चड्‌डी-बनियन आंदोलन

0
99

वस्ती तिथे समस्या, अशी आपल्या भारत देशातील परिस्थिती आहे. त्यामुळे समस्या नाहीत असे एकही महानगर, शहर, गाव अथवा खेडे शोधूनही सापडायचे नाही! समस्या अनेक असतात आणि त्या सोडविल्या जाव्यात, अशी अपेक्षादेखील असते. समस्या गरिबांनाच असतात असे नाही, तर श्रीमंतांनाही त्या भेडसावतात आणि लोकप्रतिनिधींनाही त्या ताप देतात. उद्योजक जसे समस्यांशी झुंजतात तसेच कामगारदेखील समस्यामुक्तीसाठी लढा देत असतात. प्रत्येकालाच आपली समस्या गंभीर आणि त्यावर सरकारने आधी तोडगा काढावा, असे वाटत असते. मग आपल्या समस्यांकडे सरकारचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या शोधून काढल्या जातात. बिहारमध्ये एका लोकप्रतिनिधीने केलेल्या आगळ्या आंदोलनाने देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यामुळे समस्यामुक्तीच्या दिशेने सरकारने पावलेदेखील उचलली. हे अभिनव आंदोलन होते- मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरुद्ध आणि आंदोनकर्ते होते बिहारमधील लौरियाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विनय बिहारी! विनय बिहारींनी गेल्या चार महिन्यांपासून कुर्ता, पायजामा घालणे सोडून दिले होते. कशासाठी? तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, या मागणीसाठी! मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातील रस्ते बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण, काही केल्या हे आश्‍वासन पाळले जात नव्हते. अखेर विनय बिहारींनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष त्याकडे वेधून घेण्यासाठी ‘गांधीमार्गा’ने जाण्याचा निर्धार केला. जोवर रस्तेनिर्मितीचे वचन नितीशकुमार पूर्ण करीत नाहीत, तोवर पायजामा आणि कुडता घालणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. ते दररोज विधानसभेत चड्‌डी-बनियन या वेशात येऊ लागले. जोवर गावागावांत रस्त्यांची निर्मिती होणार नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचे त्यांनी जाहीर केले. यंदाच्या अधिवेशनात तर चड्‌डी आणि बनियनवर रस्त्याने लोटांगण घालत ते थेट विधानभवनात पोहोचले! लौरियाच्या शेकडो लोकांनी रस्त्यातील त्यांच्या या लोटांगणाला प्रणाम केला आणि लोकप्रतिनिधी असाच असावा, अशा प्रतिक्रिया दिल्या. अखेर या अभिनव आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. बिहार सरकारच्या वतीने, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी आमदार विनय बिहारी यांना कुर्ता-पायजामा भेट दिला. सोबतच त्यांच्या मतदारसंघातील ३७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूददेखील केली.
बीबीसीला दणका!
मराठीत एक म्हण आहे, ‘माती भुसभुशीत दिसली की ती कोपरानेही खणण्याचा’ प्रयत्न केला जातो. तसाच प्रकार बीबीसी आणि या वाहिनीचा पत्रकार जस्टिन रॉलेटने केला. बीबीसी या वाहिनीची महती पाहून राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने भारतातील सर्व व्याघ्र अभयारण्यात प्राण्यांच्या हालचाली टिपणे, त्यांच्या अधिवासावर माहितीपट तयार करणे आणि अभ्यासासाठीच्या सीडीज् तयार करण्याची परवानगी बीबीसीला दिली होती. या वाहिनीचा या पूर्वीचा अनुभव आणि त्यांचे वन्यजीव क्षेत्रातील योगदान पाहता ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, कुठलीही परवानगी देताना त्यात काही अटी या असतातच. त्याचे पालन केले जाणे गरजेचे असते. परवानगी मिळाली म्हणून कशाही प्रकारचा धुडगूस जंगलात घालू शकत नाही. वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपताना जंगलाच्या नियमांचे पालन करणे जसे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे भारत सरकारची बदनामी होणार नाही, या देशाच्या सार्वभौमत्वाची जपणूक केली जाईल, या देशातील कायद्यांचे उल्लंघन होणार नाही आणि राज्यघटनेचा उपमर्द होईल, असे कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही, याची काळजी बीबीसी आणि या वाहिनीच्या प्रतिनिधीने घेण्याची गरज होती. पण, झाले उलटेच! आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात शिकार्‍यांविरोधात उचललेल्या पावलांविरोधात प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा बीबीसीचा माहितीपट समोर आला आणि खळबळ उडाली. या माहितीपटामुळे भारताची जगभर बदनामी होईल, असे लक्षात येताच, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) दणका देऊन बीबीसी आणि त्यांचा पत्रकार जस्टिन रॉलेटवर देशातील सर्व व्याघ्र अभयारण्यात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली. व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने उचललेल्या या पावलाचे स्वागतच केले जायला हवे. ही बंदी संपूर्ण बीबीसी नेटवर्कवरच राहणार असल्याने, येत्या पाच वर्षांत या वाहिनीच्या कुठल्याही प्रतिनिधीला भारतातील वन्यजीवनावर वृत्तपट तयार करता येणार नाही. रॉलेट यांनी काझिरंगातील गेंड्यांवर तयार केलेल्या ‘वन वर्ल्ड : किलिंग फॉर कन्झर्व्हेशन’ या माहितीपटात भारतात गेंड्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवरच शंका उपस्थित केली होती. काझिरंगात गेंड्यांपेक्षा मनुष्यहानीच मोठ्या प्रमाणात होत आहे, या त्यांच्या विधानामुळे माहितीपट वादात सापडला नसता तरच नवल! प्राधिकरणाने तत्परतेने पावले उचलून बाबीसीला दिलेला दणका अशा प्रकारचे काम करणार्‍या इतर कंपन्यांसाठी इशारा ठरावा!
चारुदत्त कहू,९९२२९४६७७४