देणे निसर्गाचे…

0
117

ब्रिटनमधील एक्सेटर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेले एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पक्षी, झाडे, झुडपे पाहिल्याने मनातील नैराश्य दूर होते. निसर्गाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे संशोधक डॉ. डॅनिअल कॉक्स यांनी म्हटले आहे. ही बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या एका प्रयोगाची आठवण झाली. शाळेत मुलांना आजकाल विभिन्न प्रकल्प दिले जातात. त्याचे प्रत्यक्षात काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, एका शिक्षकाने अभिनव प्रकल्प राबविला. त्या प्रकल्पाचा समारोप आणि वह्यांचे प्रदर्शन याकरिता बोलाविल्यामुळे हा प्रयोग जवळून पाहण्याची संधी मिळाली. आपली शाळा ते घर, या रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक वृक्षाची माहिती गोळा करायची तसेच परिसरातल्या सर्व पक्ष्यांचीही माहिती, चित्रे गोळा करायची. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्या मार्गावरील प्रत्येक झाड, परिसरातील प्रत्येक पक्षी व त्याचा आवाज ओळखता येणे, हे प्रकल्पाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. झपाटल्यासारखी मुलं व त्यांचे आईवडील कामाला लागले. आपल्या परिसरातील निसर्गाकडे मुलांची दृष्टी वळावी, त्याविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, रोज जे दृष्टीस पडते त्याचा आनंद त्यांना घेता यावा, हा ध्यास असलेला शिक्षकही धन्यच म्हणावा लागेल. मुलांचे आणि पालकांचे अनुभव ऐकल्यानंतर त्यांनाही आनंद झाल्याचे लक्षात येत होते. ब्रिटनमधल्या संशोधनाचा हा पुरावाच म्हणावा लागेल!
निसर्ग माणसाकरिता कायमच आनंदाचा स्रोत राहिला आहे. निसर्गाचे निखळ सौंदर्य नेहमीच मनाला शांततेचा अनुभव देते. आपणही या निसर्गाचाच भाग आहोत, ही जाणीव नकळत निर्माण होते. ज्या क्षणी आपण निसर्ग अनुभवत असतो, त्या क्षणाला राग, द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार, उच्च-नीचता, अपेक्षा, अशा कोणत्याही मानवी भावनेचा स्पर्श नसतो. त्या क्षणापुरते तरी आपण त्यापासून मुक्त झालेलो असतो. हेच त्या आनंदाचे, शांततेचे कारण असते. नैराश्य पळवून नवी ऊर्जा देण्याचे सामर्थ्य निसर्गात असते. म्हणूनच आपली अनेक तीर्थक्षेत्रे पर्वतांवर, नदीवर, संगमावर, घनदाट जंगलात वसली आहेत. आध्यात्मिक उन्नयनाची ती केंद्रे आहेत. दुर्दैवाने आज त्यांचे रूपांतर ‘टूरिस्ट स्पॉट’मध्ये झाले आहे. त्यामुळे माणूस तेथे जाऊनही नेहमीच्या जीवनाशी ‘डिस्‌कनेक्ट’ होऊन निसर्गाशी, त्या आध्यात्मिक भावनेशी ‘कनेक्ट’ होतच नाही. तेथे जाऊन दारू घेतली तर निसर्ग त्यांच्याशी काय बोलणार? कानात इअरफोन घालून सतत कुणाशी तरी बोलणार किंवा गाणी ऐकत फिरणार, त्यांच्या कानावर निसर्गाचे संगीत कसे पडणार? पानांची सळसळ आणि पाण्याची खळखळ कशी ऐकू येणार? निसर्ग डोळ्यांत साठविण्यापेक्षा फक्त त्याला कॅमेर्‍यात कैद करण्याचीच धडपड केली, तर मनाला मुक्ततेचा अनुभव कसा येणार? सतत सेल्फी काढून ते शेअर करायचे आणि लाईक्स मोजायचे, यातून हा सेल्फ काय शिकणार? निसर्गालाच प्रदूषित करायला निघालेला माणूस मनाचे प्रदूषण दूर करायला कुठे जाणार? हा प्रश्‍नच आहे.
आपल्या देशातली आध्यात्मिक संस्कृती निसर्गाच्या सान्निध्यातच वाढली. ऋषिमुनींना गहन तत्त्वांचा साक्षात्कार निसर्गाच्या कुशीतच झाला. ऋग्वेदात एक फार सुंदर ऋचा आहे. ‘उपहवरे गिरीणां संगमेच नदीनां धिया विप्रो अजायत.’ वने, पर्वत, नद्या व संगम, ज्ञानी व बुद्धिमान माणसाला जन्म देतात. त्यांचे सौंदर्य मनाला प्रबुद्ध करते. निसर्गाच्या शक्तीचे चिंतन करायला त्याला प्रवृत्त करतात. भगिनी निवेदिता म्हणतात, ‘‘ब्यूटी ऍण्ड प्लेस ट्रान्सलेटस् इट्‌सेल्फ टु दि इंडियन कॉन्शसनेस् ऍज् गॉडस् क्राय टू सोल.’’ त्या पुढे म्हणतात, ‘‘नायगारा धबधबा जर भारतात असता तर तेथे एखादे तीर्थस्थळ उदयाला आले असते.’’ एक्सेटर विद्यापीठाच्या कितीतरी पुढे भारतीय संस्कृती गेली. निसर्ग आणि समाज यांच्यात घट्‌ट नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निसर्गातीलच अनेक प्रतीकं समाजासमोर ठेवली. नदीचे उद्गम, मुख व संगम पवित्र मानले. त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे उभी केली. नदीचा आदर्श समोर ठेवला. नदी विभिन्न प्रवाहांना आपल्यात सामावून घेत नामरूप विसर्जित करून समुद्राला मिळते. सर्वच नद्या शेवटी समुद्राला मिळतात. समन्वय, उदारता, व्यापकता, अंतिम गंतव्य ही मूल्ये नदीच्या रूपातून सांगितली आणि त्याच माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला. निसर्गासोबतचे नाते तुटले तर माणूस मानसिक शांती हरवून बसेलच, पण भौतिक दृष्टीनेही कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही!
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११