विदेशातही आचार्य अभिनव गुप्त यांचे अभ्यासक

समुत्कर्ष व्याख्यानमालाप्रसंगी डॉ. अवतारकृष्ण रैना यांचे प्रतिपादन

0
108

तभा वृत्तसेवा
अमरावती, २८ फेब्रुवारी
केवळ संस्कृत व तत्वज्ञान क्षेत्रातच नव्हे तर नाट्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा विविध विषयांवर आचार्य अभिनव गुप्त यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. एक अष्टपैलू व प्रचंड प्रतिभासंपन्न असे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच विदेशातही त्यांच्या साहित्यावर अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, असे प्रतिपादन नागपूर येथील जम्मू काश्मीर स्टडी सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. अवतारकृष्ण रैना यांनी येथे केले.
स्थानिक टाऊन हॉलमध्ये भारतीय उत्कर्ष मंडळाद्वारे आयोजित समुत्कर्ष व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भारतीय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोंदू हे होते. भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. अवंतिका मानकर हिने वैयक्तिक गीत सादर केल्यानंतर दिलीप भुजाडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन विशाल गणोस्कर यांनी केले.
आचार्य अभिनव गुप्त यांच्या जन्मसहस्राब्दीनिमित्त या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘आचार्य अभिनव गुप्त-भारतीय संस्कृतीचे नवे क्षितिज’ या विषयावर बोलताना डॉ. ए. के. रैना पुढे म्हणाले, सध्या दहशतवाद, निसर्ग आणि ३७० वे कलम हीच काश्मीरची ओळख आहे. काही लोक केसरसाठीही काश्मीरला ओळखतात. मात्र इतकीच काश्मीरची ओळख नाही. पुरातन काळात काश्मीरला शिक्षणाचे विश्‍वविद्यापीठ म्हणून ओळखले जायचे. त्याच काश्मिरात आचार्य अभिनव गुप्तांचा जन्म झालेला आहे. या काश्मीरमध्ये जागतिक ख्याती पावलेले अनेक व्यक्तिमत्त्व होऊन गेलेले आहेत. जगात त्यांच्या कार्याचा व साहित्याचा अभ्यास सुरू आहे. दुर्दैवाने भारतात मात्र त्यांची विशेष दखल घेतली गेली नाही. आचार्य अभिनव गुप्त त्यातीलच एक होय. विविध विषयांमध्ये अभिनव गुप्त यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले आहे. भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन त्यातून घडते. मात्र इंग्रजांनी आपल्या देशावर मॅकॉलेची शिक्षण पद्धती लादली आणि या देशातला विद्यार्थी कमकुवत बनत गेला. संस्कृत भाषेला आमच्यापासून नियोजनपूर्वक दूर करण्यात आले. वास्तविक, संस्कृत ही पूर्ण भारताला जोडणारी आणि सखोल ज्ञान असणारी भाषा आहे. परंतु संस्कृत भाषा आज बहुतांश लोकांना समजत नसल्यामुळे पर्यायाने ते भारतीय संस्कृतीपासून आणि अमूल्य अशा आचार्य अभिनव गुप्त यांच्यासारख्या विद्वानांच्या साहित्यापासून मुकले आहे. अभिनव गुप्त यांनी १९ गुरूंकडून शिक्षा, दीक्षा घेतली होती. त्यांचे साहित्य आजच्याही पिढीला दिशा देणारे ठरेल, असे डॉ. रैना यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दादाराव भडके, शैलेश पोतदार, दत्तात्रय रत्नपारखी, शिवा पिंपळकर, संजय गुळवे, भाईजी मेहेर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.