जादुई संगीत

0
229

मस्तकी जटा धारण केलेल्या, अंगावर भस्माचे विलेपन केलेले, माथ्यातून ज्यांच्या गंगा वाहते आहे, भाळावर चंद्रकोर असलेले, छातीवर सर्पमाळ असलेले पार्वतीचे प्रिय असलेल्या भगवान शंकराचं नटराज हे रूप संगीताच्या उपासकांचं लाडकं दैवत आहे. गायक, वादक आणि नर्तक याच नटराजाची उपासना करतात. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात याच नटराज पूजनाने होते. हातात डमरू घेऊन त्याच्या तालावर नृत्य करणारे भगवान शंकर आपणा सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्या नटवराच्या आशीर्वादाने संगीताची साधना सफल होते, असा समज जनमानसात दृढ आहे.

‘‘गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते’’
अशी संगीताची व्याख्या अगदी लहानपणी संगीतण शाळेत जायचो तेव्हाच संगीत शाळेतील शिक्षकांनी सांगितली होती.
गायन, वादन आणि नर्तन या तिन्ही कला मिळून संगीत तयार होते. संगीताला आपल्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. मला आठवतंय्, लहानपणी झोपेतून जाग यायची तेव्हा आजी अगदी हलक्या आवाजात चहा करता करता
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी, उदयाचळी मित्र आला’
किंवा
‘जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला’
वा ‘देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा’
अशी भक्तिगीतं गुणगुणत असायची. अर्धवट झोपेत, पण कानांना, मनाला ते छान सुखावह आणि प्रसन्न वाटायचं. घरोघरी रेडियो आले. मग आकाशवाणीवर ‘मंगल प्रभात,’ ‘अर्चना,’ ‘वंदनवार’सारख्या भक्तिसंगीताने सकाळ उजाडायला लागली.
सार्‍या संगीताचा मूळ पाया भारतीय संगीत हाच असला तरी अनेक गीत प्रकार त्यात तयार होतात, जे सर्वसाधारण सर्व लोकांना माहिती असतात. भूपाळी, भक्तिगीते, भावगीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, देशभक्ती गीते इत्यादी गीत प्रकार, संगीताचे विशेष कुठलेही शिक्षण न घेता सर्वसाधारण सर्व लोक ऐकू वा गुणगुणुसुद्धा शकतात.
तसं पाहिलं तर संगीत आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अगदी तान्ह्या बाळालासुद्धा झोपवताना आपण अंगाई वा एखाद्या गीताच्या ओळी गुणगुणत असतो.
देवाला सकाळी भूपाळी म्हणून जागे करतो. भजन, भक्तिगीतातून देवाची स्तुती गातो.
शूरवीरांच्या गाथा पोवाड्यातून गातो. देशाबद्दल आदर-भक्ती देशभक्तीपर गीतातून व्यक्त करतो. विरहाची व्याकुळता गीतातून हळवी होते. प्रेम-शृंगार या भावना गीतांचा आधार घेत पाकळी पाकळीने फुलतात. असं किती काय सांगावं? शाळा-कॉलेजचे ते दिवस आठवून बघा. गणेशोत्सव, शारदोत्सवातील भावगीत स्पर्धा, ऑर्केस्टाचे आयोजन, एखाद्या विख्यात गायन-गायिकेचे गायन, शाळा-कॉलेजेसमध्ये होणार्‍या गाण्यांच्या स्पर्धा व कार्यक्रम आणि सगळ्यांपेक्षा सारा वेळ आपल्या सेवेत असणारे आकाशवाणीवरील अनेक हिंदी-मराठी गाण्यांचे कार्यक्रम. जाता-येता, चालता-फिरता, कामात असताना, अभ्यास करताना रेडियो सुरू. कानावर सतत संगीताचे सूर रुंजी घालायचे.
मला आठवतंय्, अभ्यास करतानासुद्धा एकीककडे रेडियोवर गाणी चालू असायची, बोटांनी टेबलवर ठेका धरलेला असायचा, पावलांनी ताल साधलेला असायचा आणि वहीत उत्तरे लिहून बघणे चालू असायचे वा एखादे महत्त्वाचे उत्तर पाठ करणे, पण सोबत गाणी मात्र चालू असली पाहिजे. त्याविना अभ्यास नाही व्हायचा. त्यासाठी क्वचित बोलणीही खाल्ली आहेत, पण ते मनावर नाही घेतलं. संगीताशिवाय श्‍वास नाही अशी गत.
संगीत नाटके आली की, पहिल्या दोन ओळीत बसून बघायची. पुढच्या एका आठवड्यात त्यातील सारी गाणी तयार झालीच पाहिजे हा ध्यास.
मग संगीतावर अनेक शोध लावण्यात आले.
वेगवेगळे प्रयोग करून, काही गोष्टी शास्त्राचा आधार घेऊन सिद्ध केल्या गेल्या. संगीताच्या सहवासाने वनस्पतींची वाढ अधिक जोमाने आणि चांगल्या रीतीने होते, हे सिद्ध झाले. मग सातत्याने व नियमितपणे त्याचा वापर केला जाऊ लागला.
संगीतात एक वेगळीच जादू आहे, हे मात्र खरं. उदास मनाला संगीत तरतरी आणतं. संगीताच्या साधनेतून ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग जातो. मनुष्य स्वभावात असणारे सारे भाव संगीतात सामावले असतात.
संगीत या शब्दाची उकल सं=स्वर, गी=गीत, त=ताल अशी आहे. शास्त्रीय संगीताची तर गोष्टच वेगळी. मात्र त्याचं विशेष शिक्षण घेतलं की, त्याची मजा पुरेपूर लुटता येते. साहित्यात नऊ रस मानले जातात.
१) शृंगार २) हास्य ३) करुण ४) रौद्र ५) वीर ६) भयानक ७) बीभत्स ८) अद्भुत ९) शांत.
मात्र यापैकी केवळ चार रसांचा (भाव) संगीतात वापर केला जातो. ते म्हणजे-
१) शृंगार रस २) वीर रस ३) करुण रस ४) शांत रस.
याचं कारण म्हणजे याच चार रसांमधून संगीताद्वारे आनंदाची अनुभूती मिळू शकते. साधारणपणे सूर्योदयाच्या वेळेस आनंद व उत्साहाचा अनुभव आपल्याला येतो. दुपारच्या वेळी शांत रसाची निष्पत्ती होतेे. ऐन संध्याकाळी (सूर्यास्त) तिन्हीसांजेला कारुण्य, विरह रसाची उत्पत्ती होते. तसं तिन्हीसांजेला म्हणजे धड संध्याकाळ नाही आणि रात्रही नाही अशा वेळी विरहाची भावना अधिक तीव्रतेने निर्माण होते आणि रात्रीच्या वेळी शृंगार रसाची निष्पत्ती होते, असं शास्त्रीय संगीत सांगते. तरी आता सुगम संगीत, चित्रपट संगीत इत्यादीमध्ये व इतर अन्य प्रकारात सरसकट नऊही रसांचा वापर केला जातो.
शास्त्रीय संगीतात रागांची रचना ही वेळेनुसार झालेली आहे. इतकंच नाही तर ऋतुमानानुसारही राग तयार केले आहेत. काही तरबेज गायक आपल्या गायकीच्या प्रभावाने व स्वरांवरच्या केवळ हुकमतीने कोणत्याही वेळेस त्या वेळेचा वा त्या ऋतूचा आभास निर्माण करू शकतात.
पूर्वी असं सांगतात की, संगीतसम्राट तानसेनाने ‘दीप’ राग आळवला की, आपोआप सारे दिवे प्रज्वलित व्हायचे आणि मल्हाराचे सूर छेडले की, पाऊस कोसळायचा आणि ती शक्ती खरोखर संगीतात भरून आहे.
कोसळत्या मल्हाराचे स्वर कानावर पडले की, मनाला वाटून जातं की एक तर पाऊस तरी मल्हार रागात कोसळतो आहे आणि किंवा मल्हाराचे सारे स्वर पावसाच्या लयीमध्ये बद्ध केले आहेत. इतके बेमालूमपणे मल्हार राग आणि पाऊस एकमेकांत मिसळले असतात.
आता आता तर अनेक आजारांवर संगीत उपचाराच्या स्वरूपात काम करते, असंही सिद्ध झालंय्. पुढील काही राग त्या दृष्टीने बघायला हरकत नाही?
‘राग’ ‘आजार’
१) पूरियाधनश्री – मन स्थिर राहण्यासाठी व जळजळीसाठी
२) बागेश्री – मधुमेह व रक्तदाब
३) दरबारी – मानसिक ताण
४) तोडी – उच्च रक्तदाब, थंडीमुळे असणारी डोकेदुखी
५) अहीर भैरव – रक्तदाब आश्‍चर्यकारक रीत्या उतरतो ताना ऐकल्याने
६) मालकंस – कमी रक्तदाब
७) भैरवी – टी.बी., कॅन्सर, सर्दी, सायनस, दातदुखी
८) मल्हार – अस्थमा, उष्माघात
९) हिंडोल व मारवा – रक्ताच्या शुद्धीकरणासाठी.
हे नमुन्यादाखल दिलेले काही राग व त्यांचे परिणाम आहेत. हा एक भाग जरी झाला तरी संगीताशी आपणा सार्‍यांची नाळ कायमची जुळलेली आहे. संगीत आवडत नाही अशी व्यक्ती सहसा नसतेच आणि जर असेल तर महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे-
‘‘साहित्य संगीत कलाविहिन:
साक्षात पशु: पुच्छविषाणहीन:’’
अशीच त्या व्यक्तीची ओळख सांगता येईल.
संगीताची आपली एक वेगळी भाषा असते. जात, धर्म, वय, लिंग, भाषा या सार्‍यांच्या पलीकडे जाऊन संगीताची जादू आपल्या तनामनावर, एखाद्या तलम रेशमी रुमालाने अलवार स्पर्श करावा अशी पसरत जाते आणि सारं जीवन संगीतमय होऊन जातं. खरंच ना आपल्या जीवनात आनंद, सुख, शांती, समाधान, स्फूर्ती या सार्‍या गोष्टी भरपूर प्रमाणात मिळण्याचं संगीत हे किती सुंदर आणि महत्त्वाचं आहे नाही? संगीताशिवाय आयुष्य ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही, इतकं संगीत आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. किती नीरस, किती बेचव, किती निरर्थक झालं असतं आयुष्य संगीताशिवाय?
संगीत समजून शिकायला लागले म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापासून एका गीताने मनावर कायमची मोहिनी घातली आहे. कवी शैलेंद्र यांनी लिहिलेलं ‘बसंत बहार’ चित्रपटातील हे गीत-
‘‘सूर ना सजे क्या गाऊ मैं
सूर के बिना जीवन सुना
संगीत मन को पंख लगाये
गीतों के रिमझिम रस बरसाये
सूर की साधना परमेश्‍वर की’’
खरंच! देवाची भक्ती करावी तशी संगीताची साधना करून सार्‍या स्वरांना प्रसन्न करून घ्यावं लागतं. सारे स्वर प्रसन्न होऊन त्यांचा वरदहस्त आपल्या मस्तकी असला की, रोमारोमांत संगीत भरून राहतं, नसानसातून संगीत वाहू लागतं, प्रत्येक श्‍वासोच्छ्‌वासाला संगीताची लय सापडते आणि हृदयात, मनात संगीताचे झरे वाहू लागतात. सारं आयुष्य संगीतमय होऊन जातं. आनंदी, समाधानी, कृतार्थ, तृप्त!
मीनाक्षी मोहरील/ ९९२३०२०३३४