‘कुछ करनेवाला प्रधानमंत्री’ हीच मोदींची प्रतिमा

नोटबंदीचा उद्देश चांगलाच : चेतन भगत

0
142

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २४ फेब्रुवारी
गेल्या काही वर्षांमध्ये नव्या पिढीसमोर पंतप्रधानपदावर असलेली व्यक्ती नेमकी काय करते, तिने काय करायला पाहिजे, ती काय करू शकते, असे अनेक प्रश्‍न होते. या प्रश्‍नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस उत्तर दिले आहे. प्रधानमंत्र्यांची कामे काय हे माहीत नसले तरी मोदी नक्कीच काहीतरी करीत आहेत आणि करतील असा विश्‍वास भारतातील तरुण पिढीमध्ये निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी येथे केले.
यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एक्सप्लोअर-१७’ या तांत्रिक महोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी चेतन भगत आले होते. मुळात आयआयटीयन आणि आयआयएम असलेले भगत पत्रकारांशी बोलत होते.
‘टाईम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केलेल्या चेतन भगत यांच्या सात इंग्रजी कादंबर्‍या संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. ‘थ्री इडिएट्‌स’, ‘काय पो चे’, ‘टू स्टेट्‌स’, ‘हॅलो’ या चित्रपटांचे कथा लेखक आणि ‘कीक’ या चित्रपटाचे पटकथा लेखक असलेले भगत सध्या युवा पिढीत अफाट लोकप्रिय आहेत.
यावेळी बोलताना भगत म्हणाले, अनेक वर्षांनंतर काहीतरी करून दाखवणारा आणि काहीतरी नक्कीच करेल, असा विश्‍वास कमावणारा नेता म्हणून नवीन पिढी नरेंद्र मोदींकडे पाहते, यात संशय नाही. ‘बल्ला घुमाओ, टुकटुक मत करो’ असा ‘२०-२०’ चा हा काळ आहे आणि मोदींना ते उत्तम जमले आहे.
‘नोटबंदी’कडे या देशातील बहुसंख्य नागरिकांनी गंमत म्हणून पाहिले. सावकारांचे हाल होताना पाहून सर्वसामान्य जनतेला आनंद होतोच. तसाच आनंद नोटबंदीमध्ये नागरिकांनी पाहिला. हा निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने अमलात येऊ शकला असता. पण उद्देश निश्‍चितपणे चांगलाच होता, अशा शब्दांत चेतन भगत यांनी नोटबंदीचे समर्थन केले.
‘हर खेत मे इंजिनीअरिंग’ अशी स्थिती झाल्यामुळे अनेक अभियांत्रिकी विद्यार्थी आणि महाविद्यालयांची दुर्दशा झाली आहे. आता दर्जाशिवाय काहीही चालणार नाही. दर्जा नसलेली अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झालेली आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अभियंता होत असलेल्या किंवा झालेल्या मुलांनी स्वत:हून नव्या संधी शोधण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याने नवीन क्षेत्रही शोधायला हरकत नाही, असा सल्ला देतानाच चेतन भगत यांनी, मला नागरिकांसोबत राहायला आवडते, असे सांगितले. मी नेहमीच भारत जाणून घेत असतो आणि त्यातूनच मला नवीन लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.