कार उलटून दोन बालक जागीच ठार, चार जण जखमी

0
267

तभा वृत्तसेवा
सिरोंचा, २५ फेब्रुवारी
येथून १२ किमी अंतरावरील कालेश्‍वराचे दर्शन घेऊन सोमनूरकडे जाणार्‍या चारचाकी वाहनाला भीषण अपघात होऊन दोन बालक जागीच ठार झालेत, तर चारजण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी वरंगल येथे हलविण्यात आले.
सदर अपघात शनिवार, २५ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील राजनपल्ली फाट्याजवळ घडला.
गडचिरोली येथील बोबाटे व म्हस्के कुटुंबीय मारुती सुझुकी वेनुस व्हीडीआय (क्र. एमएच ३३/ए ४६३३) या चारचाकी वाहनाने शनिवारी कालेश्‍वर व सोमनूर दर्शनासाठी गेले. सकाळी कालेश्‍वर मंदिराचे दर्शन घेऊन सोमनूरकडे निघाले असता राष्ट्रीय महामार्गावरील राजनपल्ली फाट्याजवळ चालते वाहन पंक्चर होऊन तीन पलट्या घेतल्या.
या भीषण अपघातात संस्कार धनवंत बोबाटे (६ वर्षे) व कार्तिकेयी धनवंत बोबाटे (४ वर्षे) हे चिमुकले जागीच ठार झालेत, तर पोर्णिमा धनवंत बोबाटे (३५ वर्षे), ईशा रमेश म्हस्के (१३ वर्षे), रमेश मोतीराम म्हस्के (४२ वर्षे), विनोद मोतीराम म्हस्के (३२ वर्षे) हे चारजण जखमी झाले.
या जखमींपैकी पोर्णिमा बोबाटे व ईशा म्हस्के ह्या दोघी गंभीर जखमी झाल्याने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वरंगल येथे हलविण्यात आले.
सदर घटनेचा तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.