मोहर्ली बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू

0
137

तभा वृत्तसेवा
भद्रावती, २५ फेब्रुवारी
बेलपत्र आणायला गावाबाहेर गेलेल्या इसमावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. ही घटना शनिवार, २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जंगलव्याप्त सीतारामपेठ शिवारात घडली.
गुलाबराव संभाजी धांडे असे मृतकाचे नाव आहे. त्याचे गाव सीतारामपेठ हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून आहे. पाणी पिण्यासाठी या प्रकल्पातील वाघ गावानजीकच्या तलावावर येतात. गुलाबराव धांडे हा महाशिवरात्रीच्या पाडव्याकरिता गावालगतच्या जंगलात बेलपत्र आणावयास गेला असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला असता त्यात तो जागीच ठार झाला. वाघाने त्याला ३०० ते ४०० मीटर अंतर फरफटत नेले.
मृतकाच्या माधुरी नामक मुलीचे २३ एप्रिलला लग्न ठरले आहे. शेत नसल्याने वनमजुरीचे काम करणार्‍या गुलाबराव यांना पत्नी व दोन मुली आहेत.
या घटनेची माहिती कळताच भद्रावती येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि. प. सदस्य मारोती गायकवाड, डेव्हीस बागेसर, नेताजी चावरे, सूरज चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
यावेळी वनविभागाकडून २५ हजार रुपयांची तातडीची मदत मृतकाच्या वारसांना देण्यात आली. तसेच मारोती गायकवाड यांनी स्वत:कडून १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
घटना समजल्यानंतर ताडोबा बफर वनविभागाचे उपसंचालक गजेंद्र नरवने, सहायक वनसंरक्षक पी. बी. ब्राह्मणे तसेच भद्रावती पोलिस घटनास्थळी गेले. तेथे पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेने नागरिक शेतावर जाण्यास घाबरत आहेत.
नागरिकांमध्ये दहशत
सीतारामपेठ व भामडेळी या दोन गावांमधून उन्हाळ्यात जंगलातील वन्यप्राणी इरई धरणावर पाणी पिण्यासाठी जातात. नजीकच्या काळात रिसॉर्टवाल्यांनी या पट्ट्यात संरक्षक भिंती बांधल्याने वन्यप्राण्यांना या दोन गावांमधून पाणी पिण्यास जायला भाग पाडले जात आहे म्हणून ही घटना घडल्याचे ग्रामवासीयांचे म्हणणे आहे. यावर संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रिसोर्ट बांधकामावर बंदी घाला : बंडू धोतरे
अवास्तव रिसोर्ट बांधकामांमुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या परिसरात रिसोर्टच्या बांधकामांवर बंदी घालणे गरजेचे आहे. सोबतच ‘कोअर झोन’पासून किमान २ किलोमीटर अंतरापर्यंत अशा बांधकामांना परवानगी नसतानासुद्धा एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांना डावलून या भागात अनेक रिसोर्ट बांधण्यात आल्याचे मानद वन्यजीव सचिव बंडू धोतरे यांनी तभाशी बोलताना सांगितले.