वास्तववाद व आधुनिकता

0
136

कलारंग

विसाव्या शतकात वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या माणसाची प्रगती झाली. याचाही मागोवा कलेतील वास्तववादाने घेतला. कलाकाराने ही वास्तविकता समजून घेतली व तिचा प्रत्यय आपल्या कलेतून जन-समूहाला करून दिला. समीक्षात्मक वास्तववाद हा सामाजिक वास्तववादाचा आधार बनला. सामाजिक वास्तववादाने अनेक नवीन नावे धारण केलीत. उदाहरणार्थ,
१. फ्लायोडोर ग्लडकोव्ह आणि युरी लिबेडन्स्की यांनी सूचित केलेले नाव म्हणजे ‘सामान्य, खालच्या स्तरातील लोकांचा वास्तववाद.’
२. व्ल्याडिमीर मायाकोवस्कीने सुचविलेला ‘सहेतुक वास्तववाद’
३. ऍलेक्झी टॉल्सटॉयचा ‘चिरस्मरणीय वास्तववाद’
४. व्ल्याडिमीर स्तावस्कीचा ‘सामाजिक आशय असलेला वास्तववाद’
५. आयव्हॉन कुलिकचा ‘क्रांतिकारी आणि सामाजिक वास्तववाद’
सामाजिक वास्तववादामुळे कला अधिक वैभवसंपन्न बनली. त्यामुळे ऐतिहासिक घटनांचे आकलन करता आले. त्यांचे अर्थ लावता आले. त्या-त्या वेळच्या जीवन पद्धतींचा सामाजिक व सांस्कृतिक परिवेषात मागोवा घेणे शक्य झाले. जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेश्तने आपल्या नाटकातून स्थळ व काळ यांचा उल्लेख कधीच केला नाही. त्याचे म्हणणे असे की, या घटना कुठेही व केव्हाही घडू शकतात. कारण मानवाचा स्वार्थासाठी होणारा दुरुपयोग सगळीकडे होतो. देश-काळाचे त्याला बंधन नसते. नाट्यकलेच्या संदर्भात ऐतिहासिकदृष्ट्या अगदी स्पष्ट व निश्‍चित असण्याची आवश्यकता नाही, असे त्याचे मत होते. तरीसुद्धा त्याचे, नाटककार म्हणून लिखाण अगदी वास्तववादी आहे. आधुनिक जगाच्या सत्य परिस्थितीचे त्याचे आकलन अचूक असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्याही हे आकलन खरे असल्याची साक्ष पटते. नाटककाराच्या किंवा कुठल्याही कलाकाराच्या वैचारिक दृष्टिकोनामुळे आपल्याला असे वाटू लागते की, तो ऐतिहासिक काळाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मग त्या कलाकाराने दंतकथा लिहिल्या असोत की स्वच्छंदवादी कादंबर्‍या किंवा विज्ञान कथा लिहिल्या असोत.
सामाजिक वास्तववादी कलेत वारंवार रोमांचवादी घटक बघायला मिळतात. नैसर्गिक घटनांनाही स्वप्नमय बनवण्याचा यात प्रयत्न केलेला दिसतो. मात्र या स्वप्नमयी वाटणार्‍या घटनादेखील मनुष्य जीवनाशी संबंधित असतात. जीवन समजण्याच्या दृष्टीने अशा घटनांची योजना केली जाते. ऐतिहासिक पूर्वदृष्टी किंवा पूर्वज्ञानाचा उपयोग करून एक काल्पनिक रूप निर्माण करण्याचे कार्य रोमांचवादी कलेतून घडते. यावरून या गोष्टीचीदेखील जाणीव होते की, कलाकारालासुद्धा ‘बदल’ अभिप्रेत आहे. सामाजिक विकासाशी आपले नाते आहे, याचेही भान कलावंताला सामाजिक वास्तववादातून येते. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कलावंताच्या या मानसिकतेमुळे मॅक्सिम गोर्कीने सांगितलेल्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन ऐक्यांचा सुरेख संगम सामाजिक वास्तववादातून घडतो.
सामाजिक वास्तववादाच्या कला पद्धतीत इतिहासाविषयीची जाणीव व जागरूकता असलेला काल्पनिक विचार असतो. या विचारांचा संबंध वर्तमानातील सौंदर्य-वैभवाशी असतो. सामाजिक जीवनाशी असतो. भूतकाळातील अभिजात कलांची परंपरा हा या सौंदर्य वैभवाचा आधार असतो. जीवन विकासाबद्दलच्या आशावादी कलात्मक संकल्पना सामाजिक वास्तववादाचे एक प्रखर लक्षण आहे. व्यक्तिमत्त्वाच्या ‘नायकत्व’ संकल्पनेचाही त्यात समावेश असतो. सामाजिक वास्तववादी कला पद्धतीत जी पात्रे निर्माण होतात, ती प्रत्यक्ष जीवनात कृतिबद्ध असलेली माणसं असतात. जीवनात ज्यांचा प्रत्यक्ष जीवनात कृतिपूर्ण सहभाग असतो अशी ती माणसं असतात. अशी माणसं जी दुष्ट प्रवृत्तींशी लढताना दिसतात. त्यांच्याशी संघर्ष करताना दिसतात. नायकाच्या भूमिकेत अशी पात्रे प्रत्यक्षात चित्रित केली नसली तरी अशा पात्रांच्या अप्रत्यक्ष असण्याचाही प्रभाव एकंदरीत रचनेवर पडतो. वाचक अशा पात्रांचे आकलन आपल्या कल्पनेत करून घेतो.
सामाजिक वास्तववादाचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे इथे माणसांना केवळ एक वस्तू म्हणून नाही बघितले जात तर त्याला एक व्यक्ती म्हणूनही बघितले जाते. त्याच्याकडे एक इतिहास निर्माता म्हणून बघितले जाते. आपल्या दैवाचा एक सिद्धहस्त पुरुष म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते. कलेचा संबंध मानवाच्या केवळ बाह्यकृतींशी नाही तर त्याच्या आध्यात्मिक सत्त्वाशी आहे. त्याच्या जीवन-वृत्तींशी आहे. याचा आत्म-साक्षात्कार कलेतील सामाजिक वास्तववादामुळे होतो, हे समजून घेतले पाहिजे.
आधुनिक कलावंतांच्या कलेसंबंधी झालेल्या दृष्टिकोनातील परिवर्तनाचा इतिहास म्हणजेच आधुनिक चित्रकलेचा इतिहास, जीवनाच्या दार्शनिक मूल्यांत बदल घडताच त्याचा प्रभाव जसा इतर क्षेत्रांवर पडतो तसाच तो कलाक्षेत्रांवरदेखील पडला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला परंपरागत सामाजिक व धार्मिक निष्ठा कमी व्हायला लागल्या. आधुनिक विचारांच्या स्वीकृतीबरोबरच मानवाचे स्वतंत्र, स्वयंपूर्ण व बहुरंगी व्यक्तित्व, त्याची मनोवैज्ञानिक चिकित्सा व इंद्रीय अनुभूतीच्या रहस्यांचा शोध हे तत्त्व कार्यान्वित होऊ लागले. त्यामुळे या तत्त्वांविषयीची जाणीव जोपर्यंत आधुनिक प्रेक्षकास होणार नाही, तोपर्यंत आधुनिक सर्जनात्मक कलाकृतींचे सौंदर्य समजणे शक्य नाही.
कलावंताचे व्यक्तित्व स्वतंत्र होताच त्याची आत्मिक अभिव्यक्ती व विशुद्ध सौंदर्याचा शोध यात द्वंद्व सुरू झाले. अशा द्वंद्वात्मक अवस्थेत आधुनिक कला गतिमान झाली व तिच्या विभिन्न पैलूंना रूप प्राप्त झाले. आधुनिक कलेचा विरोध करणारे साधारणपणे दोन वर्गात मोडतात. एक वर्ग असा की, जो आधुनिक कलेस तांत्रिक व दुर्बोध समजतो व त्याबाबत विचारदेखील करीत नाही. दुसरा वर्ग असा की, ज्याच्या दृष्टीने आधुनिक कला पाखंडी व विकृत्य आहे व म्हणून तो या कलेचा खरपूस समाचार घेताना दिसतो.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२