कौशल्यातून स्वविकास व देशाची प्रगती

0
93

एखाद्या योग्यतापूर्ण कार्यासाठी किंवा कार्यपूर्तीसाठी एखाद्यामध्ये असणारे कसब म्हणजेच कौशल्य! खरंतर कौशल्य हे सगळ्यांमध्ये असतेच असे नाही. काहींच्या बाबतीत ते अंगभूत असते, काहींना वंशपरंपरेने प्राप्त झालेले असते, काहींच्या बाबतीत ते संस्काराने प्राप्त झालेले असते, तर काहींच्या बाबतीत ते त्यांनी त्यासाठी घेतलेल्या कष्टाने प्राप्त झालेले असते. वरील कुठल्याही कारणांनी हे कौशल्य प्राप्त झालेले असले, तरीही त्याची अनुभूती, पारख, योग्यता आणि सिद्धता ही केवळ आणि केवळ पारखी व्यक्तीच समजू शकते आणि अशा व्यक्तीकडून झालेले विश्‍लेषणच कौशल्यासंबंधीची योग्यायोग्यता ठरवू शकते. अन्यथा कौशल्याचे परिमाण माहीत नसणार्‍या व्यक्तीकडून त्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन होऊच शकणार नाही.
कौशल्य किवा कुशलता ही कलेच्या बाबतीतच ठरविली जाते असे नव्हे, तर भाषेच्या, लिखाणाच्या, बोलण्या-वागण्याच्या, एवढेच नव्हे तर विचारांच्या बाबतीतही ठरविली जाते. या कौशल्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू नजरेसमोर येत असतात आणि त्याच्या योग्यायोग्यतेची प्रचीती त्याच्या सभोवतालच्या व्यक्ती, व्यक्तिसमूह, समाज आणि त्या अनुषंगाने राष्ट्रालाही येत असते. कौशल्यासंबंधी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू आहेत. यापैकी प्रथम नकारात्मक बाजूचा विचार करावयाचा झाल्यास, चौर्यकलेतील कौशल्य आपल्या नजरेसमोर येते. चोरी कुठल्याही प्रकारची असो, ती छोटी वा मोठी असो, ज्याच्याकडे ती झालेली आहे त्याच्या नुकसानीबद्दल विचार करताना, चोरी होऊ नये म्हणून घेतलेल्या सर्व काळजीचा आणि उपायांचा, साहित्याच्या उपयोगितेचा, योजनांचा
आणि विशेषत: त्यासाठी विचारात घेतलेल्या सर्व शक्कलीचा आणि बुद्धिसामर्थ्याचा भाग एका पारड्यात टाकला, तरीही त्या सर्वांवर कुरघोडी करून सार्‍याच योजनांवर मात करून चोराच्या कौशल्यपूर्वक योजनेने आणि कृतीने सर्वांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडले जाते. त्याच्यामुळे झालेल्या नुकसानीचे दु:ख होत असतानाच त्याच्या कल्पकतेचे कौतुक केल्याशिवाय राहवतच नाही. आम्हा भारतीयांच्या कौशल्याचे कौतुक एका विनोदातून नेहमीच सांगितले जाते. ते म्हणजे जुगाड टेक्नॉलॉजी! परदेशी बनावटीच्या किमती, परंतु भारतीय रस्त्यात अचानक बंद पडलेल्या चार चाकी वाहनाला दुरुस्त करण्याची त्याच्या मालकाची सुरू असणारी धडपड, सारेकाही प्रयत्न केल्यानंतरही तिचे सुरू न होणे, अशा वेळी ती चारचाकी आता त्या वाहन कंपनीकडे नेण्याशिवाय व त्यावर अमाप खर्च केल्याशिवाय गत्यंतर नसताना एका साध्या रस्त्यावरच्या भारतीय मोटार कारागिराने आपल्या जुगाड टेक्नॉलॉजीच्या कौशल्यावर तिला दुरुस्त करून अशक्य वाटणारे शक्य करून दाखविले. यात विनोदाचा भाग जरी वाटत असला, तरीही असल्या प्रकारच्या बर्‍याच कौशल्यामध्ये आम्हा भारतीयांचा वाटा महत्त्वाचा आहे, हे मानावयासच हवे. ‘मेड इन यु.एस.ए.’ अशा प्रकारची कोरलेली अक्षरे असलेल्या आणि अगदी परदेशी बनावटीच्या वाटणार्‍या कित्येक वस्तू या ‘मेड इन उल्हासनगर’मधून येतात आणि आपल्या कौशल्याने त्या ग्राहकाला आकर्षून घेतात की नाही?
आम्हा भारतीयांमधील असलेल्या कौशल्यामुळेच जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये भारतीयांची मागणी होते आहे आणि दिवसेंदिवस ती अधिकच वाढते आहे. कलाकौशल्य, कार्यकौशल्य, भाषाकौशल्य, ज्ञानकौशल्य, विज्ञानकौशल्य, लेखनकौशल्य, संभाषणकौशल्य, वक्तृत्वकौशल्य अशा अनेक कौशल्याचे उगमस्थान असलेल्या भारताने जगाला कायमच काही ना काही दिलेलेच आहे आणि अजूनही देतच आहे. त्यामुळेच भारताने जगात आपले मानाचे स्थान कायम ठेवलेले आहे. आज आपण अंतराळ विज्ञानात एवढी प्रगती केली आहे की, सार्‍या जगाचे लक्ष त्याकडे आकर्षित झाले आहे. अवघ्या ६०० कोटी रुपयांत आपण मंगळावर यान पाठविले, तेव्हा तर अख्ख्या जगाने आश्‍चर्याने तोंडात बोटेच घातली. नुकतेच आपण अमेरिका आणि अन्य देशातील मिळून एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या कौशल्याकडे वेधले गेले आहे. क्षेपणास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही आपण उत्तुंग भरारी घेतली आहे. यामुळे
भारताजवळही जगाच्या तोडीचे तंत्रज्ञान आहे, हे बड्या बड्या देशांनी मान्य केले आहे. हे सर्व अथक परिश्रम व संशोधनकौशल्यामुळेच साध्य होऊ शकले.
कधीकधी असं म्हटलं जातं की, व्यक्तीजवळ ज्ञान नसले तरी चालेल, परंतु कौशल्य असलं पाहिजे. या कौशल्याच्या आधारावर तो निदान उपाशी नक्कीच राहणार नाही. याबद्दल एक रूपक कथा सांगण्यात येते की, एका साधूला नदी पार करून जायचे असते. नावेमध्ये बसून नदी पार करताना आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी तो नावाड्याला, त्याला काय ज्ञान आहे म्हणून अनेक प्रश्‍न विचारतो. नावाडी म्हणतो, मला नाव चालविण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. असे उत्तर आल्यावर, तुझा तर अर्धा जन्म व्यर्थ गेला असे साधू त्याला निक्षून सांगतो. तेव्हा नावाडी त्या साधूला म्हणतो, बघा, नावेला छिद्र पडलेले आहे आणि आपली नाव बुडणार आहे, तुम्हाला पोहता येतं काय? असं विचारतो. त्यावर साधू म्हणतो, मला तर पोहताच येत नाही. साधूच्या या नकारदशर्क उत्तराने नावाडी म्हणतो, अहो साधू महाराज, तुमचा तर पूर्ण जन्मच वाया गेला. हे सांगणे संपत नाही तोच तो नावाडी नदीत उडी घेऊन पोहत पोहत तीरावर जातो. साधूला मात्र पोहता येत नसल्याने त्याला नदीत समाधी मिळते. याचा अर्थ नावाड्याजवळ नाव चालविण्याचे तर कौशल्य होतेच, पण पोहण्याचेही कौशल्य अवगत होते.
जुन्या काळात न्हावी, शिंपी, सुतार, लोहार, चांभार वगैरे हे आपल्या कौशल्याच्या बळावर गावात स्थान मिळवून होते. गावाला त्यांची नेहमीच आवश्यकता पडायची. त्यामुळे या व्यावसायिकांचे प्रत्येक गावात असणे ही त्या गावाची निकड असायची. पुढे यांत्रिकीकरण आल्यामुळे गावातील मिळकत कमी होत गेली. परिणामी हे व्यावसायिक गाव सोडून शहरात जाऊ लागले आणि गावातील लोकांना आपल्याशी संबंधित कामासाठी शहरांचा मार्ग धरावा लागला. आज हेच व्यावसायिक शहरात घट्ट पाय रोवून नुसतेच उभे नाहीत, तर आपल्या व्यावसायिक कौशल्यात अधिक प्रगती करून ते आर्थिक प्रगतीकडेही वाटचाल करताना दिसत आहेत.
भारतीयांच्या या कौशल्याच्या ठेव्याचे जतन करण्यासाठी आणि ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि कौशल्यविकास यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष भर दिलेला आहे. यातून देशातील अनेक कुशल नागरिकांच्या हाताला केवळ काम मिळणार आहे असे नव्हे, तर त्यांच्यातील कौशल्य अधिकाधिक विकसित करून देशाला आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बळकटी मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. यामुळे भारत एक आर्थिक महसत्ता बनण्याच्या मार्गावर अग्रेसर होईल तसेच भारत जगाच्या नकाशावर एक यशस्वी राष्ट्र म्हणून पुन्हा प्रस्थापित होऊन त्याचे जुने परमवैभव पुन्हा प्राप्त होईल.
मधुसूदन (मदन) पुराणिक,९४२००५४४४४