली. कारण एवढे सगळे कोट्यवधींचे घोटाळे होऊनही त्यांनी स्वत:ला त्यापासून अलिप्त ठेवले. मग घोटाळे करणारे लोक कोण होते, हे आपोआपच स्पष्ट होते. गांधी परिवाराच्या संंमतीने व आशीर्वादाने हे घोटाळे झालेत, हे मनमोहन सिंग यांच्या न बोलण्याने स्पष्ट होते.
कॉंग्रेसचे सभासद लोकसभेत व राज्यसभेत पंतप्रधान मोदींवर अश्‍लाघ्य भाषेत टीका करतात. त्यांना हिटलर, मुसोलिनी अशी विशेषणे लावतात. मनमोहन सिंग यांनी त्याच्याही पुढे जाऊन सामूहिक लूट आणि ब्लंडर अशा प्रकारच्या शब्दप्रयोगांनी सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली होती. मोदींनी मनमोहन सिंगांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन निरुत्तर केले. याचा कॉंग्रेसला फार राग आला आहे. नरेंद्र मोदींचा पराकोटीचा द्वेष व टीका हे कॉंग्रेसने आपले महत्त्वाचे मुद्दे केले आहे. कॉंग्रेस पक्ष जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कधीच वागला नाही. वास्तविक देशाची प्रगती ज्या वेगाने सुरू आहे, नोटाबंदीच्या काळात लोेकांनी जो संयम दाखविला, विरोधकांनी नोटाबंदीच्या काळात लोकांना जो उचकावण्याचा प्रयत्न केला तो लोकांनी हाणून पाडला. म्हणूनच कोणताही किरकोळ मुद्दा घेऊन कॉंग्रेसजन अकांडतांडव करतात, पण जनता त्यांना भीक घालत नाही. आजही भारतीय जनता पंतप्रधान मोदींच्या मागे खंबीरपणे व एकजुटीने उभी आहे.
मधुसूदन विनायकराव अलोणी
नागपूर
प्रतिष्ठा गुरूंची
बाभूळगावजवळील शाळेच्या मुख्याध्यापकाची चौथ्या वर्गातील पाच मुलींच्या लैंगिक शोषणाची वार्ता वाचून असले ‘नीच’ आणि ‘नालायक’ शिक्षक सबंध शिक्षकजातीला काळिमा फासणारे आहेत. त्यामुळे यापुढे शिक्षकजातीला समाजात खाली मान घालून जावे लागणार, हे सांगण्याची गरज नाही. ज्या वयात मुली अत्यंत निरागसपणे गुरूंकडे आईवडिलांच्या रूपात पाहतात त्या मुलींशी, शिक्षक-मुख्याध्यापकाने विद्येच्या पवित्र मंदिरात असे अपवित्र चाळे करून संपूर्ण शिक्षकजातीला बदनाम करावे आणि जनमानसात प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या गुरूंना समाजात जीवन जगणे मुश्कील करावे, अशा नतद्रष्ट शिक्षकांना शिक्षक संघटनांनीच त्यांची जागा दाखवून आपली प्रतिष्ठा समाजात कायम ठेवली पाहिजे.
विद्यमान न्यायदेवतेने, भर चौकात नग्न करून त्यांना फटके मारण्याची शिक्षा सुनावली पाहिजे. समाज आणि पालकांनीसुद्धा अशा नालायक शिक्षकांची गाढवावरून धिंड काढली पाहिजे, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल. शासनानेसुद्धा मुलींच्या शाळेत महिला शिक्षिकांचीच नियुक्ती करावी, तेव्हाच गुरूची प्रतिष्ठा कायम राहील.
किशोर वैद्य
पांढरकवडा
अंमलबजावणी कधी व कशी?
एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सहा टक्के रक्कम शिक्षणासााठी खर्च करण्याची शिफारस कोठारी आयोगाने ५० वर्षांआधी केली होती. ती मान्य झाली की नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार ३१.५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०१६ पर्यंत ती संख्या वाढली असणारच. कालपरवा सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत. त्यात ‘नॅक’सारख्या विश्‍वासार्ह यंत्रणेकडून ज्या शिक्षण संस्थांना ए प्लस श्रेणी दिलेली आहे त्यांना स्वायत्तता दिली जाणार आहे. प्रशासकीय, संसाधनात्मक व अभ्यासक्रमीय निर्णय घेण्यासाठी स्वायत्तता महत्त्वाची आहे. परंतु, त्या आधी तेथील शिक्षक नियुक्तीचा तिढा दूर व्हायला हवा. स्वायत्तता दिली की, शुल्क भरमसाट वाढवणार नाहीत यासाठी नियंत्रण असणे आवश्यक आहे. डिजिटलची गोष्ट करताना संपूर्ण यंत्रणा पेपरलेस व्हायला हवी व सर्व कामे ऑनलाईन व्हायला हवीत. अभ्यासक्रमाची पसंती कमी झाल्यास विद्यार्थिसंख्या घटणार नाही व त्यामुळे संस्थेला व विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे स्वायत्तता विविध स्तरावर द्यायला हवी.
देशभरात सीबीएसई व एआयसीटीईसारख्या तसेच उच्च शिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी वेगवेगळी परीक्षा द्यावी लागत होती. परंतु, आता देशातील उच्च शिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय योग्य व फायद्याचा ठरणार आहेे. डिजिटल युगात विद्यार्थी मागे पडू नये म्हणून स्वयं योजने अंतर्गत ३५० ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील; तसेच देशभरातील विद्यापीठांच्या प्रक्रियेत अभ्यासक्रमात एकवाक्यता यावी व आतापर्यंत होणारा गोंधळ बंद व्हावा म्हणून युजीसीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. वरील सर्व घोषणा या कागदी घोडे म्हणून न वापरता प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविण्याची हिंमत सरकारने करावी. नाहीतर ‘हवा’च, हा योग्य शब्दप्रयोग शोभेल!
वैभव बावनकर
९५४५७४५५८०
शकुंतलाला अखेर
अच्छे दिन येणार!
मूर्तिजापूर-यवतमाळ (११३ कि.मी.), मूर्तिजापूर-अचलपूर (७७ कि.मी.) व पुलगाव-आर्वी (३५ कि. मी.) या महाराष्ट्रातील १९१७ साली सुरू झालेल्या सर्वांत जुन्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. हे तिन्ही रेल्वेमार्ग क्लिक्स ऍण्ड निक्सन या कंपनीच्या ताब्यात होते. या मार्गाच्या ब्रॉडगेजसाठी २१०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. या तिन्ही मार्गांची ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातून मुक्ती करून याचा विकास होण्याकरिता विदर्भ शकुंतला रेल्वेमुक्ती व विकास समिती, रोहणाकडून गेल्या १७ वर्षांपासून विविध आंदोलनाचे मार्ग अवलंबिण्यात आले. त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांना ५-५ रुपयांचे मनीऑर्डर पाठविणे, शालेय विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड पाठविणे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव पाठविणे, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेली पत्रे, २२ दिवसांचे रोहणा येथील साखळी उपोषण व एक दिवसाचे आर्वी येथे लाक्षणिक उपोषण, खासदार व रेल्वेमंत्र्यांना निवेदन देणे, इत्यादी मार्गाचा समावेश आहे. आर्वीकरांनीही १०० कि. मी. रेल्वे मिशन स्थापन करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही शिष्टमंडळ भेटले. खासदार रामदास तडस यांनीही संसदेत प्रश्‍न उपस्थित केला. परिणामी, अर्थसंकल्पात या मार्गांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल समितीने रेल्वेमंत्री व अर्थमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत. पुलगाव ते आर्वी हा मार्ग पुढे वरूडपर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे या परिसराला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा प्रवास तसेच शेतकर्‍यांचा शेतमाल पोहोचविला जाऊ शकतो. केंद्र सरकारने हे काम त्वरित सुरू करावे, ही विनंती.
बाबासाहेब गलाट
रोहणा