…आधार कसा शोधावा?

0
112

कल्पवृक्ष
एक कुटुंब एकदा जंगलात फिरायला गेले होते. जंगलात फिरताना अनेकदा छोट्या छोट्या फांद्या बाजूला करून समोर जावे लागते. जंगलात अनेक वृक्षांच्या मोठ्या मोठ्या फांद्या जमिनीपर्यंत लोंबल्या होत्या. त्या कुटुंबातल्या दहा-बारा वर्षाच्या मुलाच्या मनात विचार आला की, ही फांदी आपल्याला बाजूला करता येईल का? त्याने वडिलांना विचारले, ते म्हणाले, ‘‘ निश्‍चित. का नाही? फक्त तुला पूर्ण ताकद वापरावी लागेल.’’ मुलाने प्रयत्न केला, पण फांदी हललीही नाही. त्याने वडिलांकडे पाहिले. ते म्हणाले पूर्ण ताकद लाव. त्याने चार-पाच वेळा खूप ताकद लावून प्रयत्न केला, तो थकून गेला, पण यश आले नाही. वडील म्हणाले, ‘‘तू पूर्ण ताकद लावण्यात कमी पडला.’’ त्याला काहीच कळले नाही. तो म्हणाला, ‘‘म्हणजे काय बाबा?’’ वडील म्हणाले, ‘‘तू मला बोलाविले नाही. बहिणीला, आईला बोलाविले नाही. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर ती फांदी निश्‍चित बाजूला होईल. तुझी ‘पूर्ण ताकद’ म्हणजे तू एकटा नाही. आमचीही ताकद तू जोडू शकतो. फक्त सहकार्य मिळविण्याचे कौशल्य मात्र तुझ्याजवळ हवे.’’
एक अत्यंत महत्त्वाचे जीवनकौशल्य वडिलांनी त्याला शिकवले. एकटा माणूस काय करू शकतो. प्रत्येक क्षणी दुसर्‍याच्या मदतीची गरज असते. सहकार्य करणे आणि सहकार्य मिळविणे, हा सहज स्वभाव झाला तर सर्वांच्याच यशाचा मार्ग सोपा होतो. माणसे जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, एकमेकांच्या पाठीशी उभी राहतात, तेव्हा अधिक शक्ती निर्माण होते. संघटित समाजाचे हेच लक्षण असते. एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांना सहकार्य करणे, हा माणसाचा सहज स्वभाव असला पाहिजे. अशा वातावरणात प्रत्येक माणसाची ताकद वाढते, हिंमत वाढते, उत्साह वाढतो.
असे करणे म्हणजे काही फार मोठे सेवाकार्य करणे नव्हे. त्याकरिता संस्था काढाव्या लागत नाहीत किंवा प्रकल्प उभे करावे लागत नाहीत. अनेकदा माणसे हे करायला तयार असतात, पण रोजच्या जीवनात सहज सहकार्य करण्याचा स्वभाव मात्र दिसत नाही. असा स्वभाव म्हणजे आपल्यातली संवेदनशीलता आणि माणुसकी जिवंत असल्याची ती खूण असते. अशी अनेक माणसं आपल्या अवतीभवती वावरतही असतात. शहराच्या बाहेर दूर नवीनच उभ्या झालेल्या वसाहतीतला एक अनुभव. त्या वेळी मोबाईल नव्हते. कारही फार कमी असायच्या. रात्री एका आजोबांची तब्येत बिघडली. रिक्षा, ऑटो मिळायला फार उशीर झाला. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एका कार्यक्रमानिमित्त त्या वस्तीत जाण्याचा योग आला. एका नागरिकाने त्या कार्यक्रमात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने सर्वांना विनंती केली, ‘‘माझ्याजवळ कार आहे. रात्रीबेरात्री कोणावरही असा प्रसंग आला तर मला निःसंकोच उठवा. मी तुमच्या सोबत येईन.’’ पाच-सहा महिन्यांनी भेट झाल्यानंतर हा विषय निघाला. दोनदा प्रसूतीकरिता व एकदा लहान मुलाचा ताप खूप वाढला, त्या वेळी त्यांना रात्री जावे लागले. कदाचित आज कार, ऍम्ब्युलन्स वाढल्यामुळे त्याचे महत्त्व कळणार नाही. पण, त्या वेळी ती मोठी गोष्ट होती. काळ बदलतो, समस्यांचे स्वरूप बदलते, पण सहकार्य वृत्ती मात्र कायम राहिली पाहिजे.
कुटुंबात दोघांच्याही नोकर्‍या, मुलांचे करिअर यामुळे आलेली व्यस्तता असेल, कदाचित आपण फारच स्वतःच्या वर्तुळात मग्न झाल्यामुळे असेल किंवा उपभोगवादामुळे आपल्या संवेदना बोथट झाल्यामुळे असेल, कारण काहीही असेल पण दुसर्‍याचा विचार करण्याची, परस्पर सहकार्य करण्याची वृत्ती कमी झाली आहे. माणसांना वापरून घेण्याचे कौशल्य वाढले आहे. या व्यावसायिक वृत्तीचेही दुष्परिणाम होत आहेत. आपल्या घरात नॉनस्टिक भांड्यांचा वापर वाढला आहे. आपले संबंधही असेच निर्लेप होत आहेत की काय? असे वाटते. कोणी नाती अंगाला लावूनच घेत नाही. गोष्टीतल्या वडिलांनी आम्ही तुझी ताकद आहोत, हे स्पष्टपणे सांगितले. हाच विश्‍वास आज माणूस हरवून बसतो आहे. त्यातून अनामिक भीती, असुरक्षितता, एकाकीपण व तुटलेपण येत आहे.
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?
अशी मनामनांची अवस्था झाली आहे. ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे,’ असा विश्‍वास देणारा समर्थ समाज आहे कुठे? पुन्हा ते सामर्थ्य जागवू या.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११