मन मनास उमगेना…

0
175

कथा

सकाळी आईचा फोन आला. बाबांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. आय.सी.यू.त आहेत. तसे बाबा हार्ट पेशंट. बीपी खूप वाढलं होतं. बरेच दिवसांपूर्वी रवींद्रकडेही असाच फोन आला होता. नाईलाजास्तव आईला असा फोन करावा लागला. नाहीतर आई? शक्यच नाही. एक वेळ ती स्वत: आजारी पडेल, ऍडमिट होईल आणि खूप सोसेल, पण बाबांना आजारी पाडणं शक्यच नाही. असा विकृत खेळ बाबांच्या बाबतीत आई खेळणं शक्य नाही.
गेल्या दोन वर्षांत रवींद्र घरी फिरकलाच नाही. याच गोष्टीचं आई-बाबांना फार दु:ख! दिवाळी-दसर्‍याला नाही की गणपती- महालक्ष्म्यांनाही नाही. फार तर कधी तरी एखादा फोन. भाषण अगदी औपचारिक. या अशा वागण्याने आई वैतागली आणि जुन्या पिढीतला जालीम उपाय अमलात आणला. बाबांना आयसीयूत ठेवलंय म्हणताच रवींद्र धावत पळत नाहीतर विमानाने उडत आला. पुणे-नागपूर विमान. नागपूर-अमरावती टॅक्सी असा प्रवास करून घरी पोहोचला. बघतो तर बाबा सोफ्यात बसून टीव्हीवरच्या बातम्या पाहात होते.
सगळं आलबेल पाहून रवींद्र भडकलाच आणि एकदम फायरिंग सुरू केले. ‘‘आई अगं ही कुठली जीवघेणी थट्टा. माझी दोन दिवसांची सुटी वाया गेली. विमान भाडं आणि टॅक्सीचा खर्च वेगळाच. ऑफिसात सगळ्यांना कळल्यानंतर सगळी हसतील मला. कठीण आहे हे सगळं!’’
आई ही शेवटी आईच असते. मुलाच्या बॉसिंगला जराही भीक न घालता जरा अधिकच आक्रमक झाली. ‘‘अरे मेल्या, परदेशात राहणारी मुलं न चुकता दरवर्षी आई-वडिलांना भेटायला येतात. तुम्ही आपल्याच देशात राहून पुण्याहून अमरावतीला, आम्हाला भेटायला येऊ शकत नाही. अशी कोणती कंपनी आहे रे तुझी की, जन्मदात्यांना भेटू देत नाही. मेल्यांनो, तुम्हाला बाहेरचंच आकर्षण भारी.’’
आई श्‍वास घ्यायला म्हणून थांबली तेव्हा बाबा धीर गंभीर स्वरात म्हणाले, ‘‘हे बघ बाळा, मुलींचे पालक आपल्या दारासमोर रांग लावून उभे आहेत. अरे ते लोक कुठून कुठून आपला पत्ता, फोन नंबर मिळवतात. मग प्रथम फोन मग मुलीच्या फोटोबरोबर तिचा बायोडेटा पत्रिका पाठवतात. आशेवर असतात ते. बघ माझ्या टेबलावर ढीग पडला आहे नुसता. काय उत्तर देऊ? एकदा तुझं मत कळलं तर बरं म्हणून तुझ्या आईने मला आयसीयूत पाठवलं.’’
तेव्हा रवींद्रने डोक्यावर हात मारून घेतला. ‘‘आधी हे सांग, तुला लग्न करायचंय की नाही? एवढं कळलं की मी मोकळी!’’
तिथे दोन दिवस राहून रवींद्र पुण्याला न जाता तडक नागपूरला माझ्या घरी आला. ‘‘ताई अगं, प्लीज मला वाचव. थोडं माझ्या बाजूने आईजवळ बोल की.’’ ‘‘अच्छा, म्हणजे स्वारी प्रेमात पडली आहे म्हणायची.’’
‘‘होय गं ताई, पण ही गोष्ट आई-बाबांना कशी सांगू?’’ कळत नाही बघ मला. अगं भीती वाटतेय.’’
‘‘इंटरकास्ट का? म्हणूनच एवढी भीती वाटतेय.’’ ‘‘होय गं. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतोय आणि गुंतलो पण आहोत. आता मागे फिरणे अशक्य.’’
‘‘काही कठीण नाहीये. हल्ली सर्रास इंटरकास्ट मॅरेजेस होतात. त्यात तुझं आणिक एक. अरे रवी जग खूप बदललंय्. जातीपातीचा कोणी एवढा बाऊ करत नाही.’’
‘‘ते खरंय गं, पण धर्म?’’
‘‘धर्म?’’ क्षणभर मी सुन्न झाले. रवींद्र काय बोलतोय हेच मला कळेना. ‘‘आंतरधर्मीय लग्न? बाप रे! याकरिता मी आईजवळ रदबदली करावी. या बाबतीत आईशी सामना करणं अवघडच! आई मलाच एक सणसणीत ठेवून देईल.’’
‘‘ए ताई प्लीज काही तरी कर गं!’’- रवींद्र अजिजीने बोलत होता. मला विनवत होता. मी अगदी गप्प होते. काय करावं कळत नव्हतं. भानावर आले तेव्हा रवींद्र माझ्या उत्तराची वाट पाहात आहे हे दिसलं. ‘‘बरं बघते काही तरी करते,’’ पोकळ आवाजात मी पोकळ आश्‍वासन दिलं.
पुढच्याच रविवारी मुलांना ह्यांच्या जवळ ठेवून मी अमरावतीला गेले. काम अशक्य कोटीतलं आहे हे मला समजत होते, परंतु मी वचनबद्ध होते. अगदी साध्या शब्दांत सगळं सांगितल्यावर, बाबा बिचारे शांत होते. आईचा ज्वालामुखी आग ओकू लागला. ती जवळ जवळ एक ते दीड तास न थांबता बोलत होती. मुलाच्या शिक्षणावरचा खर्च, नोकरीसाठी त्याचं बाहेर रहाणं, कुठले तरी मित्र, त्यांच्या भलत्या सलत्या सवयी; परजातीच्या, परधर्माच्या मैत्रिणी, कुणाला कुठली तरी घाणेरडी व्यसनं तर कुणाला काही. आईने एकही पॉईंट सोडला नाही. बोलून थकल्यावर आई उठून तरातरा आपल्या खोलीत गेली. बाबांनी एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही, ही गोष्ट मला फार लागली होती.
त्यानंतर बरेच दिवस गेले. लग्नाच्या बाबतीत काहीच प्रोग्रेस होईना आणि आज अचानक आईचा फोन आला. बाबा आयसीयूत आहेत. मला तो दिवस आठवला त्या वेळी आईने मनातला राग, संताप, दु:ख भडाभडा बोलली होती. बाबा बिचारे सगळा तमाशा पाहात होते, ऐकत होते. आतल्या आत गुदमरत होते. या घटनेचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांचं बी.पी. वाढत होतं, कधी एकदम कमी व्हायचं. मी पूर्णपणे ओळखून होते की, आईने त्या काळात रवींद्रला भरपूर शिव्याशाप दिले असणार. आम्ही दोघे धावत पळत अमरावतीला गेलो. दार उघडलं ते रवींद्रनेच. आम्ही अवाक्! रवि अन् इथे.
बाबा खरोखरीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि तेही आयसीयूत! लांडगा आला रे आला ही गोष्ट त्या क्षणी मला आठवली. रवींद्र गप्प गप्पच होता. दोन-चार दिवसांत बाबांना बरं वाटलं आणि ते घरी आलेसुद्धा! आता फक्त आराम करायचा. पूर्ण विश्रांती.
दुपारची जेवणं आटोपल्यानंतर आईने तिच्या खोलीत मला एकटीलाच बोलावलं. तिने पसंत केलेल्या मुलींपैकी पाच मुलींचे फोटो माझ्यापुढे ठेवले व म्हणाली, ‘‘बघ पसंत कर एक मुलगी.’’
‘‘अगं आई ज्याला लग्न करायचं त्याच्यापेक्षा तूच जास्त आनंदीत दिसतेस अन् मला काय विचारतेस पसंतीबद्दल!’’
‘‘होय बाई आता तो इथेच नोकरी शोधतोय. दोन-चार ठिकाणी इंटरव्ह्यू झालेत. मिळेलच!’’
मी चकित झाले. आश्‍चर्याने मी तोंड वासलं.
‘‘आई अगं, तुझा हा आनंद रवींद्रला किती महागात पडतोय हे कळतंय का तुला!’’
‘‘हे बघ दोन-चार हजारांनी काही फरक पडत नाही. मुंबई-पुण्याला रहायचं म्हणजे घरासाठी डिपॉझिट, भाडं, मेंटेनन्स, वीज बिल, काय अन् कित्ती खर्च तो! इथे अमरावतीत आपलं स्वत:चं एवढं मोठं घर आहे. मोठ्या शहराच्या मानाने सगळं स्वस्त!’’
‘‘आई, पण त्याची हुशारी, करिअर या गोष्टी लक्षात घे की!’’ आई ऐकण्याच्या मुडमध्ये नव्हतीच मुळी. मग मी आपली गप्प झाले.
‘‘हे वधुपिते खूप मागे लागलेत. एकदा तरी मुलगी बघायला या, की इथेच दाखवायला आणू?’’
‘‘आता काय उत्तर देऊ त्यांना, असं झालं होतं मला, पण थँक गॉड चिरंजीव इथेच आले अन् माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व झालेत!’’
आई आपल्याच नादात बोलत होती. या वीस मुलींमधून मी पाच निवडल्या. आता तू पसंत कर कोणती आणू या ती!’’
‘‘कशाकरिता?’’ माझा एक मूर्ख प्रश्‍न.
‘‘हो, माझं मॅरेज ब्युरो आहे म्हणून लोकांच्या मुलींचे फोटो गोळा करतीये.’’ क्षणभर थांबून पुढे म्हणाली.
‘‘इतकी कशी गं तू वेंधळी. रवींद्रकरिता निवड यातली एक.’’ आता आईच्या शब्दांना धार येऊ लागली.
‘‘अगं आई पण त्याला विचारलंस का?’’- मी हताशपणे विचारलं.
‘‘ए बाई तुला काय मी वेडीबिडी वाटले की काय?’’- इति आई.
‘‘तो हो म्हणालाय.’’- आई म्हणाली. नंतर पंक्चर झालेल्या टायरसारखी मी झाले होते.
‘‘हो बाई, ऐकलं न माझ्या लेकराने, पण किती मान, मानमिंता, किती विनवण्या, केवढी आर्जव! अक्षरस: दातांच्या कण्या झाल्या. अगं देवासाठी एवढ्या विनवण्या केल्या असत्या तर संदेह वैकुंठाला गेले असते, तुकोबांसारखी! जे होतंय ते चांगल्यासाठीच. रवींद्रानी मलाच मुलगी पसंत करायला सांगितली आहे. वर म्हणाला, आई सून तुला हवी आहे. तुझी पसंती ती माझी पसंती. बघ, कित्ती शहाणं आहे माझं बाळ.’’
‘‘आईने एक फोटो माझ्यापुढे ठेवला म्हणाली, ‘‘मला हीच आवडली. पोस्ट ग्रॅज्युएट आहे. हायस्कूलला अकरावी- बारावीला गणित शिकवते. नाव प्रियंका आहे.’’ मुलीचं रूप, गुण, घराण्याचं वर्णन सुरू होतं अन् मी नुसती मान डोलवत होते.
आई चार वाजता देवळात गेली. तेव्हा रवींद्रशी बोलायची संधी मला मिळाली. ‘‘आईने तुझ्यासाठी मुलगी पसंत केलीये. हे कसं झालं?’’
‘‘ताई, माझा नाईलाज झाला. आईने अक्षरश: डोकं इतकं खाल्लं की सांगता सोय नाही. इथे यायला अन् हो म्हणायला मला भाग पाडलं.’’
‘‘ते कसं?’’ ‘‘अगं ऐक, आई म्हणाली बघ तुझ्यामुळे बाबांची तब्येत बिघडत असते. उद्या त्यांचं काही बरं-वाईट झालं तर तुला कधीच माफ करणार नाही. त्यांच्यानंतर मीसुद्धा माझ्या जिवाचं काहीही करीन. आमच्या चिता पेटवून तू आपल्या संसाराचा ताजमहल उभा कर. आम्ही मोकळे अन् तूही मोकळा. त्या ताजमहालात सुखाने रहा.’’
आई हल्ली खूप टीव्ही सिरियल बघते आणि त्यातले डायलॉग मारते. माझ्या मनात विचार चमकून गेला.
‘‘रवींद्र, अरे हे इमोशनली ब्लॅकमेलिंग आहे असं नाही वाटत तुला?’’
‘ जाऊ दे जे व्हायचं असेल ते होईल.’’
‘‘ते खरंय रे, पण तिला तू कळवलंस का? तुझ्या वाटेकडे ती डोळे लावून बसली असेल.’’
तो काही बोलणार एवढ्यात आई वादळासारखी खोलीत शिरली अन् कडाडली ‘‘कार्टे मेले, काय करतीएस हे? ठरलेलं लग्न मोडतीये. कुठं फेडशील हे पाप? याला मी कसा तरी तयार केला लग्नाला, ते त्याचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून! त्यात तू का बिब्बा कालवतीएस?’’
‘‘अगं आई तो म्हणजे काही लहान मुलगा नाहीये आता. तरुण मुलगा आहे. भलंबुरं कळतं त्याला.’’
आमच्या दोघींच्या बाचाबाचीत रवींद्र संधी साधून सटकला.
‘‘आई, तू हा शुद्ध अन्याय करतीएस त्याच्यावर. अगं थोडा त्या मुलीचाही विचार कर की! ती पण कोणाची तरी मुलगी आहेच.’’
‘‘हे बघ, त्या मुलीची जबाबदारी माझ्यावर नाहीये. मी फक्त माझ्या मुलाच्या भल्याबुर्‍याचा विचार करणार.’’ आणि एक सांगते, ‘‘तुझ्या बाबांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. दुसरी गोष्टा ती ही की, कुठल्या तरी जाती-धर्माची मुलगी घरात आणून घराण्याच्या इभ्रतीला काळिमा लावायचा नाहीये. आता जास्त बोलू नकोस.’’
आईच्या भाषणानंतर माझं बोलणंच खुंटलं. ज्याच्याकरिता म्हणून मी भांडायला उभी होते, तोच मुळी हत्यार टाकून निघून गेला. काळ बदलला. नवा जमाना आला तरी काही लोक अजूनही जातपात, प्रांत, धर्म, घराणं, खानदान की इज्जत या गुंत्यातच अडकलेले असतात. त्यांचं प्रेमाच्या कोमल भावनेशी काही देणं-घेणं नसतं. नुसता रुक्ष व्यवहार! त्यातलीच आई.
यथावकाश रवींद्रचा साखरपुडा झाला व लग्नाचाही मुहूर्त लवकरचाच निघाला. साखरपुड्याला मी जाऊ शकले नव्हते.
माझ्या नागपूर-अमरावती फेर्‍या सुरू झाल्या आणि ह्यांचं मला चिडवणं सुरू झालं. काय साड्या वगैरे काय घ्यायच्या असतील तर घे. त्यातून काही पाचपन्नास रुपये उरले तर मी गरीब बापडा एखादा नवा कुर्तापायजमा घेईन म्हणतो!’’
‘‘पण मी मुळी लग्नाला जाणारच नाहीये,’’ इति मी. ‘‘का?’’ ‘‘अगं बाई असं नको करूस. आपल्या लग्नात सासुरवाडीहून जे काय मिळालं, त्यानंतर आजपावेतो काहीही मिळालेलं नाहीये. आता सालेसाहेबांच्या लग्नात चान्स मिळतोय तर नाही म्हणू नकोस. काय झालं सांगू का रवींद्रच्या एंगेजमेंटला मी एकटा गेलो होतो तर लोकांनी हजारो प्रश्‍न विचारून भंडावून सोडलं होतं. आता लग्नाला जर एकटा गेलो तर तोफेच्या तोंडी देतील मला. दया कर देवी माते या पामरावर!’’ नाटकी स्वरातलं ह्याचं बोलणं ऐकूण मला हसू आलं.
यांनी मला परोपरीने समजावलं. म्हणाले, ‘‘तो विसरण्याचा प्रयत्न करतोय ना? तर मग तू का उकरून काढतीएस त्या आठवणी? का त्याच्या मनावरची जखम ताजी करतीएस? नाते संबंधात विसरणंच चांगलं असतं. त्याच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देऊ या!’’
‘‘हो आणि ऐक संस्कृतमध्ये कुठला तरी एक श्‍लोक आहे. नवरा, नवरी, व्याही, विहीण यांना काय हवंय, त्यांच्या काय इच्छा- अपेक्षा आहेत वगैरे वगैरे! यातील शेवटची ओळ महत्त्वाची. ती ही की ‘मिष्टान्ने इतरे जन:. आपण इतरे जन: आहोत. आपण फक्त मिष्टान्नावर लक्ष ठेवायचं. जेवून खाऊन तृप्त व्हायचं. हाय काय अन् नाय काय!’’
एकुलता एक भाऊ तोही लहान म्हणून छानसं गिफ्ट घेऊन लग्नाला गेले. नसते गेले तर आईला राग आला असता आणि बाबांना दु:ख झालं असतं. त्यांच्या तब्येतीचा प्रश्‍न होताच.
कार्य व्यवस्थित पार पडलं. आम्ही मजेत आनंदात नागपूरला आलो. येताना नवी एक सुटकेस विकत घ्यावी लागली. कारण खूप आहेर मिळाला होता. एकुलती एक बहीण म्हणून रवींद्रच्या सासुरवाडीहून पाच साड्या, यांना दोन सुट्‌स शिवाय मला कानातले, अंगठी असं बरंच मिळालं. बाबांनी दिलं ते वेगळंच! लग्नाच्या निमित्ताने आईने माझ्या मुलांना चेन दिल्या. मला नेकलेस. ह्यांना नवरत्नांची अंगठी शिवाय कपडे आणि वेगळेच!
घरी आल्यानंतर ह्यांचं मला पुन्हा चिडवणं सुरू झालं. ‘‘सासर्‍यांनी एवढं सगळं दिलं, पण इथे माझ्या घरी माझा खर्च वाढला. सगळं बजेट गडबड!’’
‘‘ते कसं काय?’’
‘‘तुला लग्नाचं काय काय गिफ्ट मिळालं ते बघायला तुझ्या ढीगभर मैत्रिणी येणार अन् सगळ्यांच्या चहानाश्त्याचा खर्च होणार तो माझ्या खिशातून!’’
‘‘अच्छा म्हणजे दुखरी नस ही आहे तर! अहो, पण तुम्हालाच तर सासुरवाडीहून माल हवा होता ना! आपल्या लग्नापासून काही मिळालं नाही. आता संधी मिळाली तर घेऊ या, असं म्हणत मला आग्रह करून नेलतच ना?’’
हे मिश्किलपणे हसत म्हणाले, एक गोष्ट सांगू का ‘‘आम्हा जावई लोकांना सासुरवाडीहून मिळणार्‍या गिफ्टचंच खरं आकर्षण असतं. हे बघ, कुठल्याही बाबांच्या किंवा महाराजांच्या मंदिरातून प्रसादरूपाने मिळणार्‍या शालीवर, चादरीवरच भक्ताची नजर असते. आपल्याला जास्तीत जास्त चांगली शाल- चादर मिळावी हीच इच्छा असते. हं तर मी काय सांगत होतो, लग्न कोणाचंही असो आपल्याला रिटर्न गिफ्ट काय मिळणार आणि नजर मात्र मिष्टान्नावर! कारण कितीही झालं तरी आपण ‘इतरे जन:’ आहोत.’’
‘‘अगं बाई मीसुद्धा? अहो मी त्या घरची मुलगी! माहेरवाशीणच!’’
‘‘हो ते खरं असलं तरीही आता तू दुसर्‍या घरची आहेस. म्हणूनच लेडीज संगीतात नाचत होतीस, गात होतीस, हातापायांना मेहंदी लावून बसली होतीस की जेवताना आईने तुला भरवलं! लक्षात आहे ना? घरभर रांगोळ्या काढल्या आठव जरा! नवरदेवाची बहीण म्हणून मांडवात मिरवलीस खरंय ना? आणि मुख्य म्हणजे रवींद्रच्या खोलीची सजावट. फुलांचे हार काय, मिठाई, दुधाचे ग्लास, काय काय ठेवणारी तूच होतीस ना? प्रियंकाचा साजशृंगार करून रवींद्रच्या खोलीपर्यंत तिला धीर देत तूच सोडलंस ना! हे सगळं खरंय की खोटं?’’
‘‘अहो, हे सगळं खरंय पण त्याचं आत्ता काय?’’ ‘‘तेच मी म्हणतोय. त्या वेळी तुला रवींद्रची ती मैत्रीण जिचं नाव, गाव, पत्ता, धर्म काही माहीत नाही, तिची आठवणदेखील आली नाही. एक वेळ अशी होती की, तिची बाजू घेऊन तूच आईशी भांडली होतीस ना! याला काय म्हणायचे गं? तिच्यावर झालेल्या अन्यायात तूसुद्धा…!’’
‘‘अगं बाई हो! मी माझ्या मनात डोकावून पाहिलं तेव्हा समजलं की, माझ्या अंतर्मनाने तिला कधीच स्वीकारलं नव्हतं. इतका रुढींचा पगडा माझ्या मनावर होता. रवींद्रचं प्रियंकाशी लग्न ठरल्याबरोबर मी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. एक ओझं उतरलं होतं मनावरचं. तेव्हा माझं मलाच मोकळं झाल्यासारख वाटलं होतं.’’
परंतु यांनी सत्याचं दर्शन घडवल्याबरोबर मलाच शरमल्यासारखं झालं. सुधारणेच्या वरवरच्या गोष्टी बोलायला सोप्या असतात, आचरणात आणायला कठीण! आपल्याच मनाला आपलं अंतर्मन कधी कळत नाही. मन मनास ना उमगे म्हणतात ते खरं आहे. मी विचार करत राहिले. आपल्याच मनाशी बोलू लागले मन मनास ना उमगे.
(०२१२) २५४९१२४
सुभाषिणी मधुकर कुकडे