…हा होईल दान पसावो

0
122

एका गुरूंच्या आश्रमात तीन शिष्यांची परीक्षा झाली. सर्व धर्मतत्त्वे तिघांनाही उत्तम रीतीने पाठ होती. सायंकाळच्या वेळी गुरू त्या तिघांना आश्रमाबाहेर फिरायला घेऊन गेले. परत येताना गुरुजी थकल्यामुळे एका झाडाखाली थांबले. शिष्य समोर गेले. रस्त्यात एका ठिकाणी खूप काटे पडले होते. एक शिष्य लांब उडी मारून काट्यांवरून पलीकडे गेला. दुसर्‍याला ते शक्य नसल्यामुळे काटे चुकवत त्याने रस्ता पार केला. तिसरा मात्र काही वेळ तेथेच उभा होता. दोघेही त्याला रस्ता कसा पार करायचा, याच्या सूचना देत होते. तेवढ्यात तो बाजूच्या एका झाडाची फांदी घेऊन आला व सर्व काटे बाजूला केले. तिघेही पुढे जाणार इतक्यात गुरुजींनी आवाज दिला. जवळ आल्यावर ते म्हणाले, ‘‘धर्माच्या परीक्षेत फक्त हा काटे बाजूला करणारा शिष्यच पास झाला. धर्माची तत्त्वे पाठ करण्याकरिता नसतात. ती जीवनात उतरवायची असतात.’’
मुळात तत्त्व आणि व्यवहारात पडत असलेले अंतर हीच आपल्या सामाजिक जीवनाची शोकांतिका आहे. व. पु. काळे यांनी सदानंद थिटे या आदर्श शिक्षकाची मांडलेली व्यथा वाचून आपण अस्वस्थ होतो. जाणीवपूर्वक तो शिक्षक झालेला असतो. ‘नागरिकशास्त्र आणि आरोग्य’ या विषयाची घटक चाचणी आटोपलेली असते. विद्यार्थी बाहेर येतात. शाळेच्या गेटजवळ उभ्या असलेल्या हातगाडीवरून चणे, फुटाणे, मुरमुरे, वडापाव असे पदार्थ खातात. कागदाचे बोळे मात्र मैदानावर टाकतात. ते मैदानावरच उभे असतात. फक्त नऊ मुले कचर्‍याचा डबा शोधून त्यात कागद टाकतात. थिटे मास्तर फक्त त्यांनाच पास करतात. बाकीच्या मुलांना नापास करतात. पालक, तेथील आमदार याला विरोध करतात. थिटे गुरुजी परोपरीने समजावून सांगतात, ‘‘आताच त्यांच्या वृत्तीत नागरिकशास्त्र भिनलं तर ते तुमच्यासारखे शहरभर तंबाखूच्या पिचकार्‍या टाकत फिरणार नाहीत.’’ मुलांना पास करायला ते नकार देतात. ‘‘आचरणात उतरवायचेच नसेल तर शिक्षण कशाला हवे?’’ असे उद्गार काढून शेवटी ते राजीनामा देतात.
परवा मराठी दिवसानिमित्त आलेली एक शुभेच्छा नेमकी या विसंगतीवर बोट ठेवणारी होती- ‘आपली मुले-मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकून बेंबीच्या देठापासून मराठीसाठी ओरडणार्‍यांच्या हिमतीला खास शुभेच्छा!’ खरे तर अशी हिंमत दाखविणारे सर्वच क्षेत्रात दिसतात. कालच माझा एक मित्र त्याचा अनुभव सांगत होता. सरकारी कार्यालयात तो मोठ्या पदावर आहे. बदली झाल्यानंतर दोनच दिवसात काही कुरबुर झाली. अचानक एका कर्मचार्‍याने त्याच्यावर ‘मनुवादी’ असल्याचा आरोप केला. मित्राने त्याला केबिनमध्ये बोलाविले. कॉफी मागवली आणि शांतपणे तो म्हणाला, ‘‘तुम्ही मला फक्त दोन दिवसांपासून ओळखता. माझ्या तीन पिढ्यांत कुणीही मनुस्मृती पाहिली नाही, वाचणे तर दूरच! मला मनुस्मृतीतील एक ओळही माहीत नाही. माझ्यासंबंधी तुम्हाला किती माहिती आहे? तुम्ही स्वतःला बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व मानवतावादी विचारसरणीचे समजता आणि फक्त आडनावावरून निष्कर्ष काढता?’’ या प्रश्‍नावर तो कर्मचारी निरुत्तर झाला. तत्त्व आणि मूल्य हे विषय फक्त अभिमानाचे किंवा डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात. प्रत्यक्ष जगण्याशी त्याचा संबंध असतो. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, असे म्हणणारे सहिष्णुतेचे कैवारी केरळमधल्या हिंसाचारावर का मौन बाळगतात? सहिष्णुता रक्तात आहे म्हणणारे थोडाही वेगळा विचार मान्य करायला तयार नसतात. समाजाला आचारवान क्रांतीची गरज असते.
ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या शेवटी परमेश्‍वराला पसायदान मागितले. पसायदान म्हणजे मानवतेचा जाहीरनामाच आहे. प्रत्येक ओवीत एकाहून एक उदात्त मागण्या त्यांनी केल्या. पण परमेश्‍वर मौन आहे. शेवटच्या ओवीत मात्र तो बोलतो- ‘एथ म्हणे श्री विश्‍वेश्‍वरावो| हा होईल दान पसावो|’- याच ठिकाणी तू मागितलेले दान पूर्ण होईल, असे विश्‍वेश्‍वर का म्हणाला? आणि त्याचे कारण आपल्याला त्या आधीच्या ओवीत सापडते.
आणि ग्रंथोपजीवियें| विशेषी लोकी इये|
दृष्टादृष्टविजयें| होवावे जी|
या ग्रंथाप्रमाणे जीवन जगणार्‍यांना सर्व लोकी, दृष्ट आणि अदृष्ट विजय प्राप्त होवो. ‘ग्रंथाप्रमाणे जीवन जगणारे’ हे आश्‍वासन दिल्यानंतर परमेश्‍वराने पसायदान पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ज्ञानदेव सुखी झाला, हे आपण समजून घेतले पाहिजे. समाजपरिवर्तनाची बीजं आचरणात दडलेली असतात. तत्त्व कोणतेही असो, हे समजले तर समाजही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही…!
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११