नवा अध्यक्ष, नवी झडप इजा, बिजा आणि तिजा

0
2117

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं एक ठरलेलं तंत्र आहे. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होते. राष्ट्राध्यक्ष निवडून येतो, पण नवीन अध्यक्ष, नवी संसद हे सगळं नव्या वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात.
यंदा ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी निवडणूक झाली. डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला तो मात्र २० जानेवारी २०१७ या दिवशी. पण मधल्या काळात भावी राष्ट्राध्यक्ष या नात्याने त्यांनी हालचालींना सुरुवात केलेली होती. त्यातली एक महत्त्वाची खेळी म्हणजे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर संभाषण करणं, ही होय. ही कृती म्हणजे सरळच चीनची खोडी काढणं होतं.
१९४९ मध्ये चीनमध्ये माओ झेडॉंग किंवा तत्कालीन उच्चारपद्धतीप्रमाणे माओ-त्से-तुंग याने साम्यवादी क्रांती करून सत्ता हडपली. सत्ताभ्रष्ट झालेला लोकशाहीवादी नेता चँग-कै-शेक आणि त्याचे अनुयायी, चीनच्या मुख्य भूमीच्या पूर्वेला असलेल्या फोर्मोसा या बेटावर पळून गेले.
ते १९४९ साल होतं. दुसरं महायुद्ध संपून फक्त चारच वर्षे उलटली होती. अमेरिका आणि सोवियत रशिया यांचं शीतयुद्ध पूर्ण शक्तीनिशी सुरू होतं. रशियन हुकूमशहा स्टॅलिन संपूर्ण जग रशियन साम्यवादाच्या लाल पंजाखाली आणण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पेटला होता. उलट अमेरिकेने जपानचा पूर्ण पराभव करून संपूर्ण पॅसिफिक महासागर स्वत:च्या हातात ठेवला होता. पॅसिफिक या जगातल्या सर्वात मोठ्या महासागरावर अमेरिकन नौदलाचं अक्षरश: एकछत्री अधिराज्य होतं.
आणि त्याच पॅसिफिकच्या काठावरच्या चीनमध्ये लाल क्रांती होऊन लोकशाहीवाद्यांना परागंदा व्हावं लागलं. साहजिकच अमेरिकेने फोर्मोसा बेटात आलेल्या लोकशाहीवादी चिन्यांना अभय दिलं. फोर्मोसा बेटाचा एक नवा देश बनला. तोच आजचा तैवान.
चीनला म्हणजे अधिकृत भाषेत ‘पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायना’ या देशाला तैवानचं वेगळेपण अर्थातच मान्य नाही. तैवान हा आमचाच एक प्रांत आहे- ‘वन चायना,’ हे चनीचं अधिकृत धोरण आहे. अमेरिकेला ते अर्थातच मान्य नाही. पॅसिफिक महासागर प्रदेशातले जपान, दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स हे सगळे आमचे मित्र देश आहेत. त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करणं न करणं हा आमचा प्रश्‍न आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे भावी राष्ट्राध्यक्ष या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांच्याशी दूरध्वनीवरून बातचित केली, हे अगदी राजशिष्टाचाराला धरूनच होतं.
अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी सत्ताग्रहण करण्यापूर्वीच आपल्या धोरणाची चुणूक दाखवली. अमेरिकेने आपलं प्यादं पुढे सरकवलं. अब चीन की बारी थी. १५ डिसेंबर २०१६ ची भली पहाट. दक्षिण चिनी समुद्र या नावाने ओळखला जाणारा पॅसिफिक महासागराचाच एक विभाग. त्यातलं हैनान नावाचं चिनी बेट. या बेटावर चीनचा आण्विक पाणबुड्या बांधण्याचा कारखाना आहे. हैनानच्या आग्नेयेला खूप लांबवर म्हणजे चीनच्या जल सरहद्दीच्या बाहेर ‘बोडिच’ हे अमेरिकन नौदलाचं एक जहाज उभं होतं. असं भरपाण्यात मधेच उभं राहून काय करत होतं बोडिच? तर त्याने एक ड्रोन म्हणजे मनुष्यविरहित विमान किंवा जलयान तिथल्या खोल पाण्यात सोडलं होतं. कशाला? तर म्हणे पाण्याचं तापमान आणि क्षारता तपासायला. यालाच म्हणतात ‘पिते दूध डोळे मिटुनि जात मांजराची.’
पण ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी, अशी स्थिती असल्याने एक चिनी हलक्या वजनाचं जहाज गुपचूप आलं. त्याने ते ड्रोन पकडलं. आपल्या डेकवर टाकलं नि हां-हां म्हणता ते हैनानच्या दिशेने पसार झालंसुद्धा. अमेरिकन रडार यंत्रणा खरोखर इतकी अत्याधुनिक आहे की, एखादी लहानशी माशीसुद्धा लपू शकत नाही. अशा स्थितीत एक छोटं जहाज तुमच्यापासून १५०० फूट अंतरावर येतं; तुमचं ड्रोन उचलतं आणि चक्क पसार होतं? अहो, रडारने दाखवलंच असणार ते; पण रडारच्या स्क्रीनसमोर तुमची माणसं बसलेली होती का? आणि असली तर त्यांचे डोळे उघडे होते का? ते जर पहाटेच्या साखरझोपेत असतील तर रडार काय रडणार?
मग दरोबस्त गरमागरमी झाली. अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटेगॉनमधून चीनला अधिकृत तंबी पोहोचवण्यात आली. चीनने निर्विकारपणे उत्तर दिलं, ‘‘काळजी नसावी. आम्ही अगदी योग्य रीतीने तुमचं ड्रोन परत करतो.’’
पण या ‘योग्य रीती’साठी ‘योग्य वेळ’ साधायला चीनने चांगले पाच दिवस घेतले. म्हणजे २० डिसेंबर २०१६ या दिवशी चीनने ते ड्रोन जिथून उचललं होतं, त्याच ठिकाणी अमेरिकन नौदलाला परत दिलं. अर्थ सरळच होता. चिनी तंत्रज्ञांनी त्या ड्रोनची कसून तपासणी करून मगच ते परत केलं.
हे सगळं राजकीय किंवा सैनिकी बुद्धिबळाच्या खेळाच्या नियमांनुसारच झालं, असं म्हटलं पाहिजे. या नंतरचं पेंटेगॉनचं आणि खुद्द ट्रम्प यांचं वक्तव्य मात्र रडीचा डाव खेळण्यासारखं आहे. पेंटेगॉनने प्रतिक्रिया व्यक्त केली की, त्या ड्रोनची किंमत फक्त १ लाख ५० हजार डॉलर्स आहे आणि त्यातली सगळी यंत्रणा खुल्या बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. जर ते ड्रोन इतकं क्षुल्लक होतं, तर मग अगोदर ते परत मिळविण्यासाठी इतका थयथयाट का केलात हो? ट्रम्प यांनी अगोदर आपल्या ट्विटरवरून चीनला अगदी कडक शब्दांत समज दिली. पण, नंतर पुन्हा ट्विट संदेश पाठवला की, ते ड्रोन आमच्या दृष्टीने अगदीच किरकोळ आहे, तेव्हा हवं तर ठेवून घ्या ते तुमच्याकडे.
ट्रम्प यांच्या या थिल्लरपणाला चिनी माध्यमं हसली. एका चिनी वृत्तपत्राने सरळच लिहिलं, ‘‘महासत्तेचं नेतृत्व कसं करावं हे ट्रम्प यांना कळत नाही.’’ दुसर्‍याने खरमरीत शब्दांत लिहिलं, ‘‘ट्रम्प यांनी थोडा अभ्यास करून शहाणं व्हावं. सत्ताग्रहण केल्यावर त्यांनी आपलं धोरण न बदलल्यास आम्ही संयम राखायला बांधील नाही.’’
अमेरिकेच्या नव्यानवेल्या राष्ट्राध्यक्षाशी चीनची ही तिसरी झडप. एप्रिल २००१ मधली गोष्ट. नवे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश दुसरे यांनी नुकतंच सत्ताग्रहण केलं होतं. चीनच्या याच हैनान नाविक अड्ड्याच्या भोवती अमेरिकेचं एक विमान घोटाळत होतं. अमेरिकन नाविक गुप्तचर विभागाच्या सिग्नल्स इंटेलिजन्सची कोरी करकरीत, अत्याधुनिक, अत्यंत संवेदनशील अशी यंत्रणा त्या विमानात कार्यान्वित होती. काय बरं करत होतं ते विमान? त्या दिवशी १ एप्रिल होता ना; म्हणून त्या विमानातले तब्बल २४ कर्मचारी हैनानच्या रहिवाशांना ‘एप्रिल फुल’चा मित्रत्वाचा संदेश घेऊन चालले होते. पण, एका नतद्रष्ट चिनी वैमानिकाने त्यात खोडा घातला. अमेरिकन विमानाची आणि या चिनी फायटर जेटची भरआकाशात चक्क टक्कर झाली. चिनी वैमानिक ठार झाला, पण अमेरिकन विमानाला हैनान विमानतळावर ‘क्रॅश लँडिंग’ करावंच लागलं. पुढचे ११ दिवस प्रचंड राजकीय हालचाली झाल्या. अखेर त्या २४ जणांना अमेरिकन नौदलाच्या सुपूर्द करण्यात आलं. विमानही चीनने परत दिलं. पण कसं? तर त्याचा प्रत्येक भाग वेगळा करून; आणि तोसुद्धा थेट नव्हे, तर रशियन हवाई दलामार्फत. आला का लक्षात बुद्धिबळाचा डाव?
मार्च २००९ मध्ये अगदी असंच घडलं. बराक ओबामा हे नवे राष्ट्राध्यक्ष नुकतेच सत्तारूढ झाले होते. अमेरिन नौदलाचं ‘इम्पेकेबल’ हे जहाज दक्षिण चिनी समुद्रातून प्रवास करत होतं. इम्पेकेबल या शब्दाचा अर्थच मुळी निर्दोष किंवा निष्पाप. खरोखरच इम्पेकेबल आणि त्याच्यावरचे नापिक निष्पापपणे प्रवास करत होते. चीनच्या जल सरहद्दीबाहेर आंतरराष्ट्रीय जलपट्ट्यातून अगदी कायदेशीरपणे त्यांचा प्रवास चालू होता. फक्त इम्पेकेबलच्या मागे आता त्याचे यांत्रिक डोळे इतके शक्तिशाली होते की, आजूबाजूच्या कित्येक कि.मी. परिसरातली ‘पापं’ त्यांना दिसत होती, त्याला ते तरी काय करणार?
मग एका चिनी विमानाने अगदी जवळून उडत इम्पेकेबलला इशारा दिला की, आमच्या पापांचं काय ते आम्ही बघू. तुम्ही आपले निष्पापपणे रस्ता पकडा. इम्पेकेबल रस्ता पकडणार तोच काही छोट्या चिनी ट्रॉलर्सनी म्हणजे चक्क छोट्या मच्छिमारी यांत्रिकी जहाजांनी इम्पेकेबलचा रस्ताच अडवला आणि चक्क आपली जाळी टाकून ते सोनार यंत्र पकडण्याचा प्रयत्न केला.
थोडक्यात, चीन अमेरिकेला दाखवून देतोय की, पॅसिफिकमध्ये आता तुमचं एकछत्री साम्राज्य असल्याच्या भ्रमात राहू नका. अब देखते रहिएगा क्या होता है आगे आगे!

मल्हार कृष्ण गोखले