एकाच दिवशी चार खून

0
155

चारही घटनांतील आरोपींना अटक
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २५ फेब्रुवारी
जिल्ह्यात पांढरकवडा, घाटंजी, महागाव व दारव्हा तालुक्यांत शुक्रवार, २४ फेब्रुवारी या एकाच दिवशी चार खून झालेत. या खुनांमधील सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी शनिवार, २५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक काका डोळे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख उपस्थित होते.
पांढरकवडा येथील घटनेत पंकज प्रकाश मडकाम या गावगुंडाचा रॉडने मारून खून करण्यात आला. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी चंद्रशेखर पांडुरंग देशट्टीवार (वयसोनबर्डी), मिथुन तुळशीदास उईके (पांढरकवडा) व कुणाल महादेव भगत (पांढरकवडा) यांना अटक केली आहे.
घाटंजी येथे जुन्या वादातून अक्षय भोरे याच्यावर अक्षय उर्फ बक्सा संतोष मसकर (घाटंजी), चेतन सुखदेव टेकाम (वय घाटंजी) व आकाश संतोष मसकर यांनी शुक्रवार, २४ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता प्रोफेसर कॉलनीमध्ये रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय भोरेचा मृत्यू झाला. यातील सर्व आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महागाव येथे पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून चार वर्षीय धीरज किशोर जाधव याच्या हत्येप्रकरणी त्याच्या वडिलांनाच अटक करण्यात आली आहे. धीरज याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीने दिलेल्या बयाणावरून किशोर गोविंद जाधव (रा. सातधरी) याला अटक केली आहे.
दारव्हा तालुक्यातील हरू येथे घडलेल्या घटनेत, पत्नीकडे वाईट नजरेने का पाहिले, या कारणावरून वाद घालत आरोपीने विजय भीमराव चव्हाण याला शिवीगाळ करीत घरातून कोयता आणून विजयच्या मानेवर वार केला. यात विजयचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भीमराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून विजय गोबरसिंह पवार याला अटक करण्यात आली आहे.
चारही खून प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी फरार होण्यापूर्वी त्यांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी या पत्रपरिषदेत दिली.