वादळ समाधिस्थ! : भाऊ जांबुवंतरावांवर अंत्यसंस्कार

0
153

हजारोंची अश्रूपूर्ण श्रद्धांजली
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, १९ फेब्रुवारी
‘आयुष्यभर लोकांसाठी, विदर्भासाठी, देशासाठी जगलो, जळलो. जळतच राहिलो, रक्त आटवले. शेवटी अग्नी देऊ नका, भूमातेच्या कुशीत शांत निद्रा घेऊ द्या’, अशी भावना व्यक्त करणार्‍या विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांना रविवार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या पिंपरी येथील शेतात समाधी देण्यात आली. हजारो कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भाऊंवर अग्निसंस्कार करण्याऐवजी त्यांना मूठमाती देण्यात आली.
तत्पूर्वी, सकाळी ११ वाजता यवतमाळ येथील निवासस्थानावरून भाऊ जांबुवंतरावांची अंतिम महायात्रा निघाली. यवतमाळच्या प्रमुख मार्गांवरून गेल्यानंतर काही काळ त्यांच्या चळवळींचे केंद्र असलेल्या नेताजी भवनाजवळ त्यांचे पार्थिव असलेले वाहन अंत्यदर्शनासाठी थांबवून ठेवण्यात आले. ‘भाऊ जांबुवंतराव अमर रहे’, ‘विदर्भ राज्य लेके रहेंगे’, ‘जबतक सूरज-चांद रहेगा भाऊ तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
नेताजी चौकातून निघालेली ही अंत्ययात्रा पुढे कुठेही न थांबता थेट १२ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपरी या गावातील धोटे यांच्या शेतात पोहोचली. यावेळीही हजारोंच्या संख्येने उपस्थित भाऊंच्या चाहत्यांची घोषणाबाजी सुरूच होती. अनेक कार्यकर्ते तर ढसढसा रडत होते. धोटे परिवारातील निकटवर्तींचा शोकावेग पाहून सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
यावेळी नागपूरचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. भाऊसाहेब झिटे यांच्या अध्यक्षतेत शोकसभा झाली.

केंद्र सरकारच्या वतीने पुष्पचक्र अर्पण
महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील निधड्या छातीच्या व वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी ज्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघायचा, अशा विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय, सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. ती कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भावना व्यक्त केल्या. हंसराज अहिर यांनी भाऊंचे अन्त्यदर्शन घेतले व केंद्र सरकारच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. कै. जांबुवंतराव धोटे यांचे अंत्यदर्शन घेताना हंसराज अहिर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचा सहभाग व सहकार्य अविस्मरणीय असल्याचे सांगितले.