…तो नजारें बदलेंगे

0
143

रमा दिल्लीला बदलून आली होती. तिच्या वडिलांचे मित्रही तेथेच स्थायिक झाले होते. तिच्याही ते ओळखीचे होते. त्यांच्या घरी जाऊन येण्याविषयी वडिलांचा सतत आग्रह सुरू होता. ते काका-काकू आता वृद्ध झाले होते. त्यांचा मुलगा कारगील युद्धात मारला गेला होता. सुनेनेही दुसरे लग्न केल्यानंतर ते एकाकी जीवन जगत होते. आज सुटी असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा कार्यक्रम ठरविला. सुटीच्या दिवशी घरभर मुले पसारा करून ठेवतात. तिने सर्वांना तो आवरायला लावला. त्याकरिता तिला थोडा आवाजही चढवावा लागला. घरात पसारा तिला मुळीच आवडत नसे. त्या बाबतीत ती खूपच आग्रही असायची.
आवरासावर करून थोडी उशिराच ती त्यांच्याकडे पोहोचली. दोन तास हास्यविनोदात गेले. लहानपणच्या कितीतरी गमतीजमती त्यांनी सांगितल्या. मुलांनीही मुक्तपणे मस्ती केली. काका-काकूंना त्रास नको म्हणून ती डायनिंग टेबल आवरायला लागली. मुलांनाही तिने सर्व वस्तू जागच्या जागी उचलून ठेवायला सांगितल्या. काका ‘नाही नाही’ म्हणत असतानाही तिचे काम सुरूच होते आणि अचानक काका जोरात ओरडले, ‘‘तुला सांगितले ना राहू दे.’’ त्या आवाजाने काकूही चपापल्या. एक क्षण सगळेच शांत झाले. काकांनी रमाच्या पाठीवर हात ठेवला, बाजूला बसविले आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, ‘‘रमा, कितीतरी दिवसांनी या घरातल्या वस्तू जिवंत झाल्या. त्यांनी आपली जागा सोडली. हा पसारा असाच पडलेला राहू दे. त्यांच्याकडे पाहून, तुमच्या आठवणीत आमचे दोन चार दिवस आनंदात जातील.’’ रमाच्याही डोळ्यांना धारा लागल्या. पुन्हा येण्याचे आश्‍वासन देऊन ती घरी आली. पसारा दिसला की आजही तिचे डोळे ओले होतात. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन किती भिन्न असतात, आणि ते कळले तर आपल्याही दृष्टिकोनात कसा बदल होतो, याचा एक विलक्षण अनुभव रमाने घेतला होता. नेहाच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्‍याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’ बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एका सरकारी दवाखान्यात, अपघात झाल्यामुळे एका मुलाला भरती केले असते. तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. सर्जनला निरोप जातो. ते यायला थोडा विलंब होत असल्यामुळे मुलाचे वडील अस्वस्थ असतात. सर्जन आल्याबरोबर ते त्याच्यावर उशीर झाल्याबद्दल चिडतात. निष्काळजी, सरकारी काम, अशा नेहमीच्या शब्दांनी त्यांचे स्वागत करतात. सर्जन येतात, शस्त्रक्रिया करतात आणि तत्काळ निघून जातात. मुलाचे वडील त्यांच्याशी बोलणार, तेव्हढ्यात ते नर्सकडे बोट दाखवितात आणि घाईने निघून जातात. पुन्हा त्यांच्या मनात विचार येतो, काय उद्धट माणूस आहे. ते नर्सजवळ चौकशी करतात. ती त्यांना सांगते, ‘‘तुमच्या मुलाचे ऑपरेशन उत्तम झाले. काळजीचे कारण नाही. सर्जनच्या मुलाचाही अपघात होऊन नुकताच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना थोडा उशीर झाला व तातडीने ते निघून गेले.’’ हे ऐकले मात्र आणि आपण किती मोठा अपराध केला, याची त्यांना जाणीव झाली.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो. त्यावर माणसे ठाम असतात. खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते. विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे. त्यामुळे तो विकसित होतो. जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात. ‘माणूस’ समजणे सोपे जाते. दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे, अर्थात चुकीचे दृष्टिकोन. म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’ असे म्हणतात…
८८८८८०३४११