शब्दांचा धनी नितीन भट

0
135

‘मज नको हे गगन, ही धरा
दे मनाचा रिता कोपरा
जन्म म्हणजे तरी काय रे?
तीच शिक्षा, नवा पिंजरा…’
गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या कार्यक्रमातून ऐकविलेल्या या ओळी अमरावतीचा तरुण गझलकार, गीतकार नितीन भट याच्या आहेत, हे नव्यानं सांगायला नको. अमरावतीच्या सांस्कृतिक वैभवात वाढलेला, ताकदीचा कवी म्हणून नितीन भट याचं नाव आज दूरदूरपर्यंत जाऊन पोहोचलंय्, ते त्याच्या प्रतिभासंपन्न लेखणीमुळे, त्याच्या उत्तम निवेदनामुळे.
‘भुकेलेल्या मुखी साधा सुखाचा घास न येवो
असे आयुष्य कोणाच्या कधी वाट्यास न येवो… ’
अशी सामाजिक वेदना मांडणार्‍या नितीनची लेखणी आणखी धार धार होत जाताना गेय कवितांचंही त्याचं लेखन नावारूपाला आलं. काव्याच्या या प्रांतात त्याचं नाव दिवसागणिक मोठं होत गेलं, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे. एका कवीनं जी सामाजिक बांधिलकी, जी जाणीव जपायची असते ती त्यानं जपली आहे. कविवर्य सुरेश भट यांनी गझल सुरुवातीला प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवलीय. त्यांच्याच प्रेरणेनं नंतर विदर्भात युवा गझलकारांची जी फळी तयार झाली, त्यात नितीन भट हे नाव चांगलंच नावारूपाला आलं. कारण नव्या आव्हानांना स्वीकारत हा तरुण त्याची वाटचाल करीत राहिला.
नितीन भट एक गझल लेखक, कवीच नाही तर तो एक उत्तम निवेदकही आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या निवेदनशैलीमुळे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील अनेक मैफली त्यानं नामवंत गायकांसोबत गाजवल्या आहेत. निवेदनाची छाप सोडली आहे.
एक प्रतिभावंत, हळव्या मनाचा कवी अशी नितीनची ख्याती सर्वदूर पसरत असतानाच त्याला मग अनेक संधी चालून आल्या आणि त्या संधींचं त्यानं सोनं केलं.
‘धन्य होत चालल्या
मुक्या बोल भावना
शापमुक्त जाहल्या
जुन्या सखोल वेदना…’
सह्याद्री वाहिनीवरील ‘आरंभ’ मालिकेचे नितीननं लिहिलेलं हे शीर्षकगीत आज घराघरांत जाऊन पोहोचले आहे. तसेच ‘सावरले मी’ या व्यावसायिक मराठी नाटकाचे शीर्षकगीत त्याचे असून, यात प्रसिद्ध हास्य अभिनेत्री विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत होती. त्याचप्रमाणे ‘ती तशीच होती’ या मराठी नाटकाच्या शीर्षकगीताचं लेखन त्याचंच, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाखनवाडीचा राजा’ या सिनेमासाठी तीन गाणी त्यानं लिहिलेली आहेत. जागतिक पातळीवरील स्पायडर असोसिएशनसाठी टायटल सॉंग (शीर्षकगीत) लिहिले आहे. इतकंच नाही, तर महाराष्ट्र गीताच्या धरतीवर विदर्भगीताचे लेखन त्याने नुकतेच केले आहे. गाणे श्रेयस पुराणिक (‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे संगीतकार) यांनी स्वरबद्ध केलेले आहे. त्याच्या निवेदन मैफलींचा आढावा घ्यायचा झाल्यास आजवर महाराष्ट्र राज्यासह देशभरात ५०० च्या वर सांगीतिक मैफलींचे त्याने निवेदन केलेले आहे. यात श्रीधर फडके, गझलनवाज भीमराव पांचाळे, रवींद्र साठे, वैशाली माडे, उत्तरा केळकर, सायली पानसे, अनिरुद्ध जोशी, आनंदी जोशी, राजेश उमाळे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, गझलगायक भीमराव पांचाळे, कवी व गीतकार प्रवीण दवणे, प्रसिद्ध मुलाखतकार राजू परुळेकर आदींच्या प्रकट मुलाखतीही त्याने घेतलेल्या आहेत. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीकरिता येणारा मराठी चित्रपट ‘गणू’ आणि सोबत आणखी दोन येऊ घातलेल्या चित्रपटांकरिता नितीननं गीतलेखन केलेले आहे. संत गगनगिरी महाराज यांच्यावर आधारित सीडीकरिता १२ भक्तिगीते त्यानं लिहिलेली आहेत.
‘कैकदा सांभाळताना तोल गेला
तू दिलेला घाव इतका खोल गेला…’
रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा असा हा कवी, निवेदक पुढच्या ताकदीच्या वाटचालीकरिता आज सज्ज आहे. विदर्भातील नवप्रतिभावान युवकांसाठी तो नक्कीच आता प्रेरणादायी ठरला असून त्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊ यात.
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२