‘जेएनयु’चे शिक्षक विद्यार्थ्यांना बहकवतात

0
130

देशात नक्षलवादाची गरजच नाही
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची चिंता
चांदा आंतरराष्ट्रीय माहितीपटाचे उद्‌घाटन थाटात
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २४ फेब्रुवारी
माहितीपट जनजागरणाचे प्रभावी माध्यम आहे. पण देशात काही चिंताजनक विषयांवर विशेषत्वाने प्रकाश टाकला गेला पाहिजे. देशात ‘जेएनयु’सारखी संस्था आहे, जी अक्षरश: बहकलेली आहे. येथील शिक्षकच विद्यार्थ्यांना देशाच्या विरोधात बहकवतात. देशबांधणीत शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे आहे. पण जेएनयुच्या शिक्षकांना काय झाले, हेच कळेनासे झाले आहे. देशात नक्षलवादाची गरजच नाही. नक्षल्यांची दहशत, आदिवासींचा वापर, आदिवासींनीच आदिवासींना मारणे आणि या प्रश्‍नावर सरकारला करावा लागणारा खर्च, हे सारे विनाकारण आहे. याशिवाय ड्रग्जच्या आहारी गेलेला तरुणवर्ग हे सारे विषय गंभीर असून, त्यावर प्रकाशझोत टाकला गेला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे व्यक्त केली.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने शुक्रवार, २४ फेब्रुवारीपासून शहरात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार होते, तर मंचावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, निर्माते-निर्देशक किरण शांताराम, ‘शेअर्स ऑफ सायलेन्स : व्हेल्स शॉकर्स इन इंडिया’चे ख्यातनाम निर्माते-निर्देशक माईक पांडे, फिल्म डिव्हिजनचे महानिदेशक मनीष देसाई, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित, माजी राज्यमंत्री संजय देवतळे, प्रशांत पोटदुखे, स्वाती पांडे प्रभृती उपस्थित होते.
अहिर पुढे म्हणाले, माहितीपट प्रबोधनाचा विषय आहे. याद्वारे देशातील गंभीर समस्यांवरही प्रबोधन व्हावे, असे वाटते. ड्रग्जच्या आहारी गेलेला युवकवर्ग हा चिंतेचा विषय आहे. पंजाबमधील तरुण तर पार व्यसनाधीन झाले आहेत. आधी पंजाबमध्ये बालक देशाच्या सैन्यात जाण्यासाठीच जणू जन्म घ्यायचे. पण आता ड्रग्जने हे चित्र बदलवले आहे. अशा प्रश्‍नावरही या माध्यमातून जनजागृती व्हावी, असेही ते म्हणाले.
मनीष देसाई म्हणाले, डिजिटल मीडियामुळे आज माहितीपटात अनेक परिवर्तन झाले आहेत. माहितीपट हे आज ‘मॉस मूव्हमेंट’ बनले आहेत. भारत सरकारचे फिल्म डिव्हिजन त्यासाठी तत्पर आहे. आज गंभीर चित्रपटांची चर्चा होणेही आवश्यक आहे. चंद्रपूरसारख्या छोट्याशा शहरात फिल्म फेस्टिव्हलचेे आयोजन बघून आनंद होत आहे. माईक पांडे यांनी, चंद्रपुरात माहितीपट महोत्सवाचे आयोजन संपूर्ण देशासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले. आज माहितीपटांची आवश्यकता आहे. कारण माहितीपट हे अंधार मिटविण्यासाठी प्रकाशकिरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रसिकप्रेमी एकत्र येऊन माहितीपटाचे आयोजन करीत असल्याचे बघून कौतुक वाटते. दादासाहेब फाळके यांनी, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला, तर व्ही. शांताराम यांनी त्यावर कळस चढविला, असे किरण शांताराम यांनी सांगितले. माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी, एक माहितीपट वरोडा येथील महारोग्यांवर व प्रकाश आमटेंवर बनविण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली. आशुतोष सलिल यांनी, माहितीपट महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दारूबंदी, वृक्षारोपण, ताडोबावरही माहितीपट बनावा : मुनगंटीवार
माहितीपटांना जीवनात फार महत्त्व आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी, वृक्षारोपण व ताडोबा यावर माहितीपट बनविण्यात यावा, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी केली आणि या माहितीपटांसाठी कलाकार शोधण्याची गरज नसून, चंद्रपुरात चांगले कलाकार मिळतील, शिवाय येथील युवकांना प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. विदर्भात चंद्रपूर जिल्हा नाट्यगृहासाठी ओळखला जाईल, एवढे उत्तम दर्जाचे नाट्यगृह या जिल्ह्यात तयार होत असल्याचेही मुनगंटीवार यांनी संागितले.