महापौरांची निवड ९ मार्चला

उपमहापौर, स्वीकृत सदस्य, स्थायीचे सदस्यही निवडले जाणार

0
102

तभा वृत्तसेवा
अमरावती, २७ फेब्रुवारी
अमरावती महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ९ मार्चला होणार आहे. तसे पत्र विभागीय आयुक्तांना महानगर पालिका प्रशासनाने पाठविले आहे. या निवडणुकीनंतर लगेच स्वीकृत सदस्य व स्थायी समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा होईल.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. त्यामुळे भाजपाचाच महापौर व उपमहापौर होणार आहे. कॉंग्रेसला १५, एमआयएमला १०, शिवसेनेला ७, बसपाला ५, युवा स्वाभिमानला ३, रिपाइं (अ) १ आणि अपक्ष १ उमेदवार विजयी झाला आहे. विद्यमान पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ ८ मार्चला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ९ मार्चला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात यावी, असे पत्र नगरसचिव मदन तांबेकर यांनी विभागीय आयुक्तांना आजच पाठविले. त्यांच्या या पत्रानुसार महापौर व उपमहापौरांची निवडणूक ९ मार्चलाच होईल, हे जवळपास निश्‍चित आहे. याच दिवशी स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नावांची घोषणा होईल.