समाजवादी पार्टीतील घराणेशाहीचा अतिरेक

0
123

दिल्लीचे वार्तापत्र
कौटुंबिक कलहामुळे कॉंग्रेसशी आघाडी करावी लागल्याची कबुली अखेर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना द्यावी लागली. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर समाजवादी पार्टीतील अंतर्कलह उफाळून आला होता.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण होत आले असताना काकापुतण्याचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
समाजवादी पार्टीचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील हा संघर्ष पक्षावर एकहाती नियंत्रण मिळवण्यासाठी होता. पक्षामुळे मी नाही तर माझ्यामुळे पक्ष आहे, मुख्यमंत्री असले तरी अखिलेश यादव यांना काही समजत नाही, ही भावना शिवपाल यादव यांच्यात वाढू लागल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना खुले आव्हान दिले. नंतर जे काही झाले, ते सर्वांना माहीतच आहे.
मुळात या सत्तासंघर्षाचे बीज आपल्या देशातील घराणेशाहीत आहे. देशातील भाजप वगळता अन्य सर्व पक्षांना घराणेशाहीने ग्रासले आहे. कॉंग्रेसमधील घराणेशाहीचा अनुभव देश कित्येक वर्षांपासून घेत आहे. त्यातही राष्ट्रीय पातळीवरील पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे किंवा घराणेशाही हा प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा आधार आहे, असे म्हणावे लागेल. द्रमुक, तेलगू देसम, तेलंगणा राष्ट्र समिती, शिवसेना, बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी हे पक्ष घराणेशाहीचे उत्तम उदाहरण आहे. त्यातही राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टी वगळता अन्य पक्षांनी घराणेशाही एका मर्यादेत जोपासली आहे. पण, या दोन पक्षांनी घराणेशाही जोपासताना सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. कॉँग्रेसमध्ये कॉंग्रेस म्हणजे गांधी घराणे आणि गांधी घराणे म्हणजे कॉंग्रेस आहे. तशीच स्थिती समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाची झाली आहे. त्यातही घराणेशाहीच्या राजकारणात समाजवादी पार्टीने राष्ट्रीय जनता दलावर मात केली आहे.
लालूप्रसाद यादव यांनी सत्ता किमान आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित ठेवली, मात्र मुलायमसिंह यादव यांनी सत्तेचे फायदे संपूर्ण यादव घराण्याला मिळेल, याची व्यवस्था केली. समाजवादी पार्टीत सख्खा भाऊ, चुलतभाऊ, सावत्र भाऊ, मुलगा, पुतण्या, सून यांना सत्तेची फळ चाखता येतील, याची काळजी स्वत:ला राममनोहर लोहिया यांचे शिष्य म्हणवणार्‍या मुलायमसिंह यादव यांनी घेतली. मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकले आहे. घराणेशाहीचे एवढे ओंगळवाणे प्रदर्शन देशातील अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही. घरातील सगळ्यांनी मिळून एखादा वडिलोपार्जित व्यवसाय चालवावा, त्या पद्धतीने मुलायमसिंह यादव समाजवादी पार्टी चालवीत आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे जे पाच खासदार निवडून आले, ते सगळेच्या सगळे मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील आहेत. मुलायमसिंह यादव यांचा पुतण्या धर्मेंद्र यादव बदाउँचा खासदार आहे. धर्मेंद्र यादव मुलायमसिंह यादव यांच्या सख्ख्या भावाचा म्हणजे अभयरामसिंह यादव यांचा मुलगा आहे. तेजप्रतापसिंह यादव हा मुलायमसिंह यादव यांचा दुसरा पुतण्या मैनपुरीचा खासदार आहे. तेजप्रतापसिंह हा मुलायमसिंह यादव यांचा भाऊ रतनसिंह यांचा मुलगा आहे. अक्षय यादव हा फिरोजाबादचा खासदार आहे. अक्षय यादव हा मुलायमसिंह यादव यांचा चुलतभाऊ रामगोपाल यादव यांचा मुलगा आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी आणि मुलायमसिंह यादव यांची सून डिम्पल यादव कन्नौजची खासदार आहे. स्वत: मुलायमसिंह यादवही लोकसभेचे खासदार आहे. म्हणजे समाजवादी पार्टीचे जे पाच खासदार मोदी लाटेतही लोकसभेवर निवडून आले, ते सर्व मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातीलच आहेत.
समाजवादी पार्टीतील अंतर्गत संघर्षात मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात पुतण्याची म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यादव यांची बाजू घेणारे प्रो. रामगोपाल यादव राज्यसभेचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात तर यादव कुटुंबातील जवळपास डझनभर लोक सक्रिय राजकारणात आणि सत्तेच्या विविध पदांवर आहेत. मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव आतापर्यंत समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि अखिलेश यादव मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री होते. या वेळीही शिवपाल यादव जसवंतनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. जसवंतनगरमध्ये आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शिवपाल यादव यांनी केला आहे. त्यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या दुसर्‍या पत्नीचा साधना यादव यांचा मुलगा प्रतीक राजकारणात नाही. कारण त्याला राजकारणात रुची नाही, अन्यथा तोही खासदार किंवा आमदार सहज झाला असता. मात्र त्याची कमतरता त्याची पत्नी अपर्णा यादव यांनी भरून काढली आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार म्हणून अपर्णा यादव लखनौ कॅण्ट मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे.
समाजवादी पार्टी आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखी मुलायमसिंह यादव यांची एकूणच वागणूक आहे. समाजवादी पार्टीतील विद्यमान सत्तासंघर्षाचे मूळ हे या घराणेशाहीत दडले आहे. मात्र अजूनही मुलायमसिंह यादव यांचे डोळे उघडत नाही. सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी करायचा असतो, मात्र मुलायमसिंह यादव यांनी सत्तेचा उपयोग आपल्या सख्ख्या, चुलत भावांच्या, मुलाच्या, पुतण्यांच्या आणि सुनांच्या कल्याणासाठी केला आहे. विशेष म्हणजे, हे करताना आपण काही चुकीचे करत आहोत, असे त्यांना कधी वाटलेच नाही. पक्षाच्या माध्यमातून आपल्या भावांचे, मुलांचे, पुतण्यांचे आणि सुनांचे कल्याण करण्याचा आपला अधिकार असल्याची मुलायमसिंह यादव यांची भावना आहे.
सत्तेचा उपयोग मुलायमसिंह यादव यांनी राज्याच्या विकासासाठी तसेच गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी केला असता, तर उत्तर प्रदेशचा समावेश कधीही देशातील बिमारू (मागास) राज्यांच्या यादीत झाला नसता. सत्तेच्या माध्यमातून मुलायमसिंह यादव यांनी आपल्या सग्यासोयर्‍यांचा विकास केला. त्यामुळे आज सत्तेसाठी त्यांचा भाऊ आणि मुलगा एकमेकांच्या जिवावर उठले आहे.
सत्तेचा जेवढा दुरुपयोग मुलायमसिंह यादव यांनी आपल्या कुटुंबासाठी केला, तेवढा देशातील अन्य कोणत्याही राजकारण्याने केला असेल असे वाटत नाही. सत्तेचा उपयोग आपल्या कुटुंबीयांसाठी करण्यात मुलायमसिंह यादव यांच्या खालोखाल राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचा क्रमांक लागतो. चारा घोटाळ्यात तुरुंगात जायची वेळ आली तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आपल्या पत्नीला राबडीदेवीला बिहारचे मुख्यमंत्री केले होते. लालूप्रसाद यादव यांचा एक मुलगा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री तर दुसरा आरोग्यमंत्री आहे. लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसादेवी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आली आहे. आता तर मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव एकमेकांचे व्याही झाले आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा वाण नाही, पण गुण लागला आहे.
राजकारण्यांच्या मुलामुलींनी राजकारणात येऊच नये, असे कोणी म्हणणार नाही. तळे राखील तो पाणी चाखेलच, त्यामुळे पाणी चाखायलाही हरकत नाही, पण समाजवादी पार्टीतील घराणेशाहीच्या अतिरेकाने उत्तर प्रदेशातील सत्तेचे पूर्ण तळेच रिकामे झाले आहे. सामान्य माणसाची तहान भागवण्याएवढेही पाणी या तलावात राहिले नाही, हाच चिंतेचा विषय आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७