वास्तववाद व आधुनिकता

0
164

सामान्य पे्रक्षक जेव्हा चित्रकलेस वास्तव सृष्टीचे प्रतिरूप निर्माण करण्याचे केवळ साधन मात्र मानतो व तेवढ्याच दृष्टीने त्याचे स्वग्रहण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्यात अर्थातच यश मिळत नाही. सामान्य प्रेक्षकांचा असा दृष्टिकोन झाला तो युरोपीय पुनर्जागरण काळातील कलावंतांनी अवलंबिलेल्या वैज्ञानिक अंकन पद्धतीमुळे. याचा परिणाम धार्मिक अभिव्यक्ती अशक्त होण्यात व भौतिक रूप सशक्त होण्यात झाला.
भौतिक सौंदर्याकडे आकृष्ट झाल्याने सामान्य पे्रक्षकांसाठी वास्तव सृष्टीची प्रतिकृती म्हणजेच कलेचा मापदंड ठरू लागला. आधुनिक चित्रकलेचे रसग्रहण अशा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून होऊ शकत नाही. आधुनिक चित्रकलेचा अभ्यास करताना ‘आधुनिक’ या शब्दाला केवळ कालनिर्देशक मानणे चूक ठरेल. वस्तुनिरपेक्ष सौंदर्य, आत्मिक अनुभूती, अतियथार्थ कल्पना इत्यादी कलांतर्गत सर्जनशील तत्त्वांचे स्पष्ट व विशुद्ध रूप आधुनिक कलाशैलीत आढळतात. अर्थातच हे सर्व तत्त्व सर्जनप्रवृत्तीचे अविभाज्य घटक असल्याने ते कमी-अधिक प्रमाणात प्राचीन, मध्ययुगीन, समकालीन कलेतही आढळतात. हजारो वर्षांपूर्वीच्या वन्य-मानव कलेत हे तत्त्व इतक्या स्पष्ट स्वरूपात आहेत की, या कला आधुनिक कलेच्या समरूप वाटायला लागतात. याच कारणास्तव प्रसिद्ध कलासमीक्षक हर्बट रीड याने म्हटले आहे की, ‘‘आधुनिक कला तीस सहस्र वर्ष प्राचीन आहे.’’
लोककला व बालचित्रकलेतदेखील मूळ सर्जनशील तत्त्वांचा स्वाभाविक विकास होतो. उपयुक्त कलांपासून आधुनिक कलेस प्रेरणा मिळाली आहे, ही गोष्ट आधुनिक कलेचा अभ्यास करताना लक्षात येते.
कालमानाप्रमाणे निसर्गवादी कला आधुनिक काळातील असूनदेखील त्याचा समावेश आधुनिक कलेत करता येत नाही. कारण ही कला बाह्य उद्देश्यांनी सीमित आहे. या उलट कालमानाच्या दृष्टीने बिजटाईन कला, अजन्ताची कला, राजपूत व जैन कला आधुनिक नसूनदेखील या प्राचीन धार्मिक कलांमध्ये कलेचे मूळ सर्जनशील तत्त्व इतक्या प्रचुर मात्रेत आहेत की, त्यांना आधुनिक कलेत स्थान द्यावे लागते. आधुनिक कलांच्या तत्त्व-निकषात या कला खर्‍या उतरतात. प्राचीन कलावंतांनी या कलांचा शास्त्रीय अभ्यास कसा केला याचे प्रमाण सापडत नाही; परंतु हे सत्य चिंतनीय आहे की, ज्या कलातत्त्वांना, सर्जनात्मक सहज प्रवृत्तींना प्राचीन कलाकारांनी साधन म्हणून वापरले ते आधुनिक कलाकारांसाठी साध्य बनले.
कोणत्याही बाह्य ध्येयांवर श्रद्धा नसल्याने, आंतरिक व्यक्तित्वाच्या स्वयंपूर्ण अनुभूतीच्या प्राप्तीसाठी व जड सौंदर्याच्या मृगजळाच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करणे ही गोष्ट आधुनिक कलाकारांच्या कलानिर्मितीचे ‘कार्यकारण’ झाल्याचे दिसते. कदाचित अनुभूतीच्या अपरिपक्वतेमुळे असेल, पण आधुनिक कलाकारांच्या विचारात इतकी ‘आत्यंतिकता’ आली की, कलाकाराचे व्यक्तित्व व चिरंतन तत्त्व यांचा संबंध जवळ-जवळ तुटल्यासारखा झाला. आत्मिक अनुभूतीवरील अश्रद्धा हे याचे कारण असावे.
कला मानवनिर्मित आहे. म्हणूनच मानवाच्या निर्मितीस मानव जीवनापासून अलग करता येत नाही. आधुनिक कला आधुनिक मानवाची कला आहे. आधुनिक जीवन जटिल असल्यामुळे आधुनिक कलादेखील जटिल आहे. त्यात भिन्न व परस्पर विरोधी प्रवाह असल्यामुळे आधुनिक कलेची सोपी व निर्णायक व्याख्या करणे शक्य नाही. मग त्यातील अंतर्गत प्रवाह अंतिम सत्याकडे गतिमान आहेत.
एकोणिसाव्या शतकात राजाश्रय नष्ट झाला. कलाकार बाह्य बंधनातून मुक्त झाला. ‘कलेसाठी कला’ हे त्याचे ध्येयवाक्य झाले. आत्मिक अभिव्यक्तीचे साधन म्हणजे कला असे कलाकार मानू लागला. चित्राविषयीचे महत्त्व कमी होऊ लागले. कलाअंतर्गत सौंदर्यगुणांच्या विकासात विषयाची बाधा येते, हे जाणवू लागले. हळूहळू विषयाला पूर्णपणे छाट देऊन आधुनिक कलाकाराने ‘वस्तुनिरपेक्ष’ कलाकृतींची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या नवीन दृष्टिकोनामुळे संशोधन वृत्तीने कला-चिकित्सेला सुरुवात झाली. स्वतंत्र विचार व स्वअनुभूतीचे दर्शन आधुनिक कलेचे महत्त्वपूर्ण घटक बनले.
कलेच्या आंतरिक स्वरूपाच्या अन्वेषणासाठी दर्शनशास्त्र, मनोविज्ञान, पदार्थविज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास अत्यावश्यक झाला. धार्मिक, राष्ट्रीय, सामाजिक व तत्सम सीमित विचारांना गौण स्थान प्राप्त झाले. मूलगामी दृष्टिकोनामुळे भिन्न देशातील कलाकार जवळ आले. त्यांनी जपानी, चिनी, आफ्रिकी व भारतीय कलांपासून घेतली.
आधुनिक कलेत तीन विचारधारा प्रामुख्याने आढळतात. पहिला विचार म्हणजे हा की, कलाकार वस्तूच्या बाह्य-रूप-सादृश्याने प्रतीकात्मक दर्शन देणे अधिक पसंत करतो. दुसरा विचार असा की, कलाकार आपल्या कलेस सामाजिक बांधिलकी न मानता त्याची आंतरिक आवश्यकता मानतो. तिसर्‍या विचाराप्रमाणे संदेश देणे हे कलाकृतीचे कार्य नसून त्याचे सौंदर्यात्मक रसग्रहण आधुनिक कलाकारास महत्त्वाचे वाटते.
आधुनिक चित्रकलेत अनेक नवीन शैलींचा जन्म झाला. नवीन ‘वाद’ ;प्ेउद्ध निर्माण झाले. त्यात नवशास्त्रीय वाद, रोमान्सवाद, यथार्थवाद, प्रभाववाद, नवप्रभावाद, प्रतीकवाद, फाववाद, धनवाद, अभिव्यंजनवाद, दादावाद, अतियथार्थवाद, नवयथार्थवाद याशिवाय अनेक लहान-मोठे ‘वाद’ उत्पन्न झाले. त्या त्या ‘वादा’चे पुरस्कर्ते चित्रकार नावारूपास आले व त्यांनी ‘वादातीत’ कलाकृतींची निर्मिती केली.
आधुनिक चित्रकलेचे काही विशेष सर्वप्रथम प्रभाववादात आढळतात. त्यामुळे आधुनिक चित्रकलेचा अभ्यास प्रभाववादापासून करावा लागतो. प्रभाववादी चित्रकारांनीच सर्वप्रथम परंपरावादी विचारांविरुद्ध प्रकट स्वरूपात संघर्ष केला. कलाकारांची धारणा त्यामुळे बदलली. कलेस अर्थार्जनाऐवजी आत्मिक अभिव्यक्तीचे साधन ते मानू लागले. त्यामुळे वैयक्तिक अनुभूतीस महत्त्व प्राप्त झाले. कलावंतांमध्ये कलेसंबंधी आपापसात ‘वाद’ सुरू झाले. समाजाभिमुख होऊन चित्रकारांनी आपले नवे जग प्रस्थापित केले. ‘कलेसाठी कला’ हे त्यांचे ध्येय बनले.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२