हिच्या तालावर नाचतोय् देश?

0
174

या देशात असहिष्णुतेला जराही थारा नसल्याचे विधान परवा राष्ट्रपती महोदयांनी केले. गुलमेहर कौरने केलेल्या ‘त्या’ विधानावरून जाणीवपूर्वक उसळविण्यात आलेला आगडोंब शांत करण्यासाठीची कर्तव्यपूर्ती, देशाचे प्रमुख म्हणून कदाचित त्यांनी पार पाडली असावी. पण, ज्या असहिष्णुतेसाठी इथे जराही जागा नसल्याचा दावा केला जातोय्, त्याच्या समर्थनार्थ उभे ठाकलेय् कोण इथे? विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांचे मुडदे पाडून त्यांचे अस्तित्व संपवायला निघालेल्यांना पदराआड झाकणारे केरळ सरकार म्हणे सहिष्णू? मतदानाला जाताना एक ‘वजन’दार पोलिस अधिकारी दिसला, तर सोशल मीडियावरून सार्‍या जगासमोर त्याची खिल्ली उडविणार्‍या शोभा डे सहिष्णू? सार्‍या जगासमोर या देशाची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी न दवडणार्‍या, नव्हे, त्यासाठीच लेखणी झिजवणार्‍या अरुंधती रॉय पुरोगामी विचारांच्या? मोठा तीर मारल्याच्या थाटात एका गुलमेहरने कुठलेसे काव्यात्मक वक्तव्य केले, तर त्याचे निमित्त साधून सरकारवर तुटून पडायला सारी गर्दी सरसावली. काहीएक घेणेदेणे नसताना तिच्या समर्थनार्थ मैदानात उतरून एकमेकांवर दुगाण्या झाडणारे अन् या निमित्ताने राजकारण करण्याची संधी साधून घेणारे राजकीय नेते सहिष्णू? केरळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले, तरी निषेधाचा क्षीण स्वरही निघत नाही या गर्दीतल्या कुणाचा! याच कृतीला कुणी प्रत्युत्तर दिले की, मात्र तळपायाची आग मस्तकात जाते त्यांच्या. एरवी जरा कुठे मनाविरुद्ध घडलं तर लागलीच पुरस्कार परत करायला सरसावणारे या देशातले शहाणे लोक, केरळातील तमाशाबाबत चकार शब्द काढत नाहीत. का? तिथे रक्त हिंदूंचे सांडतेय् म्हणून? की त्या प्रांतात सरकार डाव्यांचे आहे म्हणून? तसेही लोकशाही धोक्यात असल्याची बोंब फक्तउजव्या विचाराची मंडळी सत्तेत आली की मारायची असते. कॉंग्रेस अन् डाव्यांच्या राज्यात काही चुकीचेही घडले, तरी गुमान बसायचे असते मूग गिळून. खरे ना!
दिल्लीच्या रामजस महाविद्यालयात दोन विभिन्न विचारांच्या विद्यार्थी संघटनांमधला संघर्ष हा काय केवळ वैचारिक पातळीवरचे भेद दर्शवतो? जेएनयूच्या उमर खालीदने का म्हणून रामजसमध्ये येऊन भाषणं ठोकायची? ऑल इंडिया स्टुडण्टस् असोसिएशनचा प्रचार करायला? कन्हैयाच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये घातला गेलेला धिंगाणा सार्‍या देशाने अनुभवला. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या इथल्या गर्दीतील एकालाही त्याचे बरळणे आक्षेपार्ह वाटले नव्हते तेव्हा अन् आता गुलमेहरचे एक विधान पुरेसे ठरले त्यांना पेटून उठायला? त्या गुलमेहरचे वडील पाकिस्तानविरुद्धच्या ज्या सैनिकी कारवाईत मारले गेले, त्या बलिदानाची किंमत कुणी, कधी नाकारली? ती म्हणते तसे शांतीचे वातावरण जगातल्या कुठल्या देशाला नको आहे? पण, वास्तवाचे भान राखण्यापेक्षाही तिच्या भावनात्मक विधानाच्या सुतावरून स्वर्ग गाठायला सज्ज झालेत काही लोक. पाकिस्तानने नव्हे, एका युद्धाने आपल्या पित्याचा बळी घेतला, हे अवजड वाक्य बोलून एवढे रान पेटवू शकली एक गुलमेहर? सारी तरुणाई रस्त्यावर उतरावी इतके परिणामकारक ठरावे तिचे विधान? की कुठल्याशा नियोजनबद्ध कारस्थानाचा परिपाक मानायचा तो?
जणूकाय परवा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनेच ते युद्ध घडवून आणले होते आणि गुलमेहरच्या पिताश्रींच्या दुर्दैवी मृत्यूला हे सरकारच जबाबदार असल्याच्या थाटातले बरळणे आणि बेताल वागणे चालले आहे इथे प्रत्येकाचे. वडील गेल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी अचानक एक दिवस या युवतीच्या मनात हे प्रगल्भ विचार येतात, तिने ते व्यक्त करताच त्याला कल्पनेपलीकडची प्रसिद्धी अन् कल्पनेपलीकडचा प्रतिसाद क्षणात लाभतो. आणि जणूकाय त्यावरून राजकारण करण्याची आयतीच संधी लाभल्यागत सारेच सरसावतात थयथयाट करायला. ही तीच गर्दी आहे, जी काल कुणाच्या तरी कथित असहिष्णुतेवर तुटून पडली होती. यातलेच काही म्होरके पुरस्कार परत करायला शासन दरबारी हजेरी लावत होते तेव्हा. कुणाच्या सहिष्णुतेबाबत बोलायचे राष्ट्रपती महोदय, आपण तरी?
राजकारणाच्या चौकटीत बंदिस्त राहणारी अन् वार्‍याच्या तालावर डोलणारी डोकी सारी. कुणीतरी सुचविलेल्या अमुक एकाच्या विरोधात बोलत सुटायचे एवढेच त्यांना ठाऊक, योग्यायोग्यतेचा विचारही मनात न आणता. सार्‍या जगाच्या लेखी ज्यांचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे, ते पंतप्रधान मोदी सध्या यांच्या अजेंड्यावर आहेत. मोदींचे सरकार विरोधी पक्षाचे आहे ना, मग त्यांनी कितीही चांगले काम केले, तरी त्यांच्याबाबत एकही सकारात्मक शब्द आपल्या तोंडून बाहेर पडणार नाही, याची काळजी घ्यायची. बंगालात साडेतीन दशकं सत्ता असतानाही तिथल्या गरिबीवर नियंत्रण मिळवता आले नाही डाव्यांना. पण, त्या अपयशावर एक अवाक्षरदेखील काढायचे नाही. तिकडे केरळातही भाजपाविरोधक सत्तेवर आहेत ना, मग त्यांनी लोकशाहीला काळिमा फासली तरी त्यांचे केवळ गुणगानच करायचे! कारण लोकशाहीचा खून फक्त भाजपाची सत्ता असलेल्या ठिकाणीच होतो. इतर लोक सत्तेवर असलेल्या ठिकाणी तर काय रामराज्यच असते त्यांच्या लेखी! त्यामुळे तिथल्याबद्दल काही बोलायला नको. हे असले, सत्तेत कोण हे बघून भूमिका ठरविणारे, समर्थनात सभा घ्यायची की विरोधात मोर्चे काढायचे हे ठरविणारे, हे लोक पुरोगामी म्हणवून घेणार स्वत:ला? अन् यांची साक्ष काढून इतरांना सहिष्णुता-असहिष्णुतेच्या तराजूत तोलणार आपण? सांगा ना राष्ट्रपती महोदय, आपल्या म्हणण्यानुसार, या देशात असहिष्णुतेला जराही थारा नसेल, तर मग रामजसमध्ये धिंगाणा घालणार्‍यांना काय शिक्षा देणार आहे इथली यंत्रणा? डोळ्यांदेखत, जिवंत माणसांचे मुडदे पाडले जात असतानाही षंढ भूमिका स्वीकारून गप्प राहिलेल्या केरळ सरकारला कोण उभे करणार आरोपीच्या पिंजर्‍यात? रामजसमध्ये वंदे मातरम्‌ची घोषणा देत रॅली काढणारे लोक कुणाच्या तरी छद्मी हास्याचा विषय ठरतात इथे अन् जेएनयूमध्ये आपल्याच देशाविरुद्ध बरळणारे मात्र ‘हिरो’ ठरविले जातात त्यांच्याच लेखी. तेच वाटत फिरतात सभ्यता आणि सहिष्णुतेची प्रमाणपत्रे. देशभक्ती अन् देशद्रोहाच्या प्रमाणपत्रांवरही त्यांचीच मोहर उमटलेली हवी असते त्यांना.
युद्धविहीन जगाची कल्पना मांडत सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेणार्‍या, त्यावरून स्वत:चे अवास्तव महत्त्व वाढवून घेण्यात यशस्वी ठरलेल्या या युवतीचे, एका चालत्या गाडीत, एका गाण्यावर बेधुंद नाचतानाचे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पितृछत्र हरविल्याचा मुद्दा लोकभावनेच्या बाजारात विकायला मांडत सहानुभूती मिळविणारी ती खरंच हीच मुलगी असेल, तर मग संपलंच सगळं! कुठल्याशा गाण्याच्या तालावर बेभान होत नाचणार्‍या ‘हिच्या’ त्या विधानावर दिल्लीतली पेटलेली तरुणाई रस्त्यावर उतरली असेल, तिच्यासाठी ही सारी सहानुभूती दाखवली जात असेल, तर मग त्यांच्या बुद्धीचीही कीवच केली पाहिजे. कारण, तरुणाईला रस्त्यावर उतरवायलाच नव्हे, तर देशाच्या राष्ट्रपतींनाही बोलायला भाग पाडणारी ती हीच तरुणी आहे, जी सार्‍या देशासाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
‘‘महाविद्यालये ही तरुणाईच्या भावना मांडण्यासाठीचा प्लॅटफॉर्म व्हायला हवीत. असे एकमेकांविरुद्धच्या विरोधाचे प्रदर्शन मांडण्यासाठीची नव्हे…’’ -इति. मा. राष्ट्रपती. सहिष्णुतेच्या मुद्यावरील त्यांची टिप्पणीही त्यावरच आधारलेली. रामजसमध्ये सध्या सुरू असलेला डाव्यांचा तमाशा बघितल्यावर राष्ट्रपतींचे विधान नेमके कुणी गांभीर्याने घ्यायचे, असा प्रश्‍न उपस्थित होतो…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३