बंदोबस्त आवश्यक!

0
147

कुठे गेलेत देशातील सगळे पुरोगामी? कुठे गेलेत सगळे पुरस्कार परत करणारे? कुठे गेलेत सगळे मानवतावादी? कुठे गेलेत सगळे मल्टीकम्युनल? वाळूत चोच खुपसून बसलेत, की सगळे काही दिसत असूनही आंधळ्याचे सोंग घेऊन बसलेत? याची उत्तरे तुम्हाला आज ना उद्या द्यावीच लागतील. केरळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आल्यापासून माकपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्याची खुली सूट देण्यात आली की काय, अशी शंका वाटावी इतपत हे कार्यकर्ते माजले आहेत, याचा अनुभव फक्त संघ वा भाजपाचे कार्यकर्तेच नव्हे, तर एका मल्याळम् अभिनेत्रीनेही घेतला आहे अन् केरळच्या चित्रपटनगरीनेही घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एक मल्याळम् अभिनेत्री आपले काम आटोपून घराच्या दिशेने निघाली असताना गुंडांनी तिचे अपहरण केले, तिच्या कारमध्ये ते जबरदस्ती बसले अन् तिच्यासोबत अतिप्रसंग केला. एवढेच नव्हे, तर तिच्यावर अत्याचार करताना घटनेचे चित्रीकरणही केले. ही मल्याळम् अभिनेत्री तिच्या कारने घरी जात असताना रस्त्यात मध्येच घात लावून बसलेल्या गुंडांनी तिची कार अडवली अन् कारमध्ये घुसून कोचीच्या आसपास तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संपूर्ण देशाला माहिती झाली आहे. अभिनेत्री असल्याने ती पोलिसात जाणार नाही, याची त्या नराधमांना खात्री वाटली असावी. कारण, पोलिसात गेली तर तिचीच अब्रू चव्हाट्यावर येणार होती. लोकलाजेस्तव का होईना ती अभिनेत्री पोलिसांत तक्रार देणार नाही, याची जणू त्या नराधमांना खात्रीच असावी, असे त्यांच्या एकूण वर्तनावरून जाणवत होते. आपलेच चरित्र नासवले जाईल, लोक आपल्यालाच नावे ठेवतील आणि चित्रित केलेली व्हिडीओ टेप व्हायरल झाली तर आपणच बदनाम होऊ, असा विचार ती अभिनेत्री करेल अन् गप्प बसेल, असा त्या नराधमांचा होरा असावा. पण, आपल्या अभिनयाने मल्याळम् चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलेल्या या अभिनेत्रीने हिंमत केली अन् नजीकच्या पोलिस ठाण्यात, घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली. पण, नंतर जे काही घडले ते संतापजनक होते. केरळातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा खरा आणि किळसवाणा चेहरा जगापुढे आणणारे होते. कैराली नामक एका दूरचित्रवाहिनीने घटना घडल्यानंतर लागलीच बातमी दाखविणे सुरू केले. अभिनेत्रीवर अत्याचार झाला आहे, तिला तातडीने न्याय मिळाला पाहिजे, नराधमांना बेड्या ठोकून आत घातले पाहिजे, असा जर त्या बातमीचा सूर असता तर समजण्यासारखे होते. पण, अश्‍लीलतेचा तडका घालत कैरालीने ती बातमी दाखवायला सुरुवात केली होती. एवढेच काय, तर अत्याचार करणार्‍यांपैकी एक जण तिच्याशी संबंधित व परिचयातलाच होता, अशी मुक्ताफळेही उधळायला सुरुवात केली होती. कैराली वाहिनी इथेच थांबली असती तर ठीक. पण, कैरालीने घटना रसभरीत करण्याचा प्रयत्न चालविला. अभिनेत्रीला न्याय देण्याऐवजी कैरालीने अभिनेत्रीचे चारित्र्यहरण कसे होईल, असाच प्रयत्न केला. ही कैराली वाहिनी दुसर्‍यातिसर्‍या कुणाची नसून केरळात सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या मालकीची आहे! अशा प्रकारे चुकीचे वागणे केरळमध्ये नवे नाही. केरळात सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या गुंडांनी जो धिंगाणा घातला आहे, त्याला कोणताही धरबंद राहिलेला नाही. कारण, त्याला राजाश्रय प्राप्त झाला आहे. कैराली या वृत्तवाहिनीने गुंडांना पाठीशी घालत अभिनेत्रीचेच चारित्र्यहरण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा मल्याळम् चित्रपटसृष्टीने तीव्र निषेध केला. एवढेच नव्हे, तर कैरालीला माफी मागण्यास बाध्य केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची केरळात सत्ता आल्यापासून तिथे कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्येचे सत्रही सुरू झाले आहे. स्वयंसेवकांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी देशभर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेत मार्क्सवादी सुधारतील, अशी कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. उलट, कम्युनिस्टांकडून राजकीय सूड उगवला जात असल्याचे दिसते आहे. राजकीय हत्यासत्र कम्युनिस्टांच्या राजवटीत जास्त वाढले आहे. त्रिवेंद्रम लॉ ऍकेडमीमध्ये आंदोलन झाले त्या वेळी पोलिसांनी एवढी अमानुष मारहाण केली की, त्यात भाजपाचे दलित नेते डॉ. वावा यांचा एक डोळाच निकामी झाला. भाजपा आणि संघ कार्यकर्त्यांवर हल्ले करायचे, त्यांना गंभीर जखमी करायचे, ठार मारायचे, अशा घटनांमध्ये डिसेंबर २०१६ पासून फारच वाढ झाली आहे आणि हा काळजीचा विषय बनला आहे. कम्युनिस्टांनी असा हिंसेचा मार्ग का निवडला, हिंसेशिवाय त्यांना सत्तेत येणे कठीण वाटते काय, की हीच त्यांची संस्कृती आहे, असे अनेक प्रश्‍न आता सतावू लागले आहेत. आता पुन्हा परवा रात्री साडेआठ वाजता कोझीकोडजवळील कल्लाची येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली. त्यात चार स्वयंसेवक जखमी झाले. कम्युनिस्टांच्या हल्ल्यात जखमी होणार्‍यांची संख्या आणि मरण पावणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माकपाच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरी एका घराला आग लावली होती आणि त्या आगीत घरातील एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. लोकांना आगीत जाळणारी माकपाची ही संस्कृती समाजासाठी घातकच मानली पाहिजे. जी महिला होरपळून मरण पावली तिचा दोष काय होता? तर ती ज्या कुटुंबात राहात होती, त्या कुटंबातील सदस्यांचा भाजपाशी संबंध होता. अशाच प्रकारे संतोष नावाच्या एका व्यक्तीला माकपाच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या निर्दयतेने मारले की, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोषच्या मृत्यूचे प्रकरण तर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांच्या मतदारसंघातले आहे. पण, त्याकडे त्यांनी फार गांभीर्याने लक्ष दिले नाही. माकपाचे नेतृत्व एवढे निष्ठुर कसे काय झाले? की मुळातच ते मुर्दाड आहेत? त्यांच्या संवदेना हरवल्या आहेत? की ते संवेदनाहीनच आहेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याऐवजी ते जर विचारांना हिंसेने उत्तर देणार असतील, तर मग त्यांच्या हिंसेला कसे उत्तर द्यायचे, याचा विचार समाजाला करावाच लागेल. एखादा विचार संपविण्यासाठी तुम्ही हिंसेचा आधार घेता, हे योग्य नाही. आपला विचार जनमानसात रुजवायचा असेल, तर त्याचे महत्त्व तुम्ही लोकशाही मार्गाने जनतेला समजावून सांगितले पाहिजे. तुम्हाला असे वाटत असेल की, तुमचा विचार समाजाने मान्य केला पाहिजे, तर त्यासाठी अहिंसक मार्गाने प्रयत्न करा, कुणी अडविले आहे तुम्हाला? पण, तुम्ही तसे कराल याची अपेक्षा आता केली जाऊ शकत नाही. कारण, तुम्हाला तुमचाच मार्ग योग्य वाटतो आहे. हिंसेच्याच मार्गाने आपण संघ-भाजपाचा विचार संपुष्टात आणू, असे जर तुम्ही ठरवूनच बसला असाल, तर फार दिवस तुमचे अत्याचार सहन केले जातील असे समजण्याचे कारण नाही. कुठेतरी तुमच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कुणीतरी पावले टाकणारच, हे लक्षात घ्या. माकपाच्या कार्यकर्त्यांचा उत्पात पाहता केरळात कोणते ठिकाण सुरक्षित आहे, असा प्रश्‍नच पडतो. केव्हा गुंडांचे टोळके घरात घुसेल अन् हल्ला करेल, याचा काही नेम राहिला नाही. तुमची कारही सुरक्षित राहिलेली नाही, ते तर मल्याळम् अभिनेत्रीवर तिच्याच कारमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचारांवरून सिद्ध झाले आहे. जेवढे झाले तेवढे पुरे. आता केरळमधील हिंसक टोळक्यांचा बंदोबस्त करणे, ही काळाची गरज आहे…!