मेटॅडोरने उभ्या ट्रकला ठोकले

दारव्ह्यानजीक अपघात, तीन ठार

0
115

तभा वृत्तसेवा
दारव्हा, २८ फेब्रुवारी
दारव्हा-कारंजा मार्गावर सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री झालेल्या एका अपघातात रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला त्याच दिशेने वेगात आलेल्या मेटॅडोरने ठोकले. या अपघातात ट्रकची दुरुस्ती करणार्‍या दोन मेकॅनिकसह मेटॅडोरचा वाहक असे तीनजण जागीच ठार झाले. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त मेटॅडोर, ट्रक आणि मेकॅनिकची दुचाकी या सर्वांची दिशा एकच, म्हणजे दारव्ह्याकडेच होती.
माहुली या गावाजवळ एमएच२९-९९५५ हा ट्रक नादुरुस्त झाला होता. या ट्रकला दुरुस्त करण्यासाठी रवी नाना उन्हाळे (४५) आणि कयुमखान हबीबखान (४६) हे दोघे मेकॅनिक आर्णीहून दुचाकीवर आले होते. हे दोघे खालच्या बाजूने ट्रकची दुरुस्ती करीत होते. अंधारात मेटॅडोरने मारलेली धडक इतकी जोरात होती की, त्यामुळे हा ट्रक आडवाच झाला.
या ट्रकखाली दबून रवी उन्हाळे व कयुमखान हे दोन्ही मेकॅनिक जागीच ठार झाले. धडक मारणार्‍या मेटॅडोरचीही समोरची बाजू चांगलीच ठोकल्या गेली. यात चालकाच्या बाजूला बसलेला वाहक जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील संदीप शंकर कोळी (३५) हाही जागीच मरण पावला.
या अपघातातील मृतक रवी उन्हाळे याचा भाऊ संजय उन्हाळे याने दिलेल्या तक्रारीवरून दारव्हा पोलिसांनी चिंचोली येथील रहिवासी असलेला मेटॅडोरचालक सुकळू रघुनाथ कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत
आहेत.