दोन नक्षल्यांच्या अटकेने चळवळीला हादरा

0
115

विशेष अभियान पथकाची कामगिरी
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, २१ फेब्रुवारी
एटापल्ली उपविभागातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील रेकनार जंगलात मंगळवार, २१ फेब्रुवारीला विशेष अभियान पथकातील जवानांनी दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
दुसर्‍या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
दरम्यान, एटापल्ली तालुक्यातील रेकनार जंगलात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी शोध अभियान राबवित असताना अनोळखी इसम संशयितरित्या आढळून आले.
पोलिसांना बघताच घटनास्थळावरून त्या इसमांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून चौघांपैकी दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता नीलेश पोटावी असे त्या नक्षल्याचे नाव असून तो प्लाटून दलम क्रमांक ३ चा सदस्य आहे. दुसर्‍या नक्षल्याचे नाव अजित पुडो असून तो कसनसूर एलओएसचा सदस्य असल्याची माहिती चौकशीत पुढे आली.
सदर दोन्ही नक्षल्यांचा एटापल्ली व धानोरा तालुक्यात घडलेल्या खून, चकमकी, जाळपोळ, काळे झेंडे फडकविणे आदी गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.