अनीतीचा मार्ग…

0
154

भारतातल्या विभिन्न विद्यापीठांत कधी ना कधी पेपरफुटीच्या घटना झालेल्या आहेत. कर्मचार्‍यांनी केलेली हयगय, प्रिंटिंग प्रेसमधील काही उनाड लोकांनी केलेले कट-कारस्थान, विद्यार्थ्यांनी नजर चुकवून पळवून नेलेले पेपर, विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संगनमताने पेपर विकणे, ज्या शिक्षकाने पेपर काढला त्यानेच आर्थिक फायद्यासाठी पेपर लीक करणे, सेंटरवर पेपर पोहोचवण्याची जबाबदारी असणार्‍या कंत्राटी कामगारांनी हेराफेरी करणे… आदी बरीच कारणे यासाठी पुढे आली आहेत आणि संबंधितांना अटक करण्यापर्यंत पाळी आलेली आहे. पण, या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होते, काही विशिष्ट लोकांच्या तुंबड्या भरल्या जातात आणि वर्गात पिछाडीवर असलेली मुले एकदम ‘मार्क्स’वादी झाल्याचे ध्यानात येते! खरे तर विद्यापीठांमध्ये वा कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रांमधील परीक्षांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे, पेपर लीक प्रकरणे होऊ नयेत, अशी अपेक्षा असते. पण, अपेक्षांना तडे जाणार्‍या घटना काही समाजकंटकांमुळे घडतात आणि मग यासाठी सारी यंत्रणाच वेठीस धरली जाते. असाच प्रकार करड्या शिस्तीसाठी ओळखल्या जाणार्‍या लष्कराच्या भरतीसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षेमध्ये रविवारी झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली. लष्कराच्या भरतीसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षेचे पेपर फुटल्याने गोंधळ उडणार, हे स्वाभाविकच होते. देशभरात रविवारी लष्कर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार होती, मात्र तत्पूर्वी पेपरच फुटल्यामुळे लष्कर भरतीची परीक्षा रद्द करण्यात आली. नागपूर, अहमदाबाद, गोवा, किर्कीसह देशाच्या अनेक भागात होणारी लष्कर भरती परीक्षा, पेपर लीकमुळे रद्द झाल्याने आयोजनाच्या साखळीतील सार्‍यांनाच धक्का बसला आहे. क्लर्क, स्ट्रॉंगमन, ट्रेड्समन या पदांसाठी देशभरातील अनेक केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार होती. पेपर सकाळी नऊ वाजताचा होता. पण, ज्या विद्यार्थ्यांच्या हाती लीक झालेला पेपर आला, त्यांनी रात्रीपासूनच वेगवेगळी कार्यालये, सभागृह, हॉटेल्स, लॉज आणि वसतिगृहांमध्ये पेपर सोडवण्याचा सपाटा लावला. शेकडो मुले परीक्षा केंद्राबाहेर पेपर सोडवायला बसली. असे विद्यार्थी चार-दोन असते तर हे प्रकरण बाहेर येण्याची शक्यताच नव्हती. पण, पेपरसाठी इष्टमित्रांकडून व्हॉट्‌स ऍपवर उत्तरे मागितली जाऊ लागली. निरनिराळ्या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर सर्रास सुरू झाल्याने पोलिसांपर्यंत ही खबरबात पोहोचण्यास वेळ तो काय लागणार होता? या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका मिळवून देण्यासाठी तसेच ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे, तेथील निवासी प्रमाणपत्र मिळवून देणारे दलाल ठाण्यातील परीक्षार्थींना भेटले होते. त्यासाठी एकेका विद्यार्थ्याकडून निधी जमा केल्याची बाब पोलिसांपासून कशी लपून राहणार? ठाणे पोलिसांच्या तब्बल ८० अधिकार्‍यांच्या पथकाने राज्यभरातील ठिकठिकाणची माहिती घेऊन तेथे छापे मारले. नागपूर, पुणे, ठाणे आणि गोव्यात मारलेल्या छाप्यात ३५० जणांवर कारवाई झाली. या रॅकेटचे १९ म्होरकेदेखील पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. विशेष म्हणजे पेपर लीक प्रकरणात निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा असलेला सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिस यंत्रणादेखील चाट पडली. ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेमुळे पैशांची चणचण दूर झालेल्या लष्करातील निवृत्त अधिकार्‍यांना अशा देशविरोधी कृत्यात सहभाग कसा घ्यावासा वाटला, हा खरा प्रश्‍न आहे. ज्यांच्याकडून शिस्तीची, देशासाठी लढण्याची, नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आहे, त्या लष्करातील निवृत्त अधिकार्‍यांचा या कटातील सहभाग खरोखरीच त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारा आणि त्यांच्या शिस्तप्रियतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे. या प्रकारात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा आहे. विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार त्यांना एक ते चार लाखात हे पेपर विकले गेले आणि या टोळीने तब्बल साडेसतरा कोटी रुपयांचा घोटाळा केला, ही बाब लष्कराच्या शिस्तीत बसणारी असूच शकत नाही. म्हणूनच या पेपरफूट प्रकरणाची तातडीने दखल घेत, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केले. पेपर रद्द होण्यामुळे कररूपात देशवासीयांनी सरकारकडे जमा केलेल्या पैशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेपर लीक झाला नसता तर हा पैसा दुसर्‍या कुठल्या विकासात्मक कामासाठी लावला जाऊ शकला असता. केंद्राने तत्परतेने परीक्षा रद्द करून, दुसरी तारीख घोषित करण्याची दाखविलेली तयारी विद्यार्थ्यांबद्दल असलेला कळवळा जगजाहीर करणारी आहे. सरकारने केलेली ही कारवाई स्वागतार्ह आहे. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी जादा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पेपर लीक झाला, शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, खाजगी ट्युशन्सचा गोरखधंदा मांडणार्‍या १८ जणांना अटक झाली, ही बाब स्वागतार्हच म्हणावी लागेल; पण या सर्व प्रकरणात पालकांची भूमिका मनात चिंता उत्पन्न करणारी ठरते. आठवी ते बारावीची, लष्करात नोकरीसाठी इच्छुक असलेली ही मुले, त्यांना पैसा कुणी पुरविला? आपला मुलगा परीक्षेत कॉपी करतोय् आणि वर पास होण्यासाठी पैसाही मागतोय्, हे पालकांच्या लक्षात कसे आले नाही? की पालकांनी मुलांना असे पेपर मिळविण्यासाठी आणि ते परीक्षेच्या एक दिवस आधीच सोडविण्यासाठी परवानाच दिला होता? असे नसावे, किंवा पालकांचे मुलांच्या अशैक्षणिक कार्यक्रमांकडे लक्ष असावे. अन्यथा मुले मोठी होऊन, त्यांच्यात असेच चौर्यकर्म करण्याची सवय दृढमूल होते. हीच मुले आजचे देशाचे जागरूक नागरिक आहेत, ही बाब ध्यानात घेण्याची गरज आहे. आजच त्यांना अशा गैरकृत्यांपासून रोखले नाही, तर भविष्यातील जबाबदारीच्या शिड्या चढताना ते गैरमार्गांचा वापर करणारच नाहीत, हे कशावरून सांगावे? सर्धात्मक वातावरणाच्या अतिरेकाचाही हा परिणाम आहे, किंवा काहीही करून शासकीय नोकरी मिळवायचीच, यासाठीच्या आटापिट्यातूनही ही प्रवृत्ती विकसित झालेली आहे. मुलांच्या यशासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्याची मुभा देणारे पालकच यासाठी दोषी ठरतात! आपला पाल्य इतकी मोठी रक्कम कशासाठी मागतोय्, त्यातून खरोखरीच फायदा होणार आहे काय? आपल्या कृतीतून शेतकर्‍यांच्या, गरिबांच्या, दलितांच्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील मुलांवर अन्याय होणार नाही काय? याचा साधा विचार पालकांनी करू नये, याचे वैषम्य वाटते. मग उद्या चालून व्यवस्थेने नाकारलेल्या या मुलांनी समाजाविरुद्ध हिंसक एल्गार पुकारला, तर कुणाला दोष द्यायचा, याचादेखील विचार झाला पाहिजे. अतिरेकी संघटना, समाजामुळे दुखावल्या गेलेल्या तरुणाईच्या शोधात टपूनच बसलेल्या आहेत. अशी मुले हाती लागली की, त्यांचे अर्धे काम फत्ते होते! समाजाविरुद्धची चीड व्यक्त करण्यासाठी ही मुले मग हिंसाचाराच्या मार्गावर उतरतात आणि आपल्याच जातभाईंविरुद्ध लढा देण्यासही सिद्ध होतात. या सार्‍या दुष्टचक्रापासून वाचायचे असेल, तर अनितीचा मार्ग सोडून नीतिमत्तेचा मार्ग अवलंबणे, हाच एक उपाय आहे…!