सुख-समृद्धी

0
211

मानवी जन्म फक्त हृदयातील ईश्‍वराची प्राप्ती करून घेण्याकरिता, नराचा नारायण होण्याकरिता मिळाला आहे. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती (आत्मसाक्षात्कार) हेच असल्याचे वेद व धर्मशास्त्रात सांगितले आहे. आपण ईश्‍वराकडे काय मागितले पाहिजे, हे कळणे यालाच सद्बुद्धी (ज्ञान) म्हणतात आणि तीच ईश्‍वराकडे मागितली पाहिजे. हे देवा! मला काहीही नको, पण सद्बुद्धी-सद्वासना द्यावी! ही खरी प्रार्थना आहे. सद्बुद्धी म्हणजे देवाचे नामस्मरण करण्याची बुद्धी होणे आणि देवाचे सतत नामस्मरण करीत गेल्यामुळे आपल्या देहातील षड्‌विकार नष्ट होऊन सद्वासना जागृत होतात.

मानवाला धनधान्य व समृद्धी मिळविण्याकरिता रात्रंदिवस कष्ट व मेहनत करून प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर व्हावे लागते. आपला अनमोल वेळ व पैसा खर्च करून मनुष्य सुख, समृद्धी मिळण्याकरिता व जीवन सुखकर होण्याकरिता प्रयत्नरत असतो. संपत्ती मिळविल्यानंतर तिला व्यवस्थितपणे बँकेत, लॉकर, तिजोरीत सांभाळून ठेवावे लागते. कारण धनसंपत्तीमुळेच सर्व प्रकारच्या सुखसोयी व सविधा मिळविता येतात, तिच्यामुळेच जीवनात सुख, समाधान व शांती टिकून राहते, तिच्यामुळेच जीवनातील सर्व प्रश्‍न सुटत असतात, तिच्यामुळेच मोठमोठी कार्ये होत असतात. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांना अत्यंत आदर, प्रेम व सन्मान वाटत असतो. धनसंपत्तीशिवाय जीवन जगणे म्हणजे बिन मिठाच्या अळणी जेवणासारखे आहे. तिच्या प्राप्तीकरिता मनुष्य अनेक प्रकारची संकटे झेलून कष्ट व श्रम करण्यास, मोठमोठी संकटे झेलण्यास, व्यवसायात मोठ्या रकमेची गुंतवणूक करून कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमी प्रयत्नरत असतो.
मानवाला धनसंपत्ती व सुख-समृद्धी मिळून त्याची भरभराट झाली म्हणजे प्रगतीचा मार्ग मोकळा झाला व आपल्यावर ईश्‍वराची कृपा झाली असे वाटते. पण, हे खरे नाही. ईश्‍वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अगोदर त्याच्यासारखे बनावे लागते. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले आहे- ‘‘मम साधर्म्यम् आगता:’’ (गीता अ. १४, श्‍लो. २) म्हणजे तू प्रथम माझ्यासारखा (ईश्‍वरस्वरूप) बन. सोन्याला तापवून ते शुद्ध करावे लागते व ते खरे आहे की खोटे याचा कस लागल्यानंतर खरे असलेले सोने उजळून निघते. ईश्‍वरामधील प्रेम, दया, करुणा, क्षमा, शांती, पावित्र्य, वीरता, निर्भयता, अनासक्ती या सर्व सद्गुणांची कास धरून त्याचे अनुसरण करावे लागेल. या सद्गुणांना आपल्या जीवनात धारण करणार्‍या मानवाच्या जीवनात सुख-समृद्धी, भरभराट येऊन त्याच्या जीवनाचे सोने होईल. जीवनात सुख, संपत्तीबरोबरच समाधान आणि शांती येण्याकरिता ईश्‍वराबद्दलचा दृढ भक्तिभाव मनात जागविल्याशिवाय ईश्‍वराची कृपा कशी होणार?
आपण ईश्‍वराकडे धन, संपत्ती व सुख, समृद्धी प्राप्त होण्याकरिता तसेच अनेक प्रकारच्या सांसारिक मागण्या पूर्ण होण्याकरिता नवस बोलून, व्रत, उपवास करून, वारी करून अनेक प्रकारच्या मागण्या त्या विधात्यासमोर मांडत असतो; परंतु दिवसेंदिवस आपल्या मागण्यांमध्ये वाढ होत जाते, मागण्यांचे स्वरूप वारंवार बदलत असते. पण, आपल्या मागण्या मात्र कधीच संपत नसतात. मग एखाद्या वेळी आपल्या मनासारखे घडले व आपली मागणी पूर्ण झाली की, देवाने मला कौल दिला, देवाने माझे म्हणणे ऐकले, देवाने माझे दु:ख जाणले, असे आपण म्हणत असतो. काहीजण तर ईश्‍वराच्या कृपेमुळेच आपल्याला सर्व काही मिळाले आहे व आमचे सगळे बरोबर चालले आहे, असे (फक्त तोंडाने) म्हणत असतात. यावरून असे दिसते की, आपल्या जीवनातील सुखसोयी, समृद्धी, संपत्ती, सुबत्ता, यश, सौंदर्य या सर्वांना माणूस ईश्‍वरी कृपेशी जोडण्याचा प्रयत्न करीत असतो. पण, या सर्व नाशिवंत गोष्टींचा ईश्‍वराच्या कृपेशी तिळमात्रही संबंध नसल्याचे त्याच्या कधीच ध्यानात येत नाही. आपल्या जन्मोजन्मीच्या प्रारब्ध व कर्मानुसार प्रत्येकाला धनप्राप्ती व सुखसाधने मिळत असतात, हे मायेच्या प्रभावामुळे मानवाच्या लक्षात येत नाही.
मानवी जन्म फक्त हृदयातील ईश्‍वराची प्राप्ती करून घेण्याकरिता, नराचा नारायण होण्याकरिता मिळाला आहे. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती (आत्मसाक्षात्कार) हेच असल्याचे वेद व धर्मशास्त्रात सांगितले आहे. आपण ईश्‍वराकडे काय मागितले पाहिजे, हे कळणे यालाच सद्बुद्धी (ज्ञान) म्हणतात आणि तीच ईश्‍वराकडे मागितली पाहिजे. हे देवा! मला काहीही नको, पण सद्बुद्धी व सद्वासना द्यावी! ही खरी प्रार्थना आहे. सद्बुद्धी म्हणजे देवाचे नामस्मरण करण्याची बुद्धी होणे आणि देवाचे सतत नामस्मरण करीत गेल्यामुळे आपल्या देहातील षड्‌विकार नष्ट होऊन सद्वासना जागृत होतात. आपल्या देहावरील जन्मोजन्मीचे पापसंस्कार, कुसंस्कार नाहीसे होऊन देहाची मोक्षाकडे, पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होते आणि यालाच खरी ईश्‍वराची कृपा म्हणावयास पाहिजे.
ईश्‍वराला प्राप्त करण्याचे ध्येय हे मानवी जीवनाचे एकमेव अंतिम ध्येय आहे, हे प्रत्येक मानवाने लक्षात घेतले पाहिजे. त्याला प्राप्त केल्याशिवाय मानवी जीवनाचे साफल्य कशातच नाही. श्रीमद्शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, रमण महर्षी, अरविंद घोष आदी प्रभृतींनी सत्याच्या प्राप्तीकरिता सांसारिक जीवनाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन पणाला लावले व जीवनातील दिव्यता, सत्य आणि सौंदर्याची अनुभूती (ईश्‍वरानुभूती) प्राप्त करून घेतली आणि ते जीवनमुक्त झाले. शास्त्रग्रंथात पूर्णत्वाच्या प्राप्तीकरिता शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा व समाधान या सद्गुणांना जीवनात आत्मसात करावयास सांगितले आहे. या सद्गुणांना षट्‌संपत्ती असे म्हटले आहे. कारण ही परमार्थ जीवनातील संपत्ती (लक्ष्मी) आहे.
आपले मन गंगेसारखे पवित्र आणि शुद्ध बनण्याकरिता धनसंपत्ती, सुखसमृद्धी, पापपुण्य या सर्वांच्या पलीकडे गेल्याशिवाय आणि धर्माचरणाने वागल्याशिवाय मनाची शुद्धी व विकास होणे शक्य नाही. सुख- दु:ख, प्रीती-द्वेष, पाप-पुण्य, यश-अपयश या सर्वांना एक परिसीमा (मर्यादा) असते आणि आत्मस्वरूप ईश्‍वर या सर्व प्रकारच्या मर्यादांच्या पलीकडे असल्यामुळे तो नित्य, शुद्ध, बुद्ध, पवित्र आणि सर्वव्यापक आहे. तो सर्वांमध्ये सामावलेला असून सर्वांच्या अतीत आहे. तो साक्षीस्वरूप व ब्रह्मस्वरूप आहे. तोच सर्वत्र नटलेला असून, तोच सर्व काही झालेला आहे, सर्व त्याचीच लीला आहे म्हणून या सर्व बंधनांच्या पलीकडे गेल्यानंतरच ईश्‍वराची खरी कृपा अनुभवास येईल व आपले जीवन धन्य होईल.
योगेश जोशी- ९९७०४५१७५७