नवनिर्वाचित नगरसेविकेची कार जाळली

0
138

तभा वृत्तसेवा
अमरावती, २५ फेब्रुवारी
युवा स्वाभिमानच्या वडाळी प्रभागातून विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सपना ठाकूर यांची कार अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार, २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री जाळून टाकली. या घटनेमुळे चांगलाच संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनीच हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सपना ठाकूर यांची एमएच २७ एसी ९१९३ क्रमांकाची झायलो कार त्यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या एका खुल्या भूखंडावर उभी होती. मध्यरात्रीच्या सुमारास तिला आग लागल्याचे आजुबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ठाकूर कुटुंबीयांना ही माहिती दिली. सर्वप्रथम काही दूर अंतरावर असलेले गॅस सिलेंडरचे वाहन बाजूला करण्यात आले. त्यानंतर सामूहिक प्रयत्नातून आग विझविण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन चौकशी सुरू केली. आ. रवी राणा शनिवारी सकाळी घटनास्थळावर पोहोचले होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विरोधकांनी कारला आग लावल्याचा संशय ठाकूर परिवाराकडून व्यक्त करण्यात आला आहे.