वेदाध्ययन म्हणजे काय? (भाग-२)

0
142

टेहळणी

सहस्रावधी वर्षे केवळ मौखिक परंपरेने एखादी गोष्ट दीर्घकाळपर्यंत जतन करून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हे. त्यातही इतक्या वर्षांत उच्चार आणि स्वरात काहीच अंतर पडले नाही, ही आश्‍चर्याची गोष्ट नव्हे काय? तथापि आपल्याकडे जे आहे, ते सर्व हीन अशी दृष्टी इंग्रजांनी दिल्यामुळे आपल्याला या वेदविद्येची काहीच मातब्बरी वाटत नाही. त्यातून संस्कृत ही प्राचीन काळापासून सर्व जणांची भाषा असूनही ती विवक्षित जातीची भाषा असल्याचे आपल्या मनावर खोल ठसवले गेले आहे. त्यामुळे सर्व जगात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याच भाषेकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. हे इंग्रजांनी लावलेल्या वैचारिक विषवृक्षाचे फळ आहे. आज अमेरिका आणि अन्य कैक देशांत संस्कृतचा अभ्यास होतो आहे. अमेरिकेतील सिनेटमध्ये वेदांचा घोष होतो आणि आपण एखाद्या कार्यक्रमात वैदिकांना बोलवायचे असेल तरी दहा वेळा विचार करतो. ही वैचारिक अवनती नव्हे काय? ज्या वर्गाने अत्यंत कष्टाने ही वेदविद्या आपल्या साठी जिवंत ठेवली, त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असते याचा विचार करा, म्हणजे नीट कळून येईल.
संचार म्हणजे काय ते आता जाणून घेऊ. एकसमान, तसाच अथवा तोच शब्द किंवा मंत्र हा संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमध्ये कुठेही वारंवार येणे होय. त्यामुळे देवाच्या आळंदीला निघालेला माणूस कदाचित चोराच्या आळंदीला जाऊन पोचायचा संभव निर्माण होतो. कारण गावांचे नामसाधर्म्य. या उदाहरणात कोणत्याही गावाचा अपमान करण्याचा हेतू नाही पण साधर्म्यामुळे माणसाची फसगत होण्याचा संभव जास्त असतो, इतकेच दाखवायचे आहे. तसेच काहीसे सारखे शब्द वा मंत्रांमुळे होण्याची शक्यता असते. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमध्ये असे सहस्रावधी संचार आहेत. अगदी त्याच संहितेतून वेगवेगळे पाच अध्याय आणि दोन सूक्त एकत्र करून निर्माण केलेले जे पंचसूक्त पवमान आहे त्यात जवळपास अडीचशे संचार आहेत.
ते केवळ समान शब्द अथवा संपूर्ण वा अर्ध्या समान मंत्रांचेच आहेत असे नाही. काही ठिकाणी अध्यायातील एखाद्या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्या विशिष्ट शब्दावर मात्रा नसलेला असाही असू शकतो. त्यामुळे पाठांतर किती चोख हवे ते लक्षात घ्या. पवमानातील एक गंमत सांगतो. एका ठिकाणी ‘शुम्भमान ऋतायुभि: ’ असे आहे, तर दुसर्‍या ठिकाणी ‘शुम्भमानोऋतायुभि:’ असे आहे. परत दोन्हीच्या नंतरच्या ओळी वेगळ्याच असतात. नीट लक्ष नसले तर एका अध्यायातून पुढच्या कोणत्यातरी अध्यायात उडी पडण्याची शक्यता असते. या प्रकाराला संचार जाणे असे म्हणतात. अशीच आणखी काही उदाहरणे पहा म्हणजे येथे एकाग्रता आणि अचूक पाठांतराची आवश्यकता लक्षात येईल.
‘सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्‍चुतः’ हा शब्दाचा संचार झाला. हा सहज लक्षात राहातो असे वाटते पण म्हणताना जरा शब्द इकडचा तिकडे झाला की गाडी रुळावरून घसरते. अनुस्वारात्मक उच्चार असेल तर अधिक बारीक लक्ष असावे लागते. ‘पवतामांतरिक्षा’ आणि ‘पवंतामांतरिक्षा’ हे शब्द पहा म्हणजे लक्षात येईल. पहिल्यातील व या अक्षरावर अनुस्वार नाही पण पुढे आहे. इतका सूक्ष्म फरक ध्यानात राहाणे कठीण असते. त्यामुळे पंचसूक्त पवमान हे पाठ करायला कठीण आहे असे म्हटले जाते. पाठ झाल्यावर सलग आवृत्ती ठेवण्याचा सराव हवा तरच खर्‍या अर्थाने मुखोद्गत होईल.
आता रुद्रातील शब्दसंचार कसा जातो त्याचे उदाहरण पाहू. नमकाच्या पहिल्या अनुवाकातील तिसर्‍या ऋचेची पहिली ओळ ‘यातेरुद्र शिवातनु रघोरा पापकाशिनी|’ पुढची ओळ वेगळी आहे. त्याच नमकाच्या दहाव्या अनुवाकातील दुसर्‍या ऋचेची पहिली ओळ ‘यातेरुद्र शिवातनु: शिवाविश्‍वा हभेषजी|’ अशी असून पुढची ओळ वेगळी आहे. आता रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात, ‘यातेरुद्र शिवातनु’च्या पुढे,शिवाविश्‍वा हभेषजी असे चुकून म्हणाला तरी तो त्यापुढे एकदम दहाव्या अनुवाकातील पुढच्या ओळी म्हणायला सुरुवात करेल. असेच उलटे सुद्धा होऊ शकते. मग तो दहाव्यातून एकदम पहिल्या अनुवाकातील ओळी म्हणू लागेल. यावरून संचार जाणे म्हणजे काय हे अधिक स्पष्ट होईल.
सामान्य बुद्धीचे हे काम नव्हे किंवा सामान्य बुद्धीसुद्धा वेदविद्येने असामान्य होऊ शकते असे म्हणता येईल. एका वेदातील असे सहस्रावधी संचार लक्षात ठेवणे सोपे नव्हे. त्यासाठीच वेदांमध्ये पद, क्रम, जटा, माला आणि घन अशी पाठांतर पद्धतीची उत्तम सोय करून देण्यात आली आहे. याचा योग्य वापर केला आणि तो मेंदूत कोरला गेला की संचाराचे गाडे आडवे आले तरी ते सरळ होते. ज्यावेळी लिखित अथवा मुद्रित आवृत्त्या नव्हत्या त्यावेळी स्मरणात नीट राहण्यासाठी अशा क्लृप्त्या सुचणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा आपल्या पूर्वजांनी उचित उपयोग करून घेतला. वेद हे मंत्रायुक्त असल्यामुळे त्यांच्या अर्थात फार मोठा अर्थ नसतो हे येथे जाणून घेतले पाहिजे. मंत्रांच्या कंपनामुळे योग्य परिणाम साधला जातो. तो अर्थाने साधला जाणे अशक्यच असते. त्यामुळे येथे अर्थापेक्षा मंत्रांच्या उच्चारांना जास्त महत्त्व आहे, हे समजून घेतले पाहिजे.
या सर्व माहितीमागे वेदमूर्ती पराग दिवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे, हे नम्रपणे नमूद करतो. या दोन लेखांत वेदाध्ययन करणे हे किती कष्टाचे आणि जिकिरीचे काम आहे, ते व्यक्त केले आहे. यामागे जे वैदिक आज हे शिक्षण घेऊन आज समाजात वावरत आहेत, त्यांच्याकडे आपण आदराने पाहायला हवे आणि त्यांना योग्य मान द्यायला हवा ही भावना आहे. इतके कळल्यावरही वेद शिकायला काही अक्कल अथवा बुद्धी लागत नाही, असे ज्यांना वाटत असेल त्यांना आमचा कोपरापासून प्रणाम…!!
• डॉ. सच्चिदानंद शेवडे