समाजऋण

0
140

‘मानव हा समाजशील प्राणी आहे,’ या वाक्याने बर्‍याच वेळा समाजशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात होते. मानवी गरजांची परिपूर्ती ही समाजातच होते. त्याचबरोबर भावभावनांचे आदान-प्रदान होण्यासाठी मानवाला मानवी समाजातच राहून भावनिक आणि बौद्धिक विकास साधावा लागतो.
एका व्यक्तीच्या विकासात समाजातील असंख्य घटकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा असतो. आपण कळत नकळत समाजाकडून बर्‍याच गोष्टी शिकलेल्या असतात. म्हणजेच आपल्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा विकासाला समाजाचे कळत नकळत पाठबळ प्राप्त झालेले असते. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती जसा मातृृऋण, पितृृऋण, गुरुऋण, मित्रऋण अशा असंख्य ऋणांनी बंदिस्त असून, त्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी कार्यरत राहतो. तसेच आपणावर या ऋणांसोबत आणखी एका ऋणातून मुक्त होण्याची जबाबदारी असते, ते ऋण म्हणजे समाजऋण. या ऋणाची जाण माणसाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्या ऋणातून मुक्त होण्यास तो कार्यरत होईल. कारण अन्य ऋणं हे एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकतात; परंतु समाजऋण मात्र अन्य ऋणांच्या तुलनेने मोठे असून त्यातून मुक्त होण्याचे मार्गदेखील फार वेगवेगळे असू शकतात; परंतु योग्य वयात खासकरून तारुण्यातच या ऋणाची जाण माणसाला झाल्यास आपण आपल्या कर्माची दिशा बदलून सामाजिक हित जोपासण्यावर भर देऊन काही प्रमाणात समाजऋणातून मुक्त होऊ शकतो.
ज्या समाजात समाजऋणाची जाण असणारा तरुण वर्ग वावरत असतो, तो समाज, देश कळत नकळत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. साध्या साध्या कर्तव्यपूर्ततेतूनदेखील आपण समाजऋणातून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी फार भव्य-दिव्य काही करण्याची आवश्यकता असते असे नाही; परंतु जी गोष्ट आज आपणास साधी-सरळ-सोपी वाटते, तीच गोष्ट भविष्यात समाजासाठी फार मोठ्या ‘समाजहिताची’ ठरू शकते. येणारी पिढी आपल्याला त्या ‘चांंगल्या छोट्या’ कृतीमुळेच लक्षात ठेवू शकेल. जसे उन्हाळ्यात पक्षिमित्र होऊन पक्ष्यांना पाणी आणि अन्नाची व्यवस्था करणे, पावसाळ्यात झाडे लावून त्यांचे संगोपण करणे. या गोष्टी आज समाजऋणातून मुक्त होण्याचाच एक भाग ठरू शकतात.
अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते आणि त्याचे माध्यम पैसा असते. त्यामुळे पैसा मिळवत असताना आपण समाजाला काय देतोय्? याचा विचार प्रत्येकाने आत्मचिंतनातून केल्यास आपल्या बर्‍याच कृत्यांना आळा बसून योग्य दिशा आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्राप्त होेऊन समाजाची होणारी ‘दशा’ टळू शकते!
कोणतेही ‘योग्य’ कर्म न करता जगणे हे एक सामाजिक पातकच समजले जाते. ज्या समाजात तरुणवर्ग कर्महीन होऊन जगत असतो तो समाज तेजोहीन होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो आणि ज्या समाजातील तरुणवर्ग अनैतिक कार्याकडे झुकलेला असतो, त्या समाजात काहीच कालावधीत अराजकता निर्माण होऊन हिंसाचारात रक्तपात दृष्टीस पडू शकतो.
आपली प्रत्येक कृती ही समाजाला काही तरी ‘भरीव’ देणारी ठरावी, जेणेकरून आपण जसे समाजातील योग्य व्यक्तींचेे अनुकरण करून स्वहितासोबत समाज आणि राष्ट्रहित साधलेले असते तसेच आपल्या कृत्यांचेदेखील समाजातील येणार्‍या पिढ्या अनुकरणच करणार असतात.
– गजानन मोहन गिरी /९८२२८९७४९३