पाण्याची वाढती पातळी लोणार सरोवरासाठी धोक्याची घंटा

0
168

विजय कुळकर्णी
खामगाव, २५ फेब्रुवारी
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील खार्‍या पाण्याचे सरोवर हे जागतिक आश्‍चर्य असून देश- विदेशी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या सरोवरातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. ही सरोवरासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
या गावाचे नाव लोणार म्हणजे लवण म्हणजे मिठ अर्थात खारेपणा यावरून पडले आहे. लोणारचे खारे पाण्याचे सरोवर हे नावही त्याच खारेपणावरून पडले. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे येथे पडलेली उल्का बॅसाल्ट खडकात खूप खोलवर रुतली. त्यामुळे मोठा खड्डा तयार झाला. या नैसर्गिक उलथापालथीमुळे हे सरोवर तयार झाले. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक स्त्रोतांशिवाय दुसरे कुठलेही पाणी या सरोवरात येऊ शकत नाही. यात पडलेले पावसाचे पाणी दरवर्षी बाष्पीभवनाने उडून जाते. त्यामुळे बाजूच्या रिममधून पाझरणार्‍या पाण्यातील खार तेथे जमा होतो. म्हणून त्याचा खारेपणा तयार झाला. मात्र, गेल्या काही वर्षात सरोवराच्या पाण्यात वाढ होऊ लागली आहे. याकडे खामगाव येथील छायाचित्रकार व लोणार सरोवराचे निरीक्षक गो. वि. खेकाळे यांनी संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. या घटनेचे कारण शोधण्यासाठी पर्यटन विभागाने पुणे येथील इकोनेट या संस्थेला या समस्येचे कारण शोधण्यासाठी सर्व्हे करण्यास नियुक्त केले. या संस्थेने १९९९ मध्ये सर्व्हे करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार शासनाच्या काही विभागांनी लोणार परिसरात केलेल्या विकास कामांचा लोणार सरोवराच्या वैशिष्ट्यावर नकारात्मक परिणाम होईल का, याचा विचार न करता ही कामे केल्याचे म्हटले आहे. १९८४ मध्ये लघु पाटबंधारे विभागाने लोणार तालुक्यातील देऊळगाव कंदेफळ येथे एक पाझर तलाव बांधला. हा तलाव लोणार सरोवराच्या दक्षिण-पश्‍चिम दिशेस २ कि. मी. अंतरावर आहे. २.८ एमसीएफटी एवढी त्याची साठवण क्षमता असून त्या माध्यमातून १०० हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. हा पाझर तलाव व इतर साठवण तलावातील पाणी जमिनीत जिरते. त्यामुळे सरोवरातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानंतर पाण्याची पातळी वाढण्याच्या मुद्यावरून चर्चेला उधाण आले. हा विषय समाजाच्या चिंतेचा झाला. या विषयाला धरून काही चर्चासत्रे होऊन त्यात अनेकांनी आपापली मते मांडली. काही जलतज्ज्ञांनी तर कोरड्या सरोवरात पाणी वाढल्याचा आनंद व्यक्त केला. तरीही इकोनेटच्या निष्कर्षापेक्षा अधिक अभ्यास करून त्यात आणखी काही सापडते का हे पाहण्यासाठी जीएसडीएने याच कारणासाठी दुसरा सर्व्हे केला. २००८ मध्ये तो जाहीर करण्यात आला. या अहवालात म्हटले आहे की, सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी इतर कोणतेही कारण दिसत नाही. सरोवराच्या भिंतीला, बाहेरून पाणी येईल अशा भेगा दिसत नाहीत. देऊळगाव कुंदेफळ येथील पाझर तलावातील पाणी जमितीन मुरून सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होणे किंवा न होणे हे सांगता येत नाही, अशी नरो वा कुंजरोवाची भूमिका मांडली. पण, सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, हे मान्य केले. पण, हे पाणी कुठून येते याचा शोध घेतला नाही. त्यामुळे सर्व्हेक्षणाचा मूळ उद्देश सफल झाला नाही. अहवालावरून निघालेले निष्कर्ष शासकीय अधिकारी मान्य करायला तयार नाहीत. तसेच ही समस्या ऐकून घेण्यासही कोणी तयार नसल्याची खंत खेकाळे यांनी व्यक्त केली आहे. इकोनेटने दिलेल्या अहवालात देऊळगाव कुंदेफळच्या पाझर तलावातून पाणी येते, असे नमूद आहे. तर, जीएसडीच्या अहवालात या पाझर तलावातून पाणी येणार्‍या झर्‍यांची दिशा पहावी लागेल, असे म्हटले आहे. या दोन्ही परस्पर विरोधी अहवालामुळे ही समस्या कायम आहे. हा प्रश्‍न निकाली निघावा म्हणून खेकाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांनी १९ फेब्रुवारी २०१७ रोजी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मुद्दा क्र. १५ नुसार देऊळगाव कुंदेफळ पाझर तलावातून पाणी झिरपत नसल्याचा जीएसडीएनएच्या अहवालाचा दाखला दिला आहे. तेव्हा, यात पुढील कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र, सरोवराच्या जलस्तरात आजही वाढ होत आहे. तेव्हा, हा प्रश्‍न कायमच आहे.
सरोवरात ज्युलीफ्लोराचे (सुबाभूळ) प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा, सुबाभुळीची झाडे कापावी, असा प्रस्ताव समितीने जिल्हाधिकारी यांना दिला होता. मात्र, या झाडांची संख्या खूप आहे. ३५ ते ४० वर्षांपासून ही झाडे असल्याने त्याची तेथील पशु-पक्ष्यांना सवय झाली आहे. ही झाडे तोडल्यास या पशु-पक्ष्यांना धोका होऊ शकतो, असे म्हटले आहे. अशा प्रकारे प्रशासनाचा खेळ सुरू आहे. वाढते पाणी आणि वाढते सुबाभूळ यामुळे सरोवराला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व विकासाच्या गोंडस नावाखाली होत आहे.
३ मार्चपासून लोणार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने लोणार सरोवर विकासाचे ढोल पुन्हा वाजू लागतील. त्यामुळे खार्‍या पाण्याचे अश्रू आणखी खारे होतील. जगातील इतर आश्‍चर्य नष्ट झाले तर ते पुन्हा निर्माण करता येतील. पण, निसर्गाने निर्माण केलेले लोणार येथील खार्‍या पाण्याचे सरोवर नष्ट झाल्यास पुन्हा कधीच आणि कोणीच निर्माण करू शकणार नाही, एवढे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया खेकाळे यांनी व्यक्त केली आहे.