शेवटी कायदाच सर्वश्रेष्ठ ठरला

0
106

मनोगत
तामिळनाडूच्या नेत्या शशिकला यांच्यावर अवैध संपत्ती बाळगण्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा आणि नंतर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी अशी कठोर शिक्षा दिली. अवैध संपत्ती जमा करणार्‍यांना कायदा कसा धडा शिकवितो, याचे हे अलीकडचे उदाहरण. यापूर्वी जनावरांसाठीचा चारा खाल्लेेले लालूप्रसाद यादव यांनाही कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आता लालूंचा जामीन रद्द करून त्यांनाही तुरुंगात डांबले पाहिजे.
समीर देशपांडे
अमरावती

थोर पुरुषांची स्मृती जतन करावी
भारतात अनेक थोर योगी पुरुष होऊन गेले. तसेच राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातही थोर विभूती होऊन गेल्या. त्यांची स्मृती कायम जतन व्हावी यासाठी नोटांवर त्यांचे छायाचित्र असावे व टपाल तिकीट काढावे. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी चिन्मयानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, श्रीगुरुजी, डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या विभूतींवर टपाल तिकीट काढावे व नोटांवरही त्यांच्या प्रतिमा असाव्यात. केंद्र सरकारने विचार करावा.
ना. म. तायडे
खामगाव

नक्षवाद्यांची शरणागती
नोटबंदीनंतर जे काही परिणाम समोर आलेत, त्यात ७०० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. ही मोठी उपलब्धी मानावीच लागेल. जे शरण आले नाहीत, त्यांना जिवाला मुकावे लागत आहे. रायपूरमध्ये परवा एका कारवाईत सात नक्षल्यांना ठार मारण्यात आले तर गडचिरोलीत दोन कुख्यात नक्षलवादी शरण आले. नोटबंदीनंतर पैसे संपल्यामुळे हा बदल दिसून येत आहे. तसेही नक्षली आता जंगलात कुत्र्यासारखी भटकंती करावी लागत असल्याने कंटाळले आहेत, असेही गुप्तचर खात्याच्या अहवालात म्हटले आहे. हा एक चांगला संकेत मानला पाहिजे.
अविनाश वानखेडे
नागपूर

पाक कोर्टावर मोठा हल्ला
हाफीज सईद हा पाकिस्तानसाठी घातक असल्याचे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
यांनी केले असतानाच, अवघ्या काही तासात पाकिस्तानातील पेशावरमध्ये सत्र न्यायालयात अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला केला. आता कुठे पाकिस्तानला जाग आलेली दिसते. हा हाफीज सईद आणि त्याचा साथीदार मसूद अझहर या दोघांनी मिळून केवळ पाकिस्तानच नव्हे तर भारत आणि अन्य देशांतही अतिरेकी कारवाया चालविल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांनाही पाकिस्तानने अटक करून फाशीची सजाच दिली पाहिजे.
अशोक जाधव
नागपूर