माझी मराठी

0
105

भारत हा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुपंथीय देश आहे. जगाच्या पाठीवर हे एकमेव राष्ट्र आहे, जे विविधतेने नटलेले आहे. आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपली मातृभाषा ही मराठी आहे. हा मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रातल्या खेड्यातून आणि शहरातून मराठी भाषा बोलली जाते. शेतकरी, कामकरी, व्यापारी बांधवांनी आपली भाषा समृद्ध केली आहे. आपण आपल्या भाषेवर गर्व केला पाहिजे. अभिमान बाळगला पाहिजे. दर दहा कोसावर भाषा बदलते. हा भाषेचा नियम आहे. ‘संस्कृत’ भाषा ही मराठी भाषेची जननी मानतात. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे श्री गोमटेश्‍वराच्या मूर्तीखाली मराठीतला पहिला शिलालेख ‘श्री चामुण्डरायें करवियले’ असा लिहिलेला आढळला. हा लेख जवळपास इ.स. ९८३ च्या सुमारास कोरला असावा, असे जाणकारांचे मत आहे. मराठी भाषेला संतांनी खरोखर समृद्ध केले. समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मराठी बोलीभाषेचा वापर करून लोकांना जागृत करण्याचे काम केले. आपल्या लिखाणातून संतांनी आणि कवींनी मराठी भाषेची थोरवी गायली.
मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधु’
हा आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिला. तसेच ‘अमृतानुभव,’ ‘भावार्थ दीपिका,’ ‘ज्ञानेश्‍वरी’ लिहिणारे संत ज्ञानेश्‍वर आणि महानुभाव संप्रदायातील म्हाइंभट’ यांनी ‘लीळाचरित्र’ हा आद्य ग्रंथ लिहून या ग्रंथकारांनी प्रारंभीच्या काळात मराठी भाषेची इमानेइतबारे सेवा केली.
महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा ही खर्‍या अर्थाने मराठी संस्कृती टिकवून ठेवणारी ठरली.
तसेच प्रादेशिक बोलीच्या अंगाने अहिराणी, झाडीबोली, वर्‍हाडी, मराठवाडी, कोकणी अशी मराठी बोलीभाषा डौलदार केली.
जागतिकीकरणाचे वारे आणि त्यातून निर्माण झालेले आणि होत असलेले आक्रमण आज चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे. लहानपणापासून ज्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानावर आणि मनावर झाले, तीच मराठी भाषा काळाच्या ओघात लुप्त तर होणार नाही ना? अशी एक अनामिक भीती वाटते आहे.
आजच्या पिढीसमोर मातृभाषेचे फार मोठे आव्हान येऊन ठेपले आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्‍न आपण स्वतःलाच केलेला बरा. परिवर्तन हा जगाचा नियम जरी असला तरी मूळ सोडून निश्‍चितच करता येत नाही. आज शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. त्याचे पडसाद उमटत आहे. कोचिंग क्लासेसच्या युगात भविष्यात मराठी शिकण्यासाठी कदाचित परदेशात जाण्याची वेळ आल्यास आश्‍चर्य वाटण्यासारखे काही राहणार नाही. वेळीच सावध होऊन पुढल्या हाका ऐकण्याची वेळ आहे. आपली समृद्ध भाषा टिकवणे हे आपलेच कर्तव्य आहे व त्याकरिता साहित्यिक, कवी, कीर्तनकार, प्रवचनकार, संतमहात्मे यांचे आपणावर उपकारच म्हणावे लागेल. ते सदैव मातृभाषेचा गौरव करत आहे व मराठी भाषेची गोडी जनमानसात रुजवत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून बरेचसे मराठी शब्द बहाल केले. कारण मोगल कालखंडापासून व्यवहारामध्ये बरेच फारशी शब्द भाषा संकर म्हणून वापरात होते. त्या शब्दांना प्रतिशब्द त्यांनी दिले. जसे ‘तारीख’ या शब्दाला दिनांक असे म्हणावे हे त्यांनी शिकवले. आज शाळा-कॉलेजातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांनीदेखील अभ्यासात मराठी विषयाच्या अभ्यासाबरोबरच वाड्.मयाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ वाड्.मय हा विषय घेणारेच विद्यार्थी हा अभ्यास करताना दिसतात. मराठी भाषेत आज विपुल ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे; परंतु शोकांतिका ही आहे की, सकस साहित्य वाचणारे चोखंदळ वाचक भरपूर कमी आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण मराठीतूनच बोललो पाहिजे. शासन स्तरावरदेखील सर्व कामकाज आपल्या मातृभाषेतूनच व्हावे. तसेच इंग्रजी शाळेत प्रवेश घेताना निदान महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी अस्खलित बोलता आली पाहिजे, असे काही कडक नियम असावयास पाहिजे. पण, त्याहीपेक्षा आपले आपल्या भाषेवर प्रेम पाहिजे. तेव्हाच आपण मराठी भाषेचे पाईक म्हणू शकू. अन्यथा काही खरं नाही.
‘साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला… ’
असा बाणेदारपणा आपणास दाखवता आला पाहिजे. दुसर्‍या भाषेचा आदर जरूर करावा, परंतु आपली भाषा हीन समजू नये. कारण कोणतीही भाषा ही कधीच अशुद्ध नसते. असे भाषावाद करणारे अपरिपक्व समजावे.
बर्‍याच कवींनी आपल्या लेखणीने मराठी सारस्वताला समृद्ध केले आणि करत आहेत. मराठी भाषेतच सर्वप्रथम साहित्य संमेलन सुरू झाले आणि यापासूनच प्रेरणा घेऊन इतर भाषांमध्ये साहित्य संमेलन होत आहे.
मराठीच्या मातीत मराठी भाषेला सावत्र वागणूक मिळू नये. आपणच आपली भाषा समृद्ध ठेवू शकतो. फक्त गरज आहे वाचक बनण्याची. मराठी नवीन वर्षाची चाहूल लागत आहे तेव्हा प्रत्येकाने मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार करावा.
– ओमप्रकाश ढोरे
९४२३४२७३९०