विदेशात सावरकर संमेलन…

0
139

जगभरातील अनेक भाषांमध्ये रामायणाचा अनुवाद झाला आहे. पौर्वात्य देशांची स्वत:ची अशी रामायणे आहेत. थोडक्यात समर्थांच्या शब्दात रामकथा ‘ब्रह्मांड भेदुनी पैलाड’ गेली आहे. तशीच अवस्था कृष्णचरित्राची आहे. हे तर पूर्णपुरुष म्हणजे आपल्या मान्यतेनुसार देव होते. तथापि जे राष्ट्रपुरुष होऊन गेले त्यांच्या कथा जगभर पोहोचायला नकोत का? तशात ते सरकारपुरस्कृत दुर्लक्षित असतील तर त्यांचे चरित्र नक्कीच पोहोचायला हवे. गांधी-नेहरू ही जोडगोळी जगाला ठाऊक आहे, त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही, पण सावरकर मात्र किती जणांना ठाऊक असतील हा संशोधनाचा विषय आहे. आपल्याकडील लोकांनाच ते नीट समजले नाहीत तर जगभरात किती माहिती असतील? उदाहरणार्थ गाय या एका विषयावरील त्यांची मते विरोधक आणि समर्थक उलटसुलट मांडतात. अशा वेळी ते स्वत: नेमके काय म्हणतात ते पाहायला हवे. त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये एक स्फुट लिहिले होते ते मुद्दाम देतो आहे.
‘‘मी गाईचा शत्रू नाही. माझ्या काही लेखांमुळे झालेला अपसमज आज मला धुवून टाकता येत आहे ही संतोषाची गोष्ट आहे. गोधन हे हिंदुस्थानातील मोठेच आर्थिक धन आहे. आईच्या खालोखाल गायीचे दूध माणसाला मानवते, असे वैद्यकशास्त्र सांगते. काही भाबड्या कल्पनाही संयुक्तिक कारणावरच आधारलेल्या असतात. गोरक्षणाचा मूळ पायाही सात्त्विक आणि शुद्ध असाच आहे. पण, काप गेले आणि भोके राहिली अशी स्थिती आज झाली आहे. गोरक्षण चांगल्या प्रकारे व्हावे, त्यावरील फोलपट झाडून त्यामधील कसदार सत्त्व तेवढे रहावे याच हेतूने गोपूजनातील दुष्प्रवृत्तीवर मी टीका केली. रक्षणासाठी पूज्य भावना आवश्यक असते, पण पूजा करता करता रक्षणाचे कर्तव्य विसरणे योग्य नाही. केवळ पूजा करू नका. केवळ हा शब्द महत्त्वाचा आहे. आधी रक्षण करून मग हवी तर गायीची पूजा करा. आता रड पुरे, कृती करा. आमच्या गायी मारतात, मुली पळवतात, भाषा भ्रष्ट करतात, अशी रडगाणी गाण्याचे सोडून अशा अत्याचारांचा प्रतिकार करा. एकेकाने एकेक प्रश्‍न हाती घेऊन त्याची तड लावू या. तिकडे दिल्लीला शिवमंदिर लढवले जात आहे. इकडे भागानगर झुंझावीत आहोत. पुढील वर्षी भोपाळवर मोर्चा बांधू. श्रम विभागाच्या तत्त्वानुसार आपण मथुरा लढवा. गोधनाची वाढ करण्याचे सशास्त्र प्रयत्न तर चालू ठेवाच तसेच कत्तलखान्यांविरुद्ध प्रचंड आंदोलन उत्पन्न करा. हे कत्तलखाने आमचा अपमान करण्यासाठी, आमचे नाक कापण्यासाठी अशा प्रकारे चालविले जात आहेत. मथुरेच्या कत्तलखान्यात गायीचेच मांस कापले जाते असे नव्हे, तर हिंदूंच्या हृदयाचेही मांस तोडले जाते. तेथील गोमांस भक्षकांना ते सुखाने पचू देऊ नका. त्यांच्यामागे कटकट उत्पन्न करा. केवळ गायीची पूजा करीत राहाल तर तुम्हीही गाय बनाल. पण, आपण सिंह नि ती गाय हे ध्यानी धरा. चौंडे महाराजांनी या कामासाठी आपले सारे जीवित वाहिले आहे. हिंदू संघटनेचे एक कार्य ते करीत आहेत. मथुरेच्या कत्तलखान्याची वीट न वीट उखडण्याच्या कामी त्यांचा अंत झाला तर रणांगणातील मुक्ती त्यांना मिळेल. मी गायीला रक्षणीय मानतो. आपण पूजनीय मानता. आपण पूज्य भावनेने या कामात लक्ष घातलेत तर भक्तीही उपयुक्त आहे, असे समजून मी तसा लेख लिहीन.’’
अतिशय स्पष्ट अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आमच्याकडील विरोधक मात्र खुशाल सावरकरांनी गोमांस खायला सांगितले आहे असा अपप्रचार करतात. सावरकर साहित्य नीट वाचले तर त्यांची भूमिका आज एक आणि उद्या दुसरी अशी सहसा दिसत नाही. अत्यंत परखड आणि स्पष्ट विचार मांडण्यास ते कचरत नाहीत, असे दिसते. एक वेळ त्यांच्या मतांवर आक्षेप असू शकतात अथवा कोणाला ती नावडू शकतात, पण त्यांच्या मांडणीत भोंगळपणा नसतो इतके तरी मान्य करण्यास हरकत नसावी.
उदये सविता रक्तो रक्तश्‍चास्तमने तथा|
संपत्तौ च विपत्तौ च महतामेकरुपता
(सूर्य उगवताना तसेच मावळताना लाल असतो, त्याप्रमाणे थोर माणसे चांगल्या तसेच कठीण प्रसंगी सारखीच असतात (वागतात).
प्रसंगी टीका सहन करूनही त्यांनी आपली मते बदलली नाहीत, हे विशेष. जीवनात अनेक चढ-उतार आलेले त्यांनी अनुभवले; परंतु धीर सोडला नाही. अंदमानच्या काळकोठडीत यातना सहन केल्या. त्यातून रितेपणा येऊ नये म्हणून मनाला अन्य ठिकाणी गुंतवले. हे सोपे नसते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सावरकरांच्या आजच्या आत्मार्पणदिनी (२६ फेब्रुवारी) आम्ही अंदमानात आहोत. सकाळी सेल्युलर जेलमध्ये आणि सायंकाळी महाराष्ट्र मंडळात अंदमान पर्व मांडणार आहोत. गेली आठ वर्षे हा प्रयोग सलगपणे चालू आहे.
आज जगभरात अनेक देशांमध्ये मराठी माणसे आहेत. वेगवेगळ्या नोकरी आणि उद्योगात ती गर्क असतात. त्यांनी परिश्रमाने हे सर्व प्राप्त केले आहे. तरीही मुळाची ओढ हे कायम असते आणि माणसाला चांगले ऐकणे व समजून घेणे याचीदेखील भूक असते. नेमके हेच लक्षात घेऊन ठाणे येथील स्वा. सावरकर सेवा संस्थेने २०१० पासून जगभरात सावरकर नेण्याचे ठरवले. त्यानुसार त्या वर्षी पहिले सावरकर साहित्य संमेलन हिंदुस्थानाबाहेर बहुसंख्य हिंदू असलेल्या मॉरिशस या चिमुकल्या देशात भरवले. त्यानंतर २०११ मध्ये दुबईसारख्या मुस्लिम देशात हे संमेलन झाले. तिसरे संमेलन २०१३ मध्ये लंडनमध्ये झाले. जिथे सावरकरांनी अनेक तरुण घडवले त्या इंडिया हाऊसचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर युरोपातील नऊ देशांची सफर आयोजली होती. या सफरीत आम्ही बसमध्येही व्याख्यान दिले. स्वित्झर्लंडमधील माऊंट टीटलीस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर शिव पुण्यतिथीदिनी बर्फात उभे राहून उपस्थितांना शिवराय सांगितले. तो एक आगळाच अगदी भारावून टाकणारा अनुभव होता. या सर्व संमेलनात स्थानिक महाराष्ट्र मंडळांनी साहाय्य केले होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रत्येक संमेलनाला जवळपास दीडशेच्यावर सावरकरप्रेमी आले होते. आता या वर्षी सावरकर जयंतीच्या दिवशी म्हणजे २८ मे ला ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात चवथे सावरकर साहित्य संमेलन भरणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सफर आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी दीपक दळवी (९८२०४४०८२१) यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. या संमेलनाला सरकारी आश्रय, अनुदान अथवा मदत नाही. त्याची अपेक्षाही नाही. आपणच ते करत असतो. स्थानिक महाराष्ट्र मंडळे उत्तम सहकार्य करतात. महाराष्ट्रात अनेक संमेलने होतात. व्याख्याने होत असतात. विदेशात मात्र हे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे रामकथेप्रमाणे सावरकरसुद्धा ‘ब्रह्मांड भेदुनी पैलाड’ न्यायचे आहेत. त्यासाठी आपणही चला आणि स्वार्थ व परार्थ साधा.

डॉ. सच्चिदानंद शेवडे