केळीचे पदार्थ

0
318

खाद्यपुराण
हिंदू धर्मात केळींच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा, लक्ष्मीपूजन अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर किंवा पूजेच्या ठिकाणी केळीचे खांब रोवण्याची परंपरा आहे.
मुसा जातीच्या झाडांना आणि त्यांच्या फळास ‘केळी’ असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानलं जातं. सध्या संपूर्ण उष्णकटीबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. केळांच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी ही साडेतीन मीटर असू शकते. केळीची लागवड कंदापासून जाते.
केळीला येणारी फळे ही गुच्छाच्या स्वरूपात येतात. याला ‘घड’ किंवा ‘लोंगर’ असे म्हणतात. एका घडामध्ये साधारणत: १० फण्या असतात आणि एका फणीस १६ ते १८ केळी असतात.
केळीच्या अख्ख्या झाडाचाच आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होतो. जसे केळीचे खांब, केळीची पाने, केळीची फुले, कच्ची केळी, पिकली केळी, जास्त पिकलेली केळी इत्यादींचा खूप उपयोग होतो. जसे दक्षिण भारतात केळीच्या पानांचा उपयोग जेवण वाढण्याकरिता केला जातो. आपल्याकडे तर केळीच्या पानावरील पंगत म्हणजे आकर्षणाचाच विषय असतो.
जनावरांना चारा म्हणूनदेखील केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. तसेच वाळलेल्या पानांचा उपयोग इंधन म्हणून होतो.
केळांमध्ये पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम हे क्षार भरपूर प्रमाणात किंबहुना योग्य प्रमाणात असतात असे म्हणावयास हरकत नाही. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल शून्य आणि फॅट्‌स फक्त ०.३: टक्के असते. त्यामुळे हे फळ उच्च रक्तदाब हायकोलेस्ट्रॉल, धमनीविकार इत्यादींवर पथ्यकारक ठरते.
केळापासून अनेक पदार्थ तयार करता येऊ शकतात. त्यातील बाजारात मिळणारा पदार्थ म्हणजे ‘केळाचे वेफर्स;’ परंतु केळाच्या वेफर्समध्ये मात्र १०० ग्रॅममध्ये ५७६ उष्मांक आणि जवळपास ३३ ते ३५ ग्रॅम फॅट्‌स आढळतात.
केळामधील उत्तम जीवनसत्त्वे व क्षारांमुळे ते अर्धांग वायूचा धोका कमी करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केळे हे ‘प्री बायोटीक’ फुड आहे. ते आतड्याच्या आतील स्तरांचे आरोग्य (स्तरांची स्वच्छता करून) चांगले राखते. यामुळे केळांची पचनक्रियेस मदत होते. ‘ग्लायसेपीक’ लोड जास्त असल्यामुळे मधुमेही रुग्णांनी केळी आहारात समाविष्ट करून घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. १०० ग्रॅम केळात ११६ उष्मांक (कॅलरीज) आणि ०.३ टक्के ग्रॅम फॅट्‌स आहेत. केळात तंतू (म्हणजेच फायबर) भरपूर प्रमाणात असून ते तृप्ती देणारे फळ आहे. तसेच केळांत मानसिक तणाव कमी करणारे घटक आहेत. या सर्व गुणधर्मामुळे एक चांगले पोटभरीचे व पौष्टिक अन्न म्हणून केळाचा वेटलॉसमध्येसुद्धा समावेश केला जाऊ शकतो.
ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे अशांनी केळं हे दोन जेवणाच्या मध्ये खाणे उत्तम. केळं हे मुलांसाठी चंागले ‘एनर्जी फुड’ आहे आणि केळामुळे कफ होतो, हे जोपर्यंत डॉक्टर स्पष्टपणे पालकांना सांगत नाही अर्थात तुमच्या मुलाला केळ देऊ नका असे संागत नाही तोपर्यंत मुलांना जेवणानंतर रोज दोन केळी द्यावीत. रोज दोन केळी खाल्ल्याने सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सची पूर्तता होते. तसेच पचनक्रिया सुरळीत हेाते. एक ग्लास दुधात एक चमचा तूप आणि चिमूटभर विलायची पावडर मिसळावी. हे दूध केळीसोबत प्यावे. नियमित सेवनाने शरीर स्वस्थ होऊन स्मरणशक्तीत वाढ होते.
केळासोबत विलायची खाल्ल्यास केळं बाधत नाही असे म्हणतात तसेच केळ खाल्ल्यावर केळीचे थोडे सालदेखील खाल्ल्यास केळं बाधत नाही, असे ऐकिवात आहे.
सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळ हे फळ जगभरातील सर्व प्रकारच्या खेळाडूंसाठी अतिशय फायद्याचे आहे.
एक केळ खाल्ल्याने पुढील दोन तासापर्यंत २० टक्क्यांनी आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.
आजारपणात कमी आहारामुळे शौचास साफ होण्यास त्रास होतो. केळ खाल्ल्याने शौचास साफ होण्यास मदत होते. केळाचे वैशिष्ट्य असे की, कमी पिकलेले केळ हे मलावरोध ठीक करते, तर जास्त पिकलेले केळ हे (केळाच्या सालींवर काळे डाग हवेत) जुलाबावर गुणकारी ठरते.
केळापासून अनेक पदार्थ तयार करू शकतो. अगदी कोशिंबिरीपासून ते गोड पदार्थापर्यंत. केळाची कोशिंबीर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने तयार करता येते.
केळाची कोशिंबीर
साहित्य – १ वाटी केळाच्या फोडी (घट्टपण पिकलेलं केळ), पाव वाटी सायीचे घट्ट दही, १ चमचा साखर, कढीलिंबाची पाने ४ ते ५, २ ते ३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मीठ चवीनुसार, फोडणीकरिता तेल २ चमचे, मोहरी पाव चमचा, चिमूटभर हिंग, कोथिंबीर सजावटीकरिता.
कृती :- केळाच्या फोडी दही, साखर, मीठ, दाण्याचा कूट एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तेल गरम करून त्यांत मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी कोशिंबिरीवर ओतावी व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
केळ, कांदा, बीट, टोमॅटो कोशिंबीर
साहित्य :- १ मध्यम आकाराचे बीट बारीक चिरलेले, २ केळी बारीक चिरलेली, २ टोमॅटो बारीक चिरलेला, १ कांदा बारीक चिरलेला, १ चमचा साखर, चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, ४ ते ५ चमचे दही.
कृती :- वरील सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
अफलातून चविष्ट कोशिंबीर तयार होते. आवडत असल्यास मिरे पूड किंवा हिरवी मिरची घालू शकता! श्रश्रश्र
केळाची कोशिंबीर
साहित्य – २ वाट्या केळाचे काप, १ वाटी ओल्या नारळाचा कीस, १ वाटी गोड, दही, डाळिंबाचे दाणे (आवडीनुसार) मीठ आणि साखर.
कृती – पिकलेली पण कडक असलेल्या केळाचे पातळ गोल काप करून घ्यावेत. त्यांत डाळिंबाचे दाणे, नारळाचा कीस, मीठ, साखर आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
स्वादिष्ट केळाची कोशिंबीर तय्यार!
केळं, सफरचंद, चिकू, कोशिंबीर
साहित्य :- २ केळी, १ सफरचंद, १ चिकू, अर्धी वाटी मलाईचे दही, काजू, बदामाचे काप १ टे. स्पुन, मीठ, साखर चवीनुसार.
कृती :- केळी कापून घ्या. सफरचंदाचे साल काढुन बारीक चिरून घ्या, चिकू चिरून घ्या. तिन्ही फळे एकत्र करून त्यांत दही, मीठ, साखर आणि काजू, बदामाचे काप घालून चांगले मिश्रण करून घ्या.

नीता अंजनकर/९४२२८३५३७५