नक्षल्यांनी वनविभागाचा डेपो जाळला

0
145

अंदाजे १८ ते २० लाखांचे नुकसान
•सिरोंचा तालुक्यातील रोमपल्ली येथील घटना
तभा वृत्तसेवा
सिरोंचा, २७ फेब्रुवारी
नक्षलवाद्यांनी वनविभागाच्या लाकडी डेपोला आग लावल्याने शासनाचे सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात नक्षली बॅनर बांधून रस्त्यावर झाडे तोडून टाकल्याने अर्धा ते एक तास वाहतूक ठप्प झाली होती. सदर घटना आज रात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुकास्थळापासून २८ किमीवरील रोमपल्ली येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिरोंचा तालुक्यातील बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या रोमपल्ली येथील विक्री आगारातील लाकडाच्या डेपोला माओवाद्यांनी आज मध्यरात्री आग लावली. या आगीत १८ ते २० लाख रुपये किमतीचे १२३२ लाकडी बिट जळून खाक झाले. यात काही सागवान बिटही होते. ६ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी याच डेपोला आग लावली होती. परत याच डेपोला आग लावल्याने सिरोंचा तालुक्यात दहशत पसरली आहे.
यासोबतच नक्षल्यांनी परिसरात ठिकठिकाणी नक्षली बॅनर लावून भारत बंदचे आवाहन केले आहे. शिवाय झाडे तोडून रस्त्यावर टाकल्याने सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सिरोंचाहून गडचिरोली व नागपूरकडे जाणार्‍या बसेस बसस्थानकातच काही वेळपर्यंत उभ्या होत्या. त्यानंतर पोलिस व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी तोडलेली झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्यातील रोमपल्ली वनविभागाचा डेपो नक्षल्यांच्या नेहमी ‘टार्गेट’ वर राहिलेला आहे. गेल्या २ वर्षांपासून या भागात नक्षल कारवाया थंडावल्या होत्या.
परंतु या घटनेमुळे नक्षली कारवायांत पुन्हा वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.