भाषांचा बोजवारा

0
80

मनोगत

मराठी दिनानिमित्त आपण मराठी कसं बोलतो याचा नमुना बघा. १. टू बीएचकेचा थर्ड फ्लोरचा फ्लॅट बुक केला आहे, बाल्कनीतून क्लासिक व्ह्यू दिसतो. २. सगळं मिक्स करून त्याचे बॉल ब्रेडमध्ये स्टफ करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचे. ३. स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, ब्युटी पार्लरचा बोर्ड लागेल. जस्ट साईडची बिल्डिंग. ४. माय गॉड, मंथ एन्डला एक्झाम आहे, सिलॅबस कधी कम्प्लीट करणार. आपण ९५ टक्के इंग्रजी शब्द वापरतो. क्रियापदं फक्त मराठीतील. इंग्रजीतील क्रियापदं वापरून वाक्य म्हणायला जमत नाही म्हणून इंग्रजीही धड बोलता येत नाही. एकूण दोन्ही भाषांचा बोजवारा.
सुजाता दाते
०७१२-२२८९९६६

मतदारांचे शंका समाधान
निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होतो, असे अनेकदा पराभूत झालेले उमेदवार सोयीनुसार आरोप करीत असतात. २००९ मध्ये अशीच तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती; तेव्हा कॉंग्रेसच्या मंडळींनी खिल्ली उडवली होती.
या सर्वातून सोपा मार्ग म्हणजे मतदान केल्यावर मतदाराला आपण केलेल्या पक्षाच्या मतदानाची पावती त्याच यंत्रातून तेथील पडद्यावर पाहावयास मिळावी म्हणजेच आरोप-प्रत्यारोप बंद होतील व मतदारांच्या आणि उमेदवारांच्या शंकांचे समाधान होईल.
अमोल करकरे
पनवेल

सेना एमआयएमचा पाठिंबा घेणार?
मुंबई महापालिकेचे महापौरपद स्वत:कडे राहावे म्हणून शिवसेना ओवैसीच्या एमआयएम या कट्टरपंथी हिंदूविरोधी पक्षाची मदत घेणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात वाचले आणि धक्काच बसला. शिवसेनेने पाठिंबा जरूर घ्यावा, पण आमचे धोरण हिंदुत्वाचे नाही, असे आधी जाहीर करावे. महापौरपदासाठी शिवसेना इतक्या खालच्या स्तरावर जाईल ही कल्पना नव्हती.
महेश सोनेकर
नागपूर

नितीन गडकरींची कमालच म्हणायची
महाडमधील सावित्री नदीवरील जुनाट पूल कोसळून ४० पेक्षा अधिक लोकांना जलसमाधी मिळण्याची घटना आठवते का? त्या वेळी विरोधकांनी भाजपा सरकारवर खूप टीका केली होती. अशा वेळी तेथे गडकरींनी भेट दिली आणि एका वर्षात पूल बांधून तयार होईल, अशी ग्वाही दिली. आज तो पूल जवळपास बांधून तयार झाला असून, ३० जूनपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. याला म्हणतात, जे बोलतो ते करून दाखवतो.
विवेक देशपांडे
अमरावती

कैद्याचे पलायन
नागपूर कारागृहातून एक कैदी पळाल्याचे वृत्त वाचले आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. या कैद्याला सुधारण्यासाठी खुल्या जेलमध्ये ठेवले होते. पण, त्याने संधी साधली. हे पाहून कैद्यांना सुधारण्याची संधीच देऊ नये काय? कैदी जर असेच पळून जात असतील तर सरकारने आपल्या धोरणावर विचार करावा.
अमोल गजभिये
नागपूर