ज्येष्ठ नागरिक, समाज आणि सरकार

0
101

मंथन

लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर शेजारचा चीन आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याचे मानले जाते. पण, त्याच वेळी ६० पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे, याकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त समाजातल्या ज्येष्ठांचा सत्कार केला जातो. मात्र, नंतर ज्येष्ठांना परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी एकटे सोडले जाते, ही बाब काळजी वाढविणारी आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात जी आकडेवारी समोर आली आहे, तीसुद्धा चिंता करायला लावणारी आहे. १२१ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या आता ८.६ टक्के एवढी झाली आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.
२००१ ते २०११ या कालावधीत ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या संख्येत ३५.५ टक्के वाढ झाली आहे. २००१ साली अशा ज्येष्ठांची संख्या ७ कोटी ६० लाख एवढी होती, ती २०११ साली १०.३ कोटी एवढी झाली. १९५० सालापासून मोजण्यात आलेल्या वाढीत ही सर्वाधिक वाढ म्हणून नोंदली गेली. २००१ ते २०११ या कालावधीत भारताच्या एकूण लोकसंख्येत १७.७ टक्के वाढ नोंदविली गेली. मात्र, ज्येष्ठांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. आधुनिकीकरणामुळे आपल्याकडची जी सामाजिक स्थिती आहे ती लक्षात घेता, ज्येष्ठांची वाढती संख्या हे भविष्याच्या दृष्टीने एक आव्हान मानले जाते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात ज्येष्ठांची जी अवस्था झाली आहे, ती कुणापासूनही लपून राहिलेली नाही.
ज्येष्ठांची संख्या फक्त भारतातच वाढते आहे असे नाही. संपूर्ण जगात वाढीचा कल दिसतो आहे. वाढलेल्या वयातील लोकांना अनेक समस्या सतावत असतात. म्हातारपणी कमाईचे साधन नसते. साठीपर्यंत केलेल्या कमाईतून केलेल्या बचतीवर जे व्याज मिळते, त्यातून चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्‍न अनेक ज्येष्ठांना सतावत असतो. स्वत:च्या प्रकृतीची काळजी आहे, औषधपाणी आहे, अन्य सामाजिक प्रश्‍न आहेत. उतारवयात समाजात काम करण्याची संधी मिळेलच असे नाही. काम करण्याची संधी मिळाली नाही तर ओळखही मिळत नाही. त्याचप्रमाणे, कल्पकता असूनही काही नवीन करण्याची संधी मिळाली नाही तर फावल्या वेळेत करायचे काय, हाही प्रश्‍नच आहे. ज्येष्ठांसाठी जशी ही समस्या आहे, तशीच ती समाजासाठीही आहे. ज्येष्ठांची काळजी कशी घ्यायची, जगण्यातला आनंद त्यांना घेता यावा यासाठी काय केले पाहिजे, ज्येष्ठांची सुरक्षा कशी केली पाहिजे, हे आपल्या समाजापुढील सगळ्यात महत्त्वाचे अन् चिंता करायला लावणारे मुद्दे आहेत.
ब्रिटन आणि अमेरिकेतून नुकतीच ज्येष्ठांबाबत एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार या दोन्ही देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या दोनच नव्हे, तर जगातल्या सगळ्याच संपन्न देशांमध्येही ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढते आहे. ब्रिटन-अमेरिकेतून जी माहिती समोर आली आहे, ती नीट वाचली तर २०५० साली ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या दुप्पट होणार आहे, असे लक्षात येईल. जगात ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या आजच ४ टक्के आहे. २०५० पर्यंत ही संख्या दहा टक्के होईल, असा अंदाज आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आरोग्य सुविधा दर्जेदार आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. पण, या सगळ्या ज्येष्ठांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडल्या असल्याने स्वस्थ, सुरक्षित जीवन कसे जगावे, हा मोठाच प्रश्‍न आहे. अनेक ज्येष्ठांना गंभीर आजार झाले आहेत. पण, सगळ्यात गंभीर आजार आहे आणि तो म्हणजे अल्झायमरचा! या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीराचा कोणतातरी एक भाग २४ तास थरथरत असतो. संपूर्ण जगात हा आजार आहे आणि त्यावर अजूनतरी प्रभावी औषधोपचार सापडलेला नाही. ही काळजी वाढविणारी बाब आहे.
अल्झायमरनंतर दुसरा गंभीर आजार होतो तो हृदयाचा आणि हाडांचा. अशा आजारांनी ग्रस्त ज्येष्ठांना नेहमीच इतरांच्या मदतीची गरज असते. अशा ज्येष्ठांना दीर्घकाळपर्यंत रुग्णालयात ठेवता येईल अशी सुविधा सगळ्याच देशांमध्ये उपलब्ध नाही, हे लक्षात घेणेही गरजेचे आहे. अमेरिका-ब्रिटनसारखे जे समृद्ध देश आहेत, तिथे ज्येष्ठ नागरिक एकदा का रुग्णालयात दाखल झाले की, तिथून लवकर घरी जाण्यास तयार नसतात. त्यामुळे जपानसह अशा संपन्न देशांनी यावर तोडगा काढला आहे. ‘केअर होम’ फॅसिलिटी या देशांनी उपलब्ध करून दिली आहे. संपन्न देशांमध्ये ज्या ज्येष्ठांना रुग्णालयात ठेवले जाते, त्या देशांमधले त्यांचे नातेवाईकही आपल्या घरातील ज्येष्ठांना घरी घेऊन जाण्यास तयार नसतात. जेवढे जास्त दिवस रुग्णालयात उपचार केला जाईल, तेवढे ते करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, रुग्णालयांसाठी ज्येष्ठांना जास्त दिवस ठेवून घेणे शक्य नसते. शिवाय, खर्चाच्या दृष्टीनेही ते परवडणारे नसते. त्यामुळेच आजारी ज्येष्ठांनी रुग्णालयात येण्याऐवजी केअर होममध्ये जावे, असे सुचविले जाते. आपल्या भारतातही पुढल्या काळात अशीच परिस्थिती येईल, यात शंका नाही. त्यामुळे येणार्‍या संकटाचा विचार आताच केला पाहिजे. ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना टाकून तर देता येत नाही, हा विचार करून संपूर्ण समाजाने पुढाकार घेत ज्येष्ठांसाठी आताच ठोस उपाय केला तर पुढला काळ कठीण जाणार नाही. आपणही एक दिवस ज्येष्ठ होणार आहोत आणि आपल्यावरही संकट येऊ शकते, एवढा जरी विचार प्रत्येकाने केला तरी बरेच काम फत्ते होऊ शकते.
आपल्याकडे सामाजिक-आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. समाजात ज्येष्ठांना जे आदराचे स्थान यापूर्वी होते, ते तेवढे राहिले नाही. ज्येष्ठांशी बोलतानाची आपली भाषा बदलली आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या अनुभवातून एखादा सल्ला दिला तर त्यांची टिंगलटवाळी करण्यासही आपण मागेपुढे पाहात नाही. काही अपवाद जरूर आहेत. पण, एकूण परिस्थितीचा विचार केला तर विषय चिंतेचाच आहे. आज अनेक ज्येष्ठांकडे पैसाअडका आहे, मोठे घर आहे, पण त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणी नाही. त्यांची स्वत:ची मुलंही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. एकतर अनेकांची मुलं विदेशात आहेत आणि दुसरे म्हणजे बापाकडे जेवढा पैसा आहे, त्याच्या दुप्पट-तिप्पट पैसा मुलगा आणि सून कमावते आहे. कुठे संस्कारांची कमतरता जाणवत असल्याचे दिसते आहे. ज्येष्ठांप्रती आपले काही कर्तव्य आहे, याचा सोईस्कर विसरही अनेकांना पडल्याने त्यांच्या घरातील ज्येष्ठांवर दुर्लक्षित, असुरक्षित, असहाय जीवन जगण्याची वेळ आली आहे. नागपुरात मागे एक घटना घडली होती. समृद्ध कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक असलेल्या पती-पत्नीने आजाराला आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा परदेशात होता आणि मुलगी भारतातल्या अन्य शहरात. दोघांनाही आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. शेवटी पैसा-अडका, मोठे घर, घरी कार असूनही वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. अशी परिस्थिती निर्माण होण्यास आपण नेहमीच पाश्‍चात्त्य संस्कृतीला दोषी ठरवितो. पण, आपण आपली मुलं लहान असतानापासून त्यांच्यावरील संस्कारांचा पाया मजबूत करतो का, हेही प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आज जे तरुण संसारात आहेत, त्यांनी पुढल्या काळासाठीची योजना आतापासूनच करून ठेवली पाहिजे. अन्यथा, आपण आज आपल्या घरातील ज्येष्ठांची जी अवस्था केली, तीच आपली उद्या होईल, याची खात्रीच बाळगली पाहिजे.
ज्येष्ठांच्या आपल्याकडून फार अपेक्षाही नसतात. त्यांना पैशांचा वा अन्य कशाचा मोह नसतो. त्यांना हवे असते कुटुंबीयांचे प्रेम, जिव्हाळा. दिवसातून एकदोन वेळा तुम्ही त्यांची आस्थेने विचारपूस जरी केली तरी त्यांना बरे वाटते. त्यांची अर्धी प्रकृती तर तशीच बरी होते. आपल्याला विचारणारे कुणी आहे, आपली काळजी घेणारे कुणी आहे, ही भावनाच त्यांना सुखावून जाते. बाहेर जाताना आपण त्यांना सांगून गेलो, किती वेळात परत येणार हे त्यांना सांगितले, तर त्यांचा सन्मान झाला, असे त्यांना वाटते. दुर्लक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात राहात नाही. एवढे जरी कुटुंबातील सदस्यांनी ज्येष्ठांसाठी केले तरी मोठा प्रश्‍न सुटू शकतो. आपल्याच घरातील नव्हे, तर समाजातील सर्वच ज्येष्ठांच्या बाबतीत आपली वागणूक ही सकारात्मक असली पाहिजे.
‘‘ए बुढ्‌ढे, दिखता नहीं क्या? समजता नहीं क्या? बुढ्‌ढेे को सुनाई नही देता क्या? अक्ल कम हैं क्या? नुसतेच वय वाढले काय?…’’ अशा भाषेत जेव्हा आपल्याकडची तरुणाई ज्येष्ठांशी बोलते, तेव्हा काळजी अधिक वाढते. अर्थात, यालाही अपवाद आहेत. अनेक तरुण ज्येष्ठांची मदत करतानाही दिसतात अन् ते चित्र अतिशय सुखावह असते, यात शंका नाही.
संपन्न देशांनी ‘केअर होम’ सुरू करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असला तरी भारत, ब्राझील आणि आशियातील अन्य अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल, असे वाटत नाही. म्हातारपणात आपल्याच मुलाबाळांनी आपली काळजी घ्यावी, अशी आपल्याकडच्या ज्येष्ठांची इच्छा असते. परंतु, त्यांची ही इच्छा पूर्ण होतेच, असे नाही. कुटुंबातले अनेक तरुण सदस्यांना उपजीविकेसाठी घरातून, गावातून बाहेर पडावे लागते. अनेक तरुण सदस्यांना घरातल्या ज्येष्ठांवरील उपचाराचा खर्च झेपत नाही. त्यामुळेही ज्येष्ठांकडे आपोआप दुर्लक्ष होते. या स्थितीवर कसा तोडगा काढता येईल, यावरही समाज आणि सरकार अशा दोन्ही पातळ्यांवर विचार करावा लागणार आहे. अनेकांना आईवडिलांना सांभाळण्याची इच्छा नसते आणि अनेकांना उपजीविकेसाठी कराव्या लागणार्‍या संघर्षामुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे काही लोक घरातल्या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात, तर काही त्यांना वृद्धाश्रमात सोडून येतात. वृद्धाश्रमातल्या आईवडिलांना अधूनमधून भेटायला ते जरूर जातात. पण, वृद्धाश्रमातील या ज्येष्ठांना तिथे सुरक्षित वाटत नाही. ते असहाय होऊन बसतात. आपले कुणी नाही, अशी त्यांची भावना होते. घरातल्या एका कोपर्‍यात ठेवा, पण आम्हाला घरी न्या, अशी आर्त हाक ते देत असतात. पण, ती हाक ऐकली गेली नाही तर ते निराश होतात. अनेक वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांची देखभालही नीट होत नाही. त्यामुळे तर नैराश्यात अधिकच वाढ होते. मग, अशा दुर्लक्षित ज्येष्ठांचा अकाली मृत्यू ओढवतो. चीनमध्ये सध्या ज्येष्ठांची परिस्थिती सगळ्यात वाईट आहे. कारण, तिथे एक अपत्य धोरण दीर्घकाळ राबविले गेले. त्याच्या परिणामी ज्येष्ठांची संख्या भरपूर वाढली. ज्येष्ठांची काळजी घेणार्‍यांची संख्या कमी झाली. चीनमध्ये २०२५ साली तर चार माणसांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक असेल. दुसरे असे की, चीनमधील बहुतांश ज्येष्ठांना डिमेन्शियाने ग्रासले आहे. काही क्षणांपूर्वी आपण काय बोललो, काय केले, याचाही विसर त्यांना पडतो. ही एक मोठी गंभीर समस्या बनली आहे. दुर्दैवाने चिनी समाज आणि चीनचे सरकार ज्येष्ठांकडे पूर्ण क्षमतेने व काळजीने लक्ष देऊ शकत नाही. भारतातही दीर्घ जीवन जगणार्‍या ज्येष्ठांच्या मनातही असहायतेची भावना निर्माण होत आहे. ही भावना दूर करण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांची आहे.
आपल्या देशात सरकारची इच्छा असूनही सरकार आरोग्यविषयक सोई-सुविधा पुरविण्याकडे फार लक्ष देऊ शकत नाही. आपल्याकडे गावखेड्यांमध्ये तर आरोग्यविषयक सोई-सुविधा नसल्यात जमा आहे. या गंभीर समस्येकडे राज्य सरकारे, केंद्र सरकार आणि संपूर्ण समाजाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आपणही एक दिवस म्हातारे होणार आहोत आणि आपल्याकडे त्या वेळी कुणी लक्ष दिले नाही तर आपली अवस्था काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिक जसे दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत, तसे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत होऊ शकते, अशी भीती आजच सतावू लागली आहे. आज आमचा देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो हे ठीक आहे, पण भविष्यात तो दुर्लक्षित म्हातार्‍यांचा होणार नाही, याची काळजी आतापासूनच घेतली जाणे गरजेचे ठरते…

गजानन निमदेव