सजग सोशल मीडिया

0
98

केंद्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राच्या पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा जो धडाका लावला आहे, त्यामुळे देश व राज्याचे चित्र नक्कीच लक्षणीय रीत्या बदलत आहे. गडकरी-फडणवीस या दोघांकडे पाहूनच अर्थात त्यांच्या विकासकामाचा झपाटा, त्यांचा तडफदारणा आणि वेगवान कार्यशैली पाहूनच लोकांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला भरभरून मते दिली, ही वस्तुस्थिती आहे. पण, राज्य तसेच केंद्र सरकारच्या चांगल्या व सकारात्मक कामांची दखल घ्यायचीच नाही, असे इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील काही घटकांनी ठरवूनच टाकले आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने मुसंडी मारली तसेच नऊ महापालिका व अनेक जिल्हा परिषदाही काबीज केल्या. पण, यामुळे काही सेक्युलर पत्रकार, वृत्तपत्रे आणि वाहिन्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे कुठे काही उणीव दिसते काय, सरकार वा भाजपाची काही चूक आढळते काय, याची या वाहिन्या व वृत्तपत्रे वाटच पाहात असतात. पण, आता केंद्रातील व राज्यातील सरकारही सावध झाले आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहातील प्रसिद्धिमाध्यमांनी उपेक्षा किंवा दुर्लक्ष केले, तरी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा केंद्र व राज्यातील सरकारांचा प्रयत्न आहे. मोदी व फडणवीस सरकारच्या विकासकामांची दखल मुख्य राष्ट्रीय प्रवाहातील माध्यमांनी म्हणावी तशी घेतली नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दखल मोठ्या प्रमाणात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्‌स ऍप, फेसबूक, ट्विटर व अन्य सोशल मीडियात फडणवीस व मोदी सरकारने केलेल्या कामांच्या पोस्ट सातत्याने झळकत आहेत. सरकारविरोधात जर कुणी नकारात्मक प्रचार करीत असेल, तर सोशल मीडियात सक्रिय असलेली मंडळी तत्काळ तो खोडून काढतात. कॉंग्रेसी व पुरोगामी लोकांनी अनेक बनावट पोस्ट तयार करून सोशल मीडियावर टाकल्या होत्या. पण, तेथे सक्रिय भाजपा समर्थकांनी त्यातील फोलपणा उघडकीस आणला. सोशल मीडियातील सक्रिय नागरिकांमुळेच केंद्र व राज्य सरकारच्या कामांना अधिक झळाळी आली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
पालेभाज्या की विष?
कीटकनाशकांचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून उत्पादित करण्यात आलेल्या पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्यास त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतो, असा इशारा आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी व संशोधकांनी दिला आहे. या संदर्भात एक अहवालही केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. पालेभाज्यांच्या विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक कीटकांना पळवून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे पालेभाज्यांतील पोषक घटकांवर या कीटकनाशकांचा दुष्परिणाम होऊन भाज्यांची पौष्टिकता पूर्णपणे संपुष्टात येत आहे. सध्या भारतीय बाजारात बोगस कंपन्यांच्या कीटकनाशकांचा व औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. याविषयी माहिती असूनही अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाहीत. वास्तविक पाहता या बोगस कंपन्यांच्या घातक कीटकनाशकांबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. कोणती कीटकनाशके किती प्रमाणात फवारावी, याविषयी शेतकर्‍यांना कृषी अधिकार्‍यांकडून अथवा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या पारंपरिक ज्ञानाप्रमाणे या कीटकनाशकांचा अनिर्बंध उपयोग करतात. पालेभाज्यांवरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविण्यासाठी वाट्‌टेेल त्या कीटकनाशकांची फवारणी केली जाते, ही वस्तुस्थिती आहे.
एखादे कीटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर ‘आमच्याच’ कंपनीच्या औषधांची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणार्‍या, औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या जाहिरातींचे मोठमोठे फलक, होर्डिंग्ज ठिकठिकाणी लागलेले आढळतात. मात्र, या कंपन्यांनी केलेले दावे कितपत खरे आहेत, हे कुणीच पडताळून पाहात नाहीत. हा सारा प्रकार पालेभाज्या व इतर पिकांसाठी अतिशय घातक असून, मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. यकृत, पोट व पचनसंस्थेशी संबंधित अनेक आजारांचे मूळ कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. या ‘विषारी’ पालेभाज्यांची बाजारात प्रचंड प्रमाणात आवक होते.
अभिजित वर्तक,९४२२९२३२०१