नकार घंटा

0
99

वेध

हौशी क्षेत्र सोडून व्यावसायिक क्षेत्रात उतरलेला भारतीय बॉक्सर विजेंदर याची विजयी घोडदौड सुरू आहे. त्याचा विजयी रथ रोखण्यासाठी अनेक बॉक्सर पुढे सरसावत असताना चीनच्या बॉक्सरने मात्र विजेंदरसोबत झुंज देण्यास नकार दिला आहे. या लढतीबाबत आयओएस बॉक्सिंग प्रमोशन, विजेंदर सिंहचे प्रमोटर आणि चिनी प्रमोटर यांच्यात चर्चा झाली. चीनच्या बॉक्सरचे मन वळविण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, त्याने खेळण्यास स्पष्ट नकार दिला. प्रतिस्पर्ध्याने आपल्याविरुद्ध झुंजीस नकार देणे म्हणजे विजेंदरने अल्पावधीत व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये चांगलाच दबदबा निर्माण केल्याचे लक्षण आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार ही लढत १ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या लढतीसाठी विजेंदरचा प्रतिस्पर्धी कोण, हे अजूनपर्यंत निश्‍चित झाले नाही. चीनच्या प्रतिस्पर्ध्याने नकार दिल्यानंतर आता विजेंदरसाठी थोड्या जास्त वजनगटाच्या बॉक्सरचा शोध घेतला जात आहे. विजेंदरच्या प्रतिस्पर्ध्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. विजेंदर सध्या मॅन्चेस्टर येथील ली बीयर्ड येथे प्रशिक्षण घेत आहे. चीनचा प्रतिस्पर्धी झुल्फिकार याने आपले नाव मागे घेतले असले तरी त्यामागे त्याचे काही खाजगी कारण राहू शकते. मी त्याच्या या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. मी कोणाशीही लढण्यासाठी तयार आहे. प्रतिस्पर्धी कोणीही असो मी आपली तयारी सुरू ठेवली आहे, असे विजेंदर म्हणतो. जेव्हापासून विजेंदरने व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून त्याला अजूनपर्यंत कोणीही पराभूत करू शकलेले नाही. १ एप्रिल रोजी मुंबईत होणारी त्याची ही मायदेशातील तिसरी लढत राहणार आहे. या आधीच्या दोन लढती दिल्लीत झाल्या असून, दोन्हीमध्ये त्याने बाजी मारली होती. विजेंदरने आतापर्यंत व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आठ लढतींमध्ये भाग घेतला आणि आठही लढती जिंकल्या. त्यापैकी सातमध्ये त्याने नॉकआऊटमध्ये बाजी मारली. चीनच्या प्रतिस्पर्ध्याने भलेही लढतीमधून माघार घेतली असली तरी निर्धारित कार्यक्रमानुसार लढत ही त्याच दिवशी होणार, मात्र प्रतिस्पर्धी कोण, हे नंतर जाहीर केले जाईल, असे आयओएस बॉक्सिंग प्रमोशनचे नीरव कुमार यांचे म्हणणे आहे.

भारताची फिरकी
एरवी विदेशातून येणार्‍या क्रिकेट संघांच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवून मायदेशात एकहाती विजय मिळविणार्‍या भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजांना परवा ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी आपल्या फिरकीवर चांगलेच नाचविले. आतापर्यंत फिरकी गोलंदाजांच्या भरवशावर मिळालेले यश पुण्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतावर बुमरँग झाले. या सदरात याआधीही अनेकदा फिरकीच्या कुबड्यांच्या आधारे मायदेशात किती दिवस विजय मिळवीत राहणार आणि वेगवान गोलंदाजीच्या अभावी किती दिवस विदेशी खेळपट्ट्यांवर पराभव पत्करत राहाल, हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. याशिवाय भारताची फिरकी भारताचा कधी घात करेल, अशी शंकाही उपस्थित केली होती, ती या सामन्यात खरी ठरली आहे. अजून मालिकेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले नसले तरी पुढील सामन्यांसाठी भारताला हा सावधतेचा इशारा आहे. भारतीय क्रिकेट संघाला आपण आपल्या देशात कधीही पराभूत करू शकतो. मात्र, त्यांना त्यांच्या देशात कसे पराभूत करावे, याचा अभ्यास करून जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या लक्षात आले की, भारताला जर त्यांच्या मायभूमीत पराभूत करायचे असेल तर आपल्याला फिरकीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी भारताविरुद्ध कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा माजी फिरकीपटू श्रीराम श्रीधरन याला सल्लागार म्हणून नियुक्त केले. तसेच भारतीय वंशाचा इंग्लंडचा फिरकीपटू मॉंटी पानेसरचीही फिरकी गोलंदाजीसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. पुण्याच्या क्युरेटर्सने खेळपट्टीवर चेंडू उसळी घेऊ शकतो, हे सांगितल्यानंतरही त्याच्यावर भरवसा न ठेवता ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाजांना खेळविले. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाजांना दुबईत प्रशिक्षणासाठी पाठविले होते. ४० वर्षीय श्रीरामने तेथे जाऊन सल्लागार म्हणून सेवा दिली. याशिवाय रविचंद्रन अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीचा सामना कसा करायचा, याचा सल्लाही दिला व तसा सरावही करून घेतला. याशिवाय भारतीय फलंदाजीच्या कमजोर बाजूही त्याने समजावून सांगितल्या. या सार्‍या बाबींचा परिणाम पुण्यातील पहिल्या कसोटीत दिसून आला. मायदेशात सलग १९ सामन्यांमध्ये विजयी घोडदौड करणार्‍या भारताचा हा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने अशा पद्धतीने रोखला.
महेंद्र आकांत
९८८१७१७८०३